एकनाथ महाराज म्हणतात, ज्याला नित्याचीच आवड असते त्याला सद्गुरूची रोकडी भेट घडतेच घडते! नित्यानित्यविवेकआवडी! नुसतं त्याला नित्य काय आणि अनित्य काय याचा विवेक असतो, असं रूक्षपणे सांगितलेलं नाही, तर त्याला नित्य काय आणि अनित्य काय, या विवेकाची आवडच असते, असं म्हटलं आहे! आणि मागच्या भागात सांगितलं तसं, पुण्यर्कम घडावीच लागतात, पण वैराग्यही असावं लागतं. ते नसेल, तर पुण्याचा अहंकार होतो, त्या पुण्यकर्माच्या आधारावर नावलौकिक निर्माण व्हावा, अशी आस मनात निर्माण होते. तर ते वैराग्य असेल, त्याला नित्य आणि अनित्यातील भेद ओळखणाऱ्या विवेकाची जोड असेल, तर जाणवतं की, नावलौकिक वगैरे अनित्य आहे! दुसऱ्याच्या मनात जर त्या पुण्यकर्माच्या योगानं काही भावसंस्कार झाला, तर तो नित्य आहे! डॉ. बावडेकर गोंदवल्यात वैद्यकीय सेवा करीत. अनेक शस्त्रक्रिया त्यांनी तिथं केल्या. त्यांनीच लिहिलेला प्रसंग आहे हा. एकदा ते गोंदवले संस्थानच्या एका पंचांबरोबर मंदिराच्या आवारात फिरत असताना एक-दोन दिवसांपूर्वी त्यांनीच शस्त्रक्रिया केलेला एक म्हातारा समोरून येताना दिसला. पंच कौतुकानं त्याला म्हणाले, ‘‘बाबा, बघा हं, हेच ते डॉक्टर. त्यांनीच वाचवलंय तुम्हाला!’’ त्यावर म्हातारा पटकन म्हणाला, ‘‘साहेब, यांनी शस्त्रक्रिया केली आहे. वाचवलंय महाराजांनी!’’ डॉक्टरांच्या मनावर फार कोरलं गेलं ते वाक्य आणि अगदी खरं आहे. आपण आपल्या क्षमतांनुसार आटोकाट प्रयत्न तेवढा करू शकतो, पण त्याचं यश-अपयश आपल्या हातात नसतं. हा अनुभव आहेच ना? म्हणून तर गीतेत भगवंत सांगतात की, ‘‘तुम्ही कर्म तेवढं निष्ठेनं अचूक करण्याचा प्रयत्न करा; पण त्याच्या फळाच्या अपेक्षेत अडकू नका!’’ पूर्वी गोंदवल्यात भोजनप्रसादासाठी भक्त-भाविक जमिनीवर पंगतीत बसत. त्यांना वाढणारे सोवळी नेसून असत. जेवण झालं की, प्रत्येकानं आपापली ताट-वाटी उचलून विसळून ठेवायची, असा प्रघात असे. असाच एक अगदी जख्ख म्हातारा पंगतीत होता. त्यानं भोजनप्रसाद घेतला. आता त्याला स्वत:चं स्वत:ला तरी नीट उठता येईल की नाही, याचीच शंका होती, तिथं तो ताट-वाटी घेऊन कसा उठणार? ते पाहून एका सेवेकरी साधकानं पुढे होऊन त्याचं ताट स्वत: उचललं. हे पाहून त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यांत अश्रू आले. तो म्हणाला, ‘‘तुम्ही कोण कुठले? मी कुठला? पण बघा, महाराजांना कशी काळजी आहे!’’ हा भावसंस्कार आहे. ते एकदा ताट-वाटी उचलणं पुण्याचं असेल, पण त्याला तेवढं महत्त्व नाही, जेवढं, ‘महाराजांना कशी काळजी आहे,’ या जाणिवेचा संस्कार होण्याचं महत्त्व आहे! तर जेव्हा अनित्य अशा लोकेषणेचा, वित्तेषणेचा मनातून त्याग होऊ लागतो तेव्हाच रोकडी सद्गुरू भेट होते. रोकडी म्हणजे जसे आहेत तशी! थेट. कोणताही आडपडदा नसलेली. तुझा जन्म कशासाठी आहे आणि मी तुझ्या जीवनात का आलो आहे, हे स्पष्ट सांगणारी थेट भेट. अशी भेट झाली की, नाथ म्हणतात, ‘‘सद्गुरुकृपा हातीं चढे। तेथें भक्तीचें भांडार उघडे। तेव्हां कळिकाळ पळे पुढें। कायसें बापुडें भवभय।। ४८५।।’’ सद्गुरूंची कृपा नुसती झाली नव्हे, तर हाती चढली की भक्तीचं भांडार उघडतं! तेव्हा तिच्यापुढे कळीकाळही पळत सुटतो, तिथं बापडय़ा भवभयाची काय कथा! अशा भक्ताच्या चित्तात भवभय लेशमात्रही टिकत नाही; पण त्यासाठी सद्गुरुकृपा हाती चढली पाहिजे!

– चैतन्य प्रेम