गोष्ट तशी प्रसिद्धच आहे. पण ती आध्यात्मिक संदर्भात वेगळीच भासते. एक विद्वान एका नावेतून नदी पार करीत होता. विद्वत्तेचा जर मनात गर्व असेल, तर एक खोड असते ती म्हणजे आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन केल्यावाचून राहवत नाही! नावेत त्या नावाडय़ावाचून अन्य कुणी नव्हतं. त्यामुळे या विद्वानाचं नावाडय़ाकडे लक्ष जाणं स्वाभाविक होतं. त्यानं नावाडय़ाला विचारलं, ‘‘तुला काही लिहिता, वाचता येतं की नाही?’’ उत्तर त्याला अपेक्षितच होतंच. नावाडी म्हणाला, ‘‘नाही बाबा, मला एक अक्षरदेखील वाचता येत नाही.’’ विद्वान तुच्छतेनं खेदभरल्या स्वरात म्हणाला, ‘‘अरेरे, इतके ग्रंथ आपल्या या देशात निर्माण झाले. वेद असोत, उपनिषदं असोत, गीता असो.. त्यातल्या कितीतरी ज्ञानाला तू मुकला आहेस.’’ मग त्यानं विचारलं, ‘‘गणिताचं ज्ञान आहे की नाही?’’ नावाडी म्हणाला, ‘‘बाबा या तीरावरून त्या तीरावर प्रवासी न्यायचं माझं काम. त्यासाठी जेवढे पैसे मी घेतो तेवढेच मोजता येतात. व्यवहारापुरता जेमतेम हिशेब येतो.’’ विद्वानानं मग आपण किती ज्ञान आत्मसात केलंय, किती शास्त्रग्रंथ वाचल्येत, किती वादांत जिंकलोय, ते सारं सांगितलं. नावाडी मात्र निर्विकारपणे नाव वल्हवत होता. थोडा वेळ गेला. समुद्रात जोरदार वारं वाहू लागलं. लाटाही खवळून उंचावू लागल्या. नावाडी म्हणाला, ‘‘बाबा, तूफान येतंय बघा. तुम्हाला पोहोता येतं ना?’’ विद्वान घाबरून म्हणाला, ‘‘तेवढी एकच गोष्ट शिकायची राहिली बघ!’’ नावाडी गंभीरपणे म्हणाला, ‘‘पण बाबा, तुम्हाला घेऊन मला पोहोता येणार नाही.. तेव्हा उडी घ्या आणि हातपाय मारत राहा..’’ नावाडय़ानं उडी मारली. विद्वान भेदरून गेला आणि होडीसोबत बुडाला. एका आत्मज्ञानावाचून अन्य कितीही ज्ञान कमावलं, तरी भवसागर पार करण्यासाठी ते कामी येत नाही. उलट व्यावहारिक ज्ञानाच्या अहंकाराचं  ओझं डोक्यावर असेल, तर त्या भवसागरात त्या ओझ्यानंच माणूस बुडेल! तेव्हा हा भवसागर पार करण्यासाठी काय करावं, हे ज्ञान सद्गुरूंकडूनच मिळवावं लागतं.. आणि हा भवसागर पार करण्यासाठीची एकमेव उपासना आहे भक्ती! शंकराचार्याचं स्तोत्र आहे ना? ‘भज गोविंदम्’.. त्याची सुरुवातच एका मरणोन्मुख मूढ माणसाला समजावण्यातून झाली आहे. व्याकरणात ‘डुकृञ्करण’ नावाचं सूत्र आहे. अत्यंत कठीण असं ते सूत्र ज्याला तोंडपाठ होतं तो मृत्यूवर मात करतो, अशी समजूत होती. तेव्हा डोळ्यासमोर मृत्यू दिसायला लागल्यावर जो हे सूत्र शिकायची धडपड करतो, त्याला शंकराचार्य सांगतात की, ‘‘बाबा रे! हे सूत्र आता तुझं रक्षण करणार नाही.. कारण ते शिकायला वेळच नाही. त्यापेक्षा सद्गुरूचं भजन कर, सद्गुरूच्या बोधानुसार जगू लाग!’’ तेव्हा व्यवहारातल्या सर्व विद्या, ज्ञान यांना महत्त्व आहे. पण भवसागर पार करण्यात त्यांचा उपयोग नाही. हा भवसागर तरी काय आहे? तर तो आपल्याच मनात आहे! हा आपल्या भावना, वासना, कामनांचा सागर आहे. मनाचा विस्तार सांगता येत नाही, मनाची खोली उमगत नाही. त्यामुळे हा भवसागरही अथांग आणि विस्तीर्ण आहे. आपल्या मनातल्या अनंत इच्छा, अनंत वासना, अनंत कामना या अज्ञानातूनच उत्पन्न झाल्या असतात आणि त्यामुळे आपलं जे भौतिकातलं ज्ञान आहे, जे व्यावहारिक ज्ञान आहे, ते भवसागराचा मुख्य स्रोत असलेल्या अज्ञानाला नष्ट करू शकत नाही. त्यासाठी आत्मज्ञानाचाचं आधार हवा!

– चैतन्य प्रेम