चैतन्य प्रेम

चराचरात एकच चैतन्यतत्त्व भरून आहे, ही जाणीव आणि त्या तत्त्वाचं दर्शन कुणाला घडतं? कवि नारायण राजा जनकाला सांगतो की, ‘‘करितां पूजाविधिविधान। कां श्रवण स्मरण कीर्तन। सर्वदा चिदैक्यभावना पूर्ण। ‘पूर्ण प्राप्ति’ जाण त्यातेंचि वरी।।६०४।।’’ विधिपूर्वक पूजा करणाऱ्या आणि श्रवण, स्मरण आणि कीर्तन करीत असताना ज्याच्या अंतरंगात सर्वत्र एकच चैतन्य भरून आहे, ही भावना पूर्णत्वानं टिकून असते त्यालाच पूर्णप्राप्ती होते! पूजा विधिपूर्वक व्हायला हवी म्हणजे काय? प्रत्येक पूजेआधी शरीरशुद्धी, आसनशुद्धी, करन्यास, हृदयादि न्यास असतात. पण त्या प्रत्येक कृतीमागचा जो भावविचार आहे, तोदेखील मनात रुजला पाहिजे. शरीरशुद्धी करताना या शरीराच्या आधारावर ज्या परमतत्त्वाची साधना साध्य होते, त्या देहाबाबतची कृतज्ञभावना तर त्यात अंतर्भूत आहेच, पण हा देह ज्या उच्च ध्येयासाठी मिळाला त्या ध्येयाकडे मनाच्या ओढींनी जे दुर्लक्ष झालं, त्याचंही परिमार्जन त्यात आहे. आता या क्षणी साधनेला बसलेल्या या देहाला जे दोष चिकटले आहेत ते दूर व्हावेत आणि हा मूळचा पवित्रच असललेला देह पवित्रतम अशा सद्गुरूच्या स्मरण, चिंतनाच्या साधनेसाठी सज्ज असल्याची जाणीव वाढावी, यासाठी शरीरशुद्धी आहे. आसनशुद्धी म्हणजे ज्या स्थानी आपण बसलो आहोत, ज्या आसनावर आपण बसलो आहोत त्या स्थानाची आणि आसनाची शुद्धी करणारी प्रक्रिया आहे. या देहाकडून जी साधना होत आहे तिचा पाया शुद्ध व्हावा, ही त्या क्रियेमागची व्यापक भावना आहे. त्याचप्रमाणे कर, हृदयादि न्यासानं देहातील सर्व स्थानी परम तत्त्वाची भावना आहे. मग अशा भावनेनं जो पूजा करतो तो ज्याची पूजा करीत आहे त्याच्या दिव्यत्वाशी किती एकरूप होत जाईल! मग तो जे काही श्रवण करतो, स्मरण करतो आणि कीर्तन करतो त्यावेळी एकाच परम चैतन्य तत्त्वाशी त्याची आंतरिक ऐक्यभावना दृढ होत असते. ‘श्रवण’ म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे. तर बाह्य़ जगातलं तो जे जे काही ग्रहण करतो ते ग्रहण करीत असतानाच त्याच्या अंतरंगातील शाश्वताची जाणीव कधीच लोपत नाही. उलट प्रत्येक गोष्ट पाहताना आणि ऐकताना तो शाश्वत तत्त्वाशी अधिक एकरूप होत जातो. एका लहानशा गल्लीतून एक साधक जात होता आणि त्याच्यासमोरून दोन अनोळखी प्रौढ गृहस्थ चालत होते. बोलता बोलता त्यातील एकजण म्हणाला, ‘‘ही गल्ली एवढी अरुंद आणि त्यात लोक दोन्ही बाजूंनी वाहनं लावून ठेवतात. मग चालणंही कठीण होतं.’ लगेच त्या साधकाच्या मनात आलं, ‘किती खरं आहे! परम तत्त्वाच्या प्राप्तीसाठी मिळालेलं हे मानवी आयुष्य इतकं कमी असतं आणि त्यात अनंत इच्छांची गर्दी आपण करीत असतो की परम तत्त्वाच्या प्राप्तीसाठीच्या मार्गावर चालणंही कठीण होतं!’ याप्रमाणे भौतिक जगात वावरताना आणि भौतिक जगातील घडामोडींतही त्याच्या अंतरंगातील चैतन्य तत्त्वाशी असलेली ऐक्यभावना कधीच लोपत नाही. हीच गोष्ट स्मरण आणि कीर्तनाची. त्याच्या अंतरंगात सदैव शाश्वताचंच स्मरण असतं आणि त्याच्याकडून जे काही व्यक्त होतं, तेदेखील शाश्वताशी विसंगत कधीच नसतं.  जेव्हा जीवन असं सुसंगत आणि सुसंवादी होतं तेव्हाच जगण्यातील अपूर्णता मावळत जाते आणि त्याच्याच जीवनात पूर्णत्वाच्या प्राप्तीची शक्यता वाढू लागते. थोडक्यात बाह्य़ कृती आणि आंतरिक भाव यातील ऐक्यतेपासून याची सुरुवात होते!