19 November 2019

News Flash

१३३. सद्गुरू चरण सेवा

भक्तीचा महिमा खरंच अगाध आहे, या भक्तीनं भवविषयांचं बंधन पडू शकत नाही. मात्र ही भक्ती साधण्यासाठी सद्गुरू चरणांची सेवा केली पाहिजे

चैतन्य प्रेम

भक्तीचा महिमा खरंच अगाध आहे, या भक्तीनं भवविषयांचं बंधन पडू शकत नाही. मात्र ही भक्ती साधण्यासाठी सद्गुरू चरणांची सेवा केली पाहिजे.  नाथ सांगतात, ‘‘भक्तीचें अगाध महिमान। तेथें रिघेना भवबंधन। तें करावया भगवद्भजन। सद्गुरूचरण सेवावे।।४७९।।’’ आता सद्गुरू चरणांची सेवा म्हणजे काय? तर हे सेवन आहे. सद्गुरू बोधानुसार जीवन जगू लागणं, ही खरी सद्गुरू सेवा आहे. त्यांच्या सांगण्याच्या विपरीत जगत राहिलो आणि बाह्य़ दृष्टीनं त्यांची बरीच ‘सेवा’ केली, तरी त्या सेवेला अर्थ नाही. कारण खऱ्या सद्गुरूला भौतिकातली कोणतीही गोष्ट नको असते, शिष्याच्या अंतरंगात खरा पालट व्हावा, हाच त्याच्या समस्त क्रियांचा हेतू असतो. त्यामुळे ते जसं सांगतात तसं जगणं हे अधिक महत्त्वाचं आहे. असं जो जगू लागतो तो खरी भक्ती करतो. कारण अशा जगण्याच्या रीतीमुळे तो मोहग्रस्त ओढींपासून विभक्त होऊ लागतो आणि खऱ्या अर्थानं परम तत्त्वाशी जोडला जाऊ लागतो. मग असा जो शिष्य असतो तो खरा ‘निजशिष्य’ होतो. निज म्हणजे अंतरंगातला, जवळचा. नाथ सांगतात, ‘‘निजशिष्याची मरणचिंता। स्वयें निवारी जो वस्तुतां। तोचि सद्गुरू तत्त्वतां। येर ते गुरुता मंत्रतंत्रोपदेशें।।४८०।।’’ या निजशिष्याची समस्त मरणचिंता सद्गुरू निवारतात. आता मरणचिंता म्हणजे काय, याचा थोडा विचार करू. मरणचिंता या शब्दाचा सरळ अर्थ मरणाची चिंता आहे, हे तर उघडच आहे. जीवाच्या मनात जन्मापासून जे सुप्त भय सदोदित असतं ते मृत्यूचंच असतं. हे भय इतकं खोलवर असतं की जीव क्षणमात्रही देहभान हरपू देत नाही. सदोदित तो आपल्या देहाला जपत असतो. तेव्हा जो खरा सद्गुरू असतो तो देहाच्या या प्रेमातून, देहासक्तीतून सोडवत असतो. देह हा साधनेसाठीचा एकमेव आणि मुख्य आधार आहे. त्यामुळे तो देह जपलाच पाहिजे, त्याची योग्य ती निगा राखली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. पण या देहाच्या अवास्तव आणि अमर्याद लाडांत गुंतता कामा नये, हे सद्गुरू बिंबवत असतो. मृत्यूचा विचार करण्यात, मृत्यूची चिंता करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा जन्माची, जगण्याची जी संधी मिळाली आहे तिचा गांभिर्यानं विचार केला पाहिजे. त्या संधीचा सदुपयोग केला पाहिजे, हा विचार खरा सद्गुरू मनात जागवतो. त्यामुळे देहबुद्धीच्या प्रभावामुळे तोवर सदोदित आपल्या देहरक्षणात जुंपलेला जीव हळुहळू देहाची आवश्यक ती काळजी घेऊ लागतो, पण मोहग्रस्त काळजी करणं थांबवतो! माणसाचं मन अनेक प्रकारच्या भयानं व्याप्त असतं. मृत्यूभयाबरोबरच अवमानाचं भय, पैसा न उरण्याचं भय, लौकिकाला धक्का लागण्याचं भय असं अनेक तऱ्हेचं भय मनात असतं. या सर्व तऱ्हेच्या भयांचा प्रभाव कमी होत जातो. याचा अर्थ साधक निष्क्रिय होतो, असा नाही. मात्र या विविध भयांच्या पगडय़ामुळे इतरांशी त्याचं जे हिशेबी वर्तन होऊ शकतं ते थांबतं. एक वेगळ्या प्रकारची निश्चिंती आणि निर्भयता त्याच्या मनात विलसू लागते. अशी आंतरिक तृप्तावस्था केवळ जो वास्तविक सद्गुरू आहे तोच शिष्याला देऊ शकतो. अन्य गुरू मंत्रतंत्राचा उपदेश फारतर करतात, पण ते शिष्याच्या अंतरंगात खरा पालट घडवू शकत नाहीत. नाथ सांगतात, मंत्रतंत्राचा उपदेश करणारे गुरू जागोजागी आहेत, पण जो शिष्याला सद्स्वरूपात स्थित करतो तोच खरा सद्गुरू, असं भगवान कृष्णही सांगतात! त्या सद्गुरूची महती आता पाहू.

First Published on July 9, 2019 7:02 am

Web Title: loksatta ekatmatayog 133 abn 97
Just Now!
X