चैतन्य प्रेम

विशुद्ध भक्तीनं ज्याचं अंत:करण भरून गेलं आहे त्या भक्तीपुढे कळीकाळही पळतो. जणू भक्ताच्या मार्गातली संकटं दूर करीत तो अग्रभागी असतो. मग अशा भक्ताला भवभयाची काय फिकीर? साईबाबांच्या चरणी आपण जातो आणि किती मागण्यांची सुधारित यादी दर भेटीत घेऊन जातो! जो फकीर आहे त्याला फिकीर कसली? आपल्या भक्तानंही फिकीर करू नये, हीच फकिराची इच्छा असणार ना? भक्तानं बेफिकीर राहू नये, पण उगाच फिकीरही करीत बसू नये. भौतिकातली सर्व कर्तव्यं करावीत, पण सद्गुरू चरण सेवा, म्हणजे सद्गुरू ज्या मार्गानं चावलतात त्या मार्गानं चालणं, हे मनुष्य जन्माचं मुख्य कर्तव्य कधी विसरू नये. मग नाथांनी मातापिता, कुळदेवता, देव इतकंच काय ब्रह्म या सगळ्या उपमांपेक्षाही सद्गुरूंचं माहात्म्य कसं अनुपम आहे, ते सांगितलं. मग म्हणतात, ‘‘ज्यांचा गुरुचरणीं नि:स्सीम भावो। त्यांचा मनोरथ पुरवी देवो। गुरुआज्ञा देवो पाळी पहा हो। गुरुवाक्यें स्वयमेवो जड मूढ तारी।।४९४।।’’ ज्यांचा गुरुचरणी दृढ भाव असतो त्यांचे मनोरथ देव पूर्ण करतो. गुरुंची आज्ञा देवही पाळतो आणि गुरुच्या सांगण्यानुसार जडमूढांना तारतो. गंमत अशी की, ज्यांचा गुरुचरणीं दृढ भाव आहे, त्यांना मनोरथ तरी काय उरणार? आणि जर काही मनोरथ असलेच, तर ते देव पूर्ण करील, अशी त्यांची अपेक्षाही नसते की इच्छाही नसते. कारण त्यांच्यासाठी देव वगैरे सर्व काही एक सद्गुरूच असतो. ‘गुरुचरित्रा’च्या दुसऱ्या अध्यायातील संदीपक शिष्याची कथा आठवते ना? एकदा एका सद्गुरूनं आपल्या सर्व शिष्यांना बोलावलं आणि म्हणाले, ‘‘मी काशीत जाऊन राहणार आहे. माझ्याबरोबर कोण राहायला तयार आहे?’’ महाराजांबरोबर काशीत राहायचं म्हणजे रोज पंचपक्वान्नं आणि मान मिळणार, या विचारानं जो तो सरसावला. पण लगेच महाराज म्हणाले, ‘‘पण एक लक्षात ठेवा. माझं काही प्रारब्ध शेष आहे. ते मी भोगणार आहे. त्या प्रारब्धानुसार मला अनेक व्याधी होणार आहेत. मला दुरूनही पाहू नये, अशीच अवस्था होणार आहे. अंगभर फोड उठणार आहेत. तेव्हा माझी दररोज स्वच्छता आणि सेवा फार जिकीरीची असेल. तर सांगा कोण तयार आहे?’’ मग कोणीही उभे राहीना. तेव्हा संदीपक म्हणाला, ‘‘गुरुजींची कृपा असेल, तर मी तयार आहे.’’ मग हा दीपक काशीला गुरुजींबरोबर एका निर्जन जागी राहू लागला. रोज सकाळी गुरुजींना जाग येण्याआधी आपण स्नानादि कर्मे उरकून घ्यावीत. मग त्यांना स्नान घालावे. त्यांचे कपडे धुवावेत. भिक्षा आणून त्यांना खाऊ घालावी. काशीत असून विश्वेश्वराच्या मंदिरात जाण्याचंही त्याला कधी सुचलं नाही. बरं, गुरूजी म्हणाले होते, ‘‘पहा बरं, रुग्ण जेवढं प्रारब्ध भोगतो त्याच्या कैकपटीनं प्रारब्ध त्याची सेवा करणारे भोगत असतात! तेव्हा तुला त्रास होईल.’’ दीपकाला त्या त्रासाचं काही वाटत नव्हतं. त्रास तरी थोडा होता का? त्यानं भिक्षा आणावी, तर यांनी ती कमीच आहे, म्हणून नाकारावी. कधी चांगले पदार्थ का आणले नाहीस, म्हणून ओरडावं. तरीही दीपक काही न बोलता त्यांची अविरत सेवा करीत होता. त्याची ही गुरुभक्ती आणि सेवा पाहून काशी विश्वेश्वर प्रसन्न होऊन प्रकट झाला आणि म्हणाला, ‘‘संदीपका, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय हवा तो वर माग!’’ दीपक म्हणाला, ‘‘या जगात अशी कोणती गोष्ट आहे की जी माझा गुरू देऊ शकत नाही? तेव्हा मी काय वर मागणार? मला काही वर नको!’’