हरी म्हणजे जो जीवाच्या समस्त भवदु:खाचं हरण करतो तो. अर्थात सद्गुरू! या सद्गुरूच्या भजनात, म्हणजेच त्याच्या बोधानुरूप जीवन जगण्यात जे झोकून देत नाहीत, जे त्या भजनाला विमुख होतात, ते सदोदित द्वैतालाच सन्मुख असतात. अगदी सोपी गोष्ट आहे. आपण पूर्वेला तोंड करून उभे असतो तेव्हा पश्चिमेकडे पाठ असते आणि पश्चिमेकडे तोंड करतो तेव्हा पूर्वेकडे पाठ होते. तसंच द्वैत आणि अद्वैत ही दोन परस्परविरोधी टोकं आहेत. आपण अद्वैताला सन्मुख असतो तेव्हा समस्त द्वैतभावनेकडे आपण पाठ फिरवलेली असते. पण जेव्हा आपण अद्वैतभावाला विमुख होतो तेव्हा आपोआप समस्त द्वैतभावालाच सामोरं जावं लागतं.  हे द्वैतच महाभय निर्माण करीत असतं आणि त्यामुळे दु:खदायक असतं. त्यातून प्रपंच दृढ होतो. प्रपंच हा पाचांचा असतो. पंचमहाभूतांच्या आधारावर जगणाऱ्या देहभावनेचा असतो. ‘मी’केंद्रित परिघात षट्विकारांनी माखलेला असतो. हा संकुचित प्रपंचच मनात दृढ होतो.. आणि जेव्हा संकुचिताकडे ओढ असते तेव्हा व्यापकाची नावड असते. नावडच नव्हे, भीतीही असते. नाथ सांगतात, ‘‘हरिभजनीं जे विमुख। त्यांसी सदा द्वैत सन्मुख। महाभयेंसीं दु:खदायक। प्रपंचु देख दृढ वाढे।।४७५।।’’ एकदा का माणूस प्रपंचात रुतत गेला की त्याला त्या प्रपंचापलीकडे काहीच सुचत नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना की, प्रपंच म्हटला तर थोडय़ा वेळात होतो आणि म्हटला तर जन्मही पुरत नाही! तेव्हा प्रपंचाचाच विचार करण्यात, प्रपंचासाठीच कष्ट करण्यात दिवस सरतो आणि अंथरुणावर पाठ टेकली तरी मनात प्रपंच विचारांचंच काहूर असतं. मग हे या प्रपंचाचं जे ‘मी’ केंद्र आहे ना, ते वास्तवापासून भरकटवत असतं. सगळ्या घडामोडी, सगळ्या गोष्टी या ‘मी’च्याच नजरेतून पाहिल्या जात असतात. त्यामुळे या ‘मी’च्या ओढीला छेद देणारं वास्तवही ऐकायची इच्छा नसते. मग दिशाभूल ठरलेलीच.. ‘‘जेवीं एकाएकीं दिग्भ्रमु पडे। तो पूर्व म्हणे पश्चिमेकडे। तैसी वस्तुविमुखें वाढे। अतिगाढें मिथ्या द्वैत।। ४७६।।’’ एकदा दिशा चुकली की पश्चिमेलाच पूर्व मानलं जातं. पूर्व ही उगवतीची दिशा आहे, तर पश्चिम ही मावळतीची दिशा आहे. या रूपकाचा अर्थ असा की, ‘पूर्व’ ही ज्ञानोदयाची दिशा आहे. हे ज्ञान आहे ते शाश्वताचं. तर, ‘पश्चिम’ ही अशाश्वताकडे नेणारी ज्ञानास्ताची दिशा आहे. माणूस जेव्हा पश्चिमेलाच पूर्व मानू लागतो, अर्थात अशाश्वतालाच शाश्वत मानू लागतो तेव्हा सद्वस्तूपासून दुरावू लागतो आणि सद्वस्तूबाबत विमुखता वाढत गेली की कधीही नष्ट न होणारं, अत्यंत गाढ असं मिथ्या द्वैत मनाला व्यापून टाकतं. जेव्हा अंत:करणाची विहीर द्वैताची, भेदाची विहीर होते तेव्हा या विहिरीत संकल्प आणि विकल्प यांचेच झरे सुटू लागतात. मग तिथं जन्म आणि मरण, मरण आणि जन्म यांचाच पूर येत राहतो. मग त्यात ब्रह्मांडगोळ बुडून जातो. नाथ सांगतात, ‘‘द्वैताचिये भेदविहिरे। सुटती संकल्पविकलंचे झरे। तेथ जन्ममरणांचेनि पूरें। बुडे एकसरें ब्रह्मांडगोळ।।४७७।।’’ आता हा ब्रह्मांडगोळ बुडून जातो, याचा अर्थ असा की समस्त चराचरातच आपली फरपट सुरू होते आणि कुठेही द्वैतातून सोडवणारी क्षीण संधीही लाभत नाही. दोरा तुटावा आणि त्यातले सगळेच मणी घरंगळावेत त्याप्रमाणे अद्वैतभावाचा संस्कार रुजवणाऱ्या सद्गुरूभक्तीचा दोरा तुटताच द्वैतभावात जीव घरंगळत जातो.

– चैतन्य प्रेम