चैतन्य प्रेम

साधकाची आंतरिक स्थिती कधी कधी उच्च पातळीवर जाते खरी, पण ती जितक्या उच्च पातळीवर जाते तितक्याच वेगानं खालीही घसरते आणि मन पुन्हा भौतिकाच्या चढउतारांमध्ये अडकू शकतं. तेव्हा भावनेची उच्चावस्था ही कायमची सहजस्थिती होणं आवश्यक आहे. त्यासाठी कवि नारायण सांगतो की, बुद्धी भजनशील असावी लागते. आता यात मनही भजनशील असणं अंतर्भूत असलं पाहिजे. कारण बुद्धी ही प्रथम तरी मनाच्याच प्रभावाखाली असते. म्हणजे माणूस निव्वळ बुद्धीनं निर्णय घेत नाही, तर मनाच्या ओढीनुसार बुद्धी विचार करीत असते आणि निर्णयाप्रत जाण्याची धडपड करीत असते. बरेचदा बुद्धीला पटतं की, मनाची ओढ चुकीची आहे, मन जी इच्छा बाळगून आहे ती व्यर्थ आहे. पण तरीही बुद्धी त्या इच्छेची पूर्ती कशी करता येईल, या विचारांतच राबत असते. तर ही बुद्धी मनासकट भजनशील करण्याची गरज कवि नारायण मांडत आहे. बुद्धी भजनशील असणं म्हणजे काय? त्यासाठी याच अध्यायात ‘मुख्य भजना’चा जो अर्थ सांगितला आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. काय आहे हे मुख्य भजन? तर आपल्या जीवनात आपल्या वाटय़ाला जे जे काही आलं आहे, मग ते घरदार असेल, रक्ताच्या आणि मनाच्या नात्यांनी बांधली गेलेली माणसं असतील, बरीवाईट परिस्थिती असेल, ज्या ज्या वस्तू असतील; ते सगळं मनानं भगवंताला अर्पण करून त्यात कर्तव्यभावनेनं राहणं, हेच मुख्य भजन आहे.  म्हणजे आपल्या जीवनात जी माणसं आली आहेत, जी परिस्थिती आली आहे, ती आपल्याच गतजन्मांच्या प्रारब्धकर्माच्या घडणीनुसार आली आहेत. ज्या ज्या वस्तू लाभल्या आहेत, मग ते घरदार असेल किंवा घरातल्या सुखसोयीच्या वस्तू असतील, त्यादेखील केवळ प्रारब्धकर्मानुसार लाभल्या आहेत. जे जे लाभलं आहे ते कायमचं नव्हे. म्हणजे त्या माणसांचा संयोग आणि वियोग अनिश्चित आहे, तसंच त्या वस्तूंचं असणं आणि नसणं अनिश्चित आहे, परिस्थिती तर नेहमी अनिश्चितच असते. मग ती सुखाची असो किंवा दु:खाची असो! सुखाची स्थिती किती काळ टिकेल, हे सांगता येत नाही तसंच दु:खाच्या परिस्थितीत किती काळ राहावं लागेल, तेदेखील सांगता येत नाही. मग जे अनिश्चित आहे, अशाश्वत आहे, त्यात आपल्याला निश्चितपणानं आणि शाश्वत धारणेनं राहायचं आहे. ते राहायचं असेल, तर मन त्या अशाश्वताला चिकटून राहाता कामा नये. ते शाश्वत तत्त्वालाच चिकटून असलं पाहिजे. तर मन, चित्त, बुद्धी या प्रकारे शाश्वताला चिकटून आहे आणि देहानं केवळ अशाश्वतात कर्तव्यभावनेनं राहात आहे, ही स्थिती म्हणजेच खरं मुख्य भजन! आता याचा अर्थ माणसानं रूक्षपणानं जगावं का? तर नाही! अशाश्वताचा जो अशाश्वत आनंद आहे तो जरूर घ्यावा, पण हा आनंद शाश्वत नाही, हे ओळखून त्या अशाश्वतात मनानं रुतून जाऊ नये. मन सदोदित शाश्वताच्याच चिंतन, मननात आणि धारणेत असावं. शाश्वताच्या धारणेत मन सदोदित असणं म्हणजे मन त्या ‘भजना’त प्रवाहित असणं, भजनशील असणं. असा जो राहतो त्याचीच बुद्धी स्थिर असते. आणि ज्याची बुद्धी अशी स्थिर असते त्याचीच बुद्धी चिंतनशील असते. जर त्या धारणेत मन आणि बुद्धी नसेल, तर मग बुद्धी प्रत्येक परिस्थितीबद्दल मनात विकल्प निर्माण करू शकते!  आता भौतिकात वावरताना ही भजनशीलता टिकू शकते काय, असा प्रश्न स्वाभाविकपणे उद्भवेल.