चैतन्य प्रेम

सद्गुरू भजन हाच भजनाचा सोपा मार्ग आहे, म्हणजे काय? आता एखादी गोष्ट ज्या योगे साधते तो मार्ग किंवा उपायच सोपा मानला जातो ना? गोंदवलेकर महाराजांनी एक छान रूपक वापरलंय. ते म्हणाले, दोन रस्ते आहेत. एक मातीचा आहे आणि दुसरा डांबरी. मला ज्या गावी जायचं आहे त्या गावी जाणारा रस्ता मातीचा आहे, पण डांबरी रस्ता चांगला म्हणून त्या मार्गानं किती पायपीट केली, तरी काही उपयोग आहे का? मी गावी पोहोचणार नाहीच. तेव्हा मातीचा खडबडीत रस्ता हाच गावी जाण्यासाठीचा सोपा रस्ता ठरतो. तर सोपा याचा अर्थ कोणतेही कष्ट नसलेला असा नव्हे, तर ध्येयापर्यंत पोहोचवणारा सर्वात जवळचा रस्ता, असा त्याचा अर्थ आहे. आता सद्गुरू भजन म्हणजे काय? तर ‘एकनाथी भागवता’त जे मुख्य भजन सांगितलं आहे त्याचा अर्थ लक्षात ठेवला पाहिजे. मुख्य भजन म्हणजे देहानं संसारात राहून, संसारातली सर्व कर्तव्यं करून मनानं निर्लिप्त राहणं, शाश्वत तत्त्वाशी चिकटून राहणं हेच खरं भजन आहे. सद्गुरू भजनाचाही तोच अर्थ आहे. देहानं संसारात राहून मन सद्गुरू स्मरणात राखणं, त्यांच्या बोधानुसार जगणं हेच खरं सद्गुरू भजन आहे आणि हाच भजनाचा सोपा मार्ग आहे. म्हणजे भजनाचं जे फलित आहे ते या सद्गुरू भजनानं सहज हाती येणार आहे. थोडं स्पष्ट करून सांगितलं पाहिजे. काहीजण भगवंतावर सोडून आम्ही जगतो, असं म्हणतात. कुणी कुणी देहात नसलेल्या सद्गुरूंवर आम्ही सर्व सोडून जगत आहोत, असं म्हणतात. हे अयोग्य आहे, असं मी म्हणत नाही बरं का. कारण सद्गुरू हे तत्त्व आहे आणि ते देहात असो की नसो, ते आहेच. पण आपल्याबाजूनं जी अजाणता चलाखी होते, ती लक्षात घेतली पाहिजे. आपण आपल्याला हवं तेच करतो, पण हे सर्व सद्गुरू इच्छेनं मी करीत आहे, असं म्हणतो. पण जेव्हा प्रत्यक्ष देहातला सद्गुरू असतो तेव्हा या चलाखीला वाव नसतो! कारण तो लगेच कान पकडतो. देहात नसलेला सद्गुरूही कान पकडत असतो, पण ते कळत नाही. उलट, ‘‘महाराज, मी तुमची एवढी भक्ती करतो, एवढं नाम घेतो, मग माझ्याच वाटय़ाला हा अन्याय का,’’ अशी आळवणी आपण करतो. पण देहातला सद्गुरू हा ‘अन्याय’ माझ्याच पूर्वकर्मामुळे आणि आताच्याही मोहग्रस्त वागणुकीमुळे का होतोय, हे साधार सप्रमाण दाखवून देतो. साईबाबांचं चरित्र पहा, गोंदवलेकर महाराजांचं चरित्र पहा.. किती प्रसंग आहेत जिथं भक्तांना महाराजांनी त्यांच्या वर्तनातील चुका खुबीनं जाणवून दिल्या आहेत. तेव्हा प्रत्यक्ष देहधारी सुद्गुरूचा संग लाभूनही आपला मोह आणि भ्रमाशी संग सुटत नसेल, तर काय उपयोग? तेव्हा सद्गुरू भजन म्हणजे सद्गुरूंची भजनं उच्च स्वरानं गाणं नव्हे, त्यांच्या नामाच्या जपमाळा ओढत बसणं नव्हे, तर त्यांच्या बोधानुसार जगण्याचा अभ्यास प्रामाणिकपणे करणं, हे खरं भजन आहे. आणि हा भजनाचा सोपा मार्ग आहे. माउली म्हणतात ना? ‘तो हा विठ्ठल बरवा’? हा म्हणजे सद्गुरू जो आहे ना, तो आमच्यासाठी बरवा म्हणजे सोपा विठ्ठल आहे. कारण या विठ्ठलाशी आम्ही बोलू शकतो, त्याला स्पर्शू शकतो, त्याचा बोध ऐकू शकतो. तो भगवंत तर आमच्या जन्मापासून आम्हाला प्रत्येक प्रसंगातून काहीतरी सांगत आहेच, पण ते आम्हाला कुठे कळतं? त्यामुळेच तर तो सद्गुरू रूपातून आला आहे. आता त्याच्या बोधानुसार जगू तेव्हाच खरं भजन आणि खरं जगणं सुरू होईल.