चैतन्य प्रेम

जो चिंतनीय आहे असा भगवंत, त्या भगवंताचं होणारं चिंतन आणि ते ज्या चित्तात होतं ते चित्त या तिन्ही गोष्टींत एकच एक समाधान भरून गेलं आणि ते समाधानही मग त्याच एकात विलीन झालं आणि मग तो भगवंत आणि मी भक्त, हा भेदही उरला नाही, हीच स्थिती नाथांनी  ‘‘चित्त चिंत्य आणि चिंतन। यापरी तिहींस जाहलें समाधान। तें समाधानही कृष्णार्पण। सहजीं संपूर्ण स्वयें होये।।४२२।।’’ या ओवीत सांगितली आहे. इथं जनार्दन स्वामींच्या आणखी एका अभंगाची आठवण होते. तो अभंग असा आहे: ‘‘बोडक्या लाडक्या झाली भेटी। दैन्य गेलें उठाउठी।।१।। उभयतांची एकचि राशी। बोडके लाडक्यासी संतोषी।।२।।’’ बोडका आणि त्या बोडक्याचा लाडका यांची भेट झाली अन् सगळं दैन्य नाहीसंच झालं. दोघांची आवड एकच, दोघांची निवड एकच आणि त्यामुळे बोडक्यामुळे लाडक्यालाही परम संतोष झाला! आता हा ‘बोडका’ कोण आणि ‘लाडका’ कोण? पुढच्याच चरणात ते स्पष्ट होतं. जनार्दन स्वामी सांगतात, ‘‘बोडका देव लाडका भक्त। उभय लोंकीं त्यांची मात।।३।। म्हणे जनार्दन समरसलें। एकनाथी रंगलें हृदयामाजीं।।४।।’’ हा ‘बोडका’ आहे भगवंत आणि ‘लाडका’ आहे भक्त! आता भगवंत बोडका का? तर त्याचे दोन अर्थ आहेत. आपण ज्याच्या डोईवर केस नाहीत त्याला बोडका म्हणतो. पण इथं बोडका या शब्दाचा वेगळाच अर्थ आहे. भगवंत बोडका आहे याचा अर्थ त्याच्या उपर कोणीच नाही! तो परमस्वतंत्र आहे, सर्वसमर्थ आहे. हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ म्हणजे त्याच्या मस्तकी कोणत्याही काळजीचा, चिंतेचा भारच नाही! आता असा जो बोडका आहे त्याला कोण लाडका वाटेल? तर जो त्याच्यासारखाच आहे तोच! खऱ्या भक्ताच्या जीवनात किती का प्रतिकूलता असेना, त्याच्या मस्तकी चिंता आणि काळजीचा भार नाही. तो प्रयत्न खूप करताना दिसेल, परिस्थिती सुधारण्यासाठी श्रमही करील, पण त्याचं चित्त मात्र सदोदित त्या ‘बोडक्या’च्याच चरणी रममाण असेल. मागे एकजण म्हणाला, की तो सौदी देशात नोकरीनिमित्त गेला होता. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतून एकदम अपरिचित अशा देशात. त्यामुळे थोडा उदासही होता. मात्र एकदा रस्त्यानं जाताना समोरून बुरखा घातलेली एक स्त्री एका लहान मुलासह जात होती. तो मुलगा तिचा हात सोडून पळू लागताच ती मराठीत ओरडली, ‘‘अरे धावू नको. थांब!’’ आणि याला आपली भाषा कानावर पडल्याचा इतका आनंद झाला! बघा, एका साध्या भाषेनंही आपलेपणा वाटतो, मग जो आपल्यासारखाच परमस्वतंत्र आहे, भौतिकाच्या बंधनातून मुक्त आहे, काळजीचा भार जो वाहात नाही, असा भक्त बघून भगवंताला किती आनंद होत असेल! त्यामुळे ‘उभयतांची एकचि राशी’ असल्यानं एकमेकांच्या भेटीनं आनंदच होणार. मन आनंदानं भरून जातं ना, तेव्हा दैन्य पार मावळतं. भोवतालच्या वातावरणावरही त्या आनंदाचा परिणाम झाल्यावाचून राहात नाही. मग बोडका देव आणि लाडका भक्त यांचीच उभय लोकी मात असते. मात या शब्दाचा एक अर्थ गोष्ट असा आहे, तर दुसरा आहे वर्चस्व. तर या दोघांनी इह-पर अशा दोन्ही लोकांवर मात केली असते! म्हणजे भगवंत आपलं ऐश्वर्य विसरून समरसून गेला असतो, तर भक्त आपला जीवभाव विसरून शरणागत असतो. तसे जनार्दनही म्हणतात की एकनाथाच्या हृदयी मी रंगून गेलो!