News Flash

१४९. नाम-मनन

श्रवणाला मननाची जोड असली पाहिजे, असं एकनाथ महाराज सांगतात

 चैतन्य प्रेम

श्रवणाला मननाची जोड असली पाहिजे, असं एकनाथ महाराज सांगतात. मग म्हणतात, ‘‘हरिनाम पडतां श्रवणीं। ज्याचे रिघे अंतकरणीं। सकळ पापा होवोनि धुणी। हरिचरणीं तो विनटे ॥५३४॥’’ सर्व भवदु:खाचं हरण जो करतो त्या हरीचं नाम ऐकताच जे त्याच्या अंत:करणात प्रवेश करतं त्याची समस्त पापं धुतली जातात आणि तो हरिचरणी रममाण होतो. या एका श्लोकात तीन व्यापक प्रक्रिया सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हरीचं नाम असं घ्या की ते अंत:करणात पोहोचलं पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं पापं नष्ट होतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे हरिचरणी मन दृढपणे रंगेल. हरी म्हणजे परम तत्त्वाशी एकरूप असलेला आणि माझ्या भवभ्रमाचं हरण करणारा सद्गुरू. सद्गुरुप्राप्ती झाली नसताना माणूस जे नामस्मरण करतो किंवा जमेल तशी उपासना करीत राहतो ते नाम किंवा ती उपासनादेखील  त्याला सद्गुरुप्राप्तीच्या प्रक्रियेकडेच नेत असते. आता हा हरी कसा आहे? तर तो सत्य आणि ज्ञानमय आहे. तो शाश्वताची प्रेरणा देणारा आणि अज्ञानाचं निवारण करणारा आहे. हे अज्ञान आमच्या जगण्यातलंच आहे. अशा या हरीच्या नामातही सत्य आणि ज्ञानाची जाणीव जागृत करण्याची शक्ती असते. त्यामुळे ते नाम घेत असताना म्हणजेच त्या नामाचा उच्चार होत असताना जो अंतकरणपूर्वक ते ऐकतो त्याची पापं धुतली जातात. आता ‘पापं’ म्हणजे काय हो? तर सत्याचं विस्मरण आणि असत्याची तळमळ, या वृत्तीतच परम तत्त्वाच्या विस्मरणाचा उगम आहे. ते विस्मरण हेच पाप आहे कारण त्या विस्मरणातून फोफावणाऱ्या ‘मी’केंद्रित ओढीतून भ्रम, मोह आणि आसक्तीनं माणूस जगत राहतो. त्यामुळे तो अनेकदा बोलू नये ते बोलतो, वागू नये तसं वागतो आणि करू नये ते करतो. जे नुसतं नाम घेतात, पण ते त्यांच्या अंत:करणात शिरत नसेल, तर त्यांच्या अंतरंगातल्या अशाश्वताच्या ओढीला जराही धक्का लागत नाही. पण ज्याच्या आतपर्यंत ते नाम पोहोचू लागतं तो हरिचरणी दृढ होतो. म्हणजेच सद्गुरू बोधानुसार जगण्याचा अभ्यास करण्यात तो गढून जातो. आता काही जण म्हणतील की, नाम कसंही घेतलं तरी ते वाया जात नाही, असं काही संत सांगतात. मग ते अंतकरणात शिरत नसेल, तर व्यर्थ का मानावं? तर त्यांचं बरोबरच आहे. पण वर्षांनुवर्ष जो नुसतं नाम घेत आहे, त्यालाही वाटतंच ना की, ‘मी एवढं नाम घेतो, पण अजून मन स्थिर का नाही? तृप्त का नाही?’ तर नामाचंही मनन होत नाही, हे त्याचं कारण आहे. त्या नामाचं मनन म्हणजे ते नाम ज्याचं आहे त्याच्या चरित्राचं स्मरण, त्याच्या जीवनउद्देशाचं आणि जीवनदृष्टीचं स्मरण आहे. व्यापकाचं नाम घेत आहे, पण मनाचा आसक्तभाव आणि संकुचितपणा कमी होत नसेल, तर काय उपयोग? तेव्हा नामाचंही श्रवण आणि मनन एकाग्रतेनं झालं, तर विकल्प बाधणार नाहीत आणि वृत्ती शुद्ध होईल. नाथ सांगतात, ‘‘यापरी श्रवणीं श्रद्धा। मननयुक्त करितां सदा। तं विकल्प बाधेना कदा। वृत्ति शुद्ध स्वयें होये।। ५३५।।’’ मग असं मननयुक्त श्रवण झालं, तर त्या हरीवर प्रेम जडतं आणि त्याच्या लीलाचरित्राचं संकीर्तन सुरू होतं! नाथ म्हणतात, ‘‘ऐसें मननयुक्त श्रवण। करितां वोसंडे  हर्ष पूर्ण। तेणें हर्षे हरिकीर्तन। करी आपण स्वानंदें ।। ५३६।।’’ आणि हे हरीसंकीर्तन कसं आहे?  तर, ‘‘वानिती अजन्मयाचीं जन्में। वानिती अकर्मियाचीं कर्मे। स्मरती अनामियाचीं नामें। अतिसप्रेमें डुल्लत ।।५३८।।’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 12:08 am

Web Title: loksatta ekatmatayog 149 abn 97
Next Stories
1 १४८. श्रवण आणि मनन
2 १४७. अभ्यास-साध्य
3 १४६. आत्माभ्यास
Just Now!
X