चैतन्य प्रेम

सद्गुरूचा जो अनन्य भक्त असतो, त्याचा भाव कसा असतो? नाथ सांगतात, ‘‘आम्हां सद्गुरू तोचि परब्रह्म। ऐसा नित्य निजभाव सप्रेम। हेचि गुरुसेवा उत्तमोत्तम। शिष्य परब्रह्म स्वयें होये।।५०३।।’’ म्हणजे, एका सद्गुरूवाचून आमच्यासाठी परब्रह्म अन्य नाहीच, असा ज्याचा मोठय़ा प्रेमाचा नित्य निजभाव असतो, तो भाव हीच सर्वोत्तम गुरुसेवा असते. मग असा शिष्यही परब्रह्ममय होतो. आता या सांगण्यात एक गूढ आहे बरं का. ‘परब्रह्म’ म्हणजे काय? तर सर्व काही व्यापूनही जे उरतं ते. याचाच अर्थ ते परम तत्त्व आहे. आता जर सद्गुरूवाचून अन्य काहीच परम नाही, तर मग मागायचं असेल तर तेही त्याच्याचकडे ना? आणि तो असा आहे जो जन्मोजन्मी मागत राहण्याच्या लाचार सवयीतून सोडवतो! मग एका सद्गुरूवर जो आधारित आहे तो जीवनातली सर्व कर्तव्यं करतो आणि आपल्या वाटय़ाला जे सुख-दु:खभोग आले आहेत, तेही आनंदानं स्वीकारतो. त्याच्यातला हवेपणाच संपत जातो आणि नकोपणाही संपत जातो. अमुक व्हावं आणि अमुक होऊ नये, हे सदोदित मनात सुरू असलेलं द्वंद्वच संपतं. मग तो खऱ्या अर्थानं गुरूबोधाचं सेवन करू शकतो आणि निरिच्छ झाल्यानं, निर्लिप्त झाल्यानं, निरपेक्ष झाल्यानं परम तत्त्वावाचून वेगळा राहातच नाही! मग अशा गुरुसेवेनं कोणकोण खऱ्या अर्थानं घडले, ते नाथ सांगतात. मग, ‘‘ऐशिया अभिन्न भावना। सुबुद्धी भजती गुरुचरणां। ते पढियंते जनार्दना। त्यांसी भवभावना शिवों नेदी।। ५०६।।’’ ज्यांची अशी अभिन्न भावना होते ते सुबुद्धीवंत होतात आणि तेच गुरुचरणांचं खरं भजन करतात. तेच जनार्दनाचे लाडके होतात. मग त्यांच्या मनाला तो भवविषयांची भावना स्पर्शू देत नाही. जिथं भेद आहे, भिन्नत्व आहे तिथं कुबुद्धी आहे! जिथं कुबुद्धीचा संग आहे तिथं रामाचा वनवास आहे! कैकयीचं रामावर प्रेम होतंच, पण तिला मंथरेची म्हणजे कुबुद्धीची साथ मिळाली. कुबुद्धीनं मनात मंथन सुरू केलं की ‘माझ्या मुलावर’ अन्याय होतोय, त्यालाच राज्य मिळालं पाहिजे! पण जिथं अभिन्नत्व आहे तिथं सुबुद्धी आहे. जिथं सुबुद्धी आहे तिथं खऱ्या अर्थानं गुरूबोधानुसारचं जगणं सुरू आहे. असा भक्त मग सद्गुरूचा लाडका होतो. त्याला भौतिक जगातील आसक्तीचा, भ्रमाचा, मोहाचा स्पर्श तो होऊ देत नाही. कारण हा स्पर्श जरी झाला ना, तरी सापशिडीत सर्वात वरच्या घरातून जशी घसरण होते तशी घसरण भल्याभल्यांची होऊ शकते! केवळ सद्गुरूकृपेनंच या विषयांच्या प्रभावापासून भक्त मोकळा होतो. विषय म्हणजे वाईट, असा अर्थ घेऊ नका. या जगात अमृताचं जितकं महत्त्व आहे तितकंच विषाचंही महत्त्व आहे. चांगल्याचं महत्त्व आहे तितकंच वाईटाचंही आहे. कारण त्याशिवाय चांगल्याचं चांगुलपण उमगलंच नसतं. चांगल्याची आस निर्माण झाली नसती. तेव्हा विषय आहेत म्हणून आंतरिक परीक्षेचं परिमाण उपलब्ध आहे. विषयात राहूनही निर्विषय राहण्याची कला उपलब्ध आहे. पण सर्वसामान्य माणसाची अवस्था अशी नसते. नाथ सांगतात, ‘‘पुरुषासी जो प्रपंचु दिसे। तो नसतांचि मिथ्या आभासे। जेवीं कां एकला निद्रावशें। स्वप्नीं निजमानसें जग कल्पी।।५०८।।’’ झोपलेला माणूस स्वप्नात दिसणारं म्हणूनच खोटं असलेलं जग खरंच असल्याची कल्पना करतो, त्याप्रमाणे जागेपणी प्रत्यक्षात मिथ्या असलेला प्रपंच हा खराच भासत असतो