19 November 2019

News Flash

१३५. खरी भेट

या जगात भक्तीचा बाजार वसवणारे अनेक हिशेबी गुरू भेटतात आणि याच जगात खरा वास्तविक सद्गुरूही वावरत असतो.

चैतन्य प्रेम

या जगात भक्तीचा बाजार वसवणारे अनेक हिशेबी गुरू भेटतात आणि याच जगात खरा वास्तविक सद्गुरूही वावरत असतो. या जगात तो उघडय़ा डोळ्यांनी दिसत असूनही त्याला डोळे भरून पाहण्याची बुद्धी केवळ भाग्यवंतालाच होते.  आता इथं भाग्य या शब्दाचा संदर्भही लक्षात घेतला पाहिजे. भौतिक यश जेव्हा कमी प्रयत्नांत किंवा प्रयत्नांशिवायही कधी कधी मिळतं तेव्हा ती आपल्याला भाग्याची गोष्ट वाटते. याचाच अर्थ भौतिकाच्या त्या प्राप्तीला आपल्या मनात अग्रक्रम असतो. जेव्हा प्रयत्नांतीही यश मिळत नाही किंवा इतरांना आपल्यापेक्षा कमी प्रयत्नांत यश मिळतं तेव्हा ते आपल्याला आपलं दुर्भाग्य वाटतं. भौतिकाच्या प्राप्तीतला अडथळा ही गोष्ट आपल्याला आपल्या दुर्भाग्याची वाटत असते, याचाच अर्थ आपला भौतिकाला अग्रक्रम असतो,  भौतिकातील लाभ-हानीला आपलं मन चिकटलं असतं, हाच आहे. मात्र सद्गुरूचं दर्शन ही भाग्याची गोष्ट वाटू लागणं, ही भौतिकाच्या प्रभाव पकडीतून आपण सुटत असल्याचं लक्षण असते. पण हे भाग्य कशानं लाभतं? तर तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘बहुत सुकृतांची जोडी म्हणुनी विठ्ठलु आवडी’! थोडीशी नव्हे बहुत.. अनेक सुकृतं हातून घडली आणि त्यामुळे कुंठीत ‘मी’पणातून सोडवणारा वैकुंठीचा राणा मनाचा ठाव घेऊ लागतो. त्यातून सुकृतं घडत जातात. आता ही ‘सुकृतं’ म्हणजे काय? तर आंतरिक सुधारणेला वाव देणारी सर्व कृत्यं ही सुकृतंच आहेत. सुकृतं म्हणजे सर्वसामान्य परोपकारी कृत्यं नव्हेत. कारण अशा कृत्यांतून कर्तेपणाचा अहंकार चिकटू शकतो, आपल्यामुळे दुसऱ्याचं भलं होत असल्याचा अहंकार चिकटू शकतो. जेव्हा आपण निरपेक्षपणे दुसऱ्यासाठी काही करतो तीही सत्कृत्यं असतातच, पण ज्या कृतीनं आपल्या अंतरंगाचा विकास होतो, आंतरिक सुधारणा होते त्यांना खऱ्या अर्थानं सुकृत म्हणता येईल. तेव्हा जन्मोजन्मी जेव्हा अंत:करणात सुधारणा घडत जाते, अशी सुधारणा घडावी अशी कृती होत जाते तेव्हाच खऱ्या अर्थानं सद्गुरूभेटीचं भाग्य उजाडतं. इथं ‘सुधारणा’ शब्दाचाही अर्थ लक्षात घ्या. ‘सु’ म्हणजे जे मंगल आहे, उत्तम आहे, सर्वार्थानं चांगलं आहे त्याची धारणा ही सुधारणा आहे. याचाच अर्थ आपली आंतरिक धारणाही जे मांगल्याचं आहे, सत्य आहे, शाश्वत आहे, परम आहे त्याला धरूनच असते. त्या सु-धारणेतूनच सत्कर्म सहज घडत जातात. त्यानंच सुकृत घडत जातं. सुकृत या शब्दाचा एक अर्थ संचित वा चांगलं प्रारब्ध असाही आहे. तर जन्मोजन्मीच्या सत्कर्मानं सुकृत घडलं आणि जन्मोजन्मीचं प्रारब्ध फळाला येऊन सद्गुरूभेटीचा योग आला. पण नुसती भेट होऊन उपयोग नाही बरं. देहबुद्धीनं त्यांना पाहू गेलो, तर देहच दिसणार! अमक्या रंगाचा, अमक्या रंगाचे डोळे असलेला, अमकी उंची असलेला, अमकी वेशभूषा असलेला.. हेच दिसणार. ही काही खरी भेट नव्हे. हे शरीराचं शरीरानं घेतलेलं दर्शन झालं. भेट म्हणजे नुसता नमस्कार करणं आणि त्यांनी आशीर्वाद मुद्रा करताच काढत्या पायानं मागे फिरणं नव्हे. खरी भेट वेगळीच असते. ज्या मनोभूमिकेतून ते जगात वावरतात त्या मनोभूमिकेवर जाणं, ज्या जीवनदृष्टीनं ते कार्यरत आहेत ती जीवनदृष्टी उमगणं, ज्या भावस्थितीत ते सदैव एकरस आहेत ती भावस्थिती आकळणं, ज्या धारणेत ते स्थित आहेत त्या धारणेत स्व-स्थ असलेलं पाहता येणं, ही खरी भेट आहे!

First Published on July 11, 2019 12:08 am

Web Title: loksatta ekatmatayog 135 abn 97
Just Now!
X