20 November 2019

News Flash

१५७. भजनयुक्ती

हरीची भक्ती का करावी आणि त्या भक्तीनं काय प्राप्त होतं, हे आता कवि नारायण ठामपणे मांडत आहे

हरीची भक्ती का करावी आणि त्या भक्तीनं काय प्राप्त होतं, हे आता कवि नारायण ठामपणे मांडत आहे. जिथं भक्ती आहे तिथं विरक्ती आहे, असं तो सांगतो आणि आता भक्ती आणि विरक्ती जिथं आहे तिथं अनुभवाचीही प्राप्ती होतेच होते, असं तो नमूद करतो. राजा जनकाला तो सांगतो, ‘‘जेवीं कां भुकेलियापाशीं। ताट वाढिलें षड्रसीं। तो पुष्टि तुष्टि क्षुधानाशासी। जेवीं ग्रासोग्रासीं स्वयेंचि पावे।।६११।। जितुका जितुका घेइजे ग्रास। तितुका तितुका क्षुधेचा नाश। तितुकाचि पुष्टिविन्यास। सुखोल्हास तितुकाचि।।६१२।। पुष्टि तुष्टि क्षुधानाशनी। जेवीं एके काळें येती तिनी। भोक्ता पावे स्वयें भोजनीं। तेवीं भगवद्भजनीं भक्त्यादि त्रिकु।।६१३।। सद्भावे करितां भगवद्भक्ती। भक्ति-विरक्ति-भगवद्प्राप्ती। तिनी एके काळें होती। ऐशिया युक्तीं जाणिजे राया।।६१४।।’’ भुकेलेल्या माणसाला षड्रसांनी युक्त पदार्थानी भरलेलं ताट वाढलं तर त्याला प्रत्येक घासाबरोबर पुष्टी, तुष्टी आणि क्षुधानाशाचा अनुभव येऊ लागतो. जितका जितका घास घ्यावा तितकी तितकी भूक नष्ट होते आणि तितके तितके पोट भरत जाऊन सुख आणि समाधानही वाढत जाते. जेवणाऱ्याला ज्याप्रमाणे पुष्टी, तुष्टी आणि क्षुधानाश या तिन्ही गोष्टी एकदमच प्राप्त होतात त्याप्रमाणे भगवद्भजनामध्ये भक्ती, विरक्ती आणि अनुभवप्राप्ती या तिन्ही गोष्टी एकाच वेळी प्राप्त होतात. आता ही भक्ती, विरक्ती आणि अनुभवप्राप्ती म्हणजे काय? कवि नारायण या तिन्ही गोष्टींची व्याख्या सांगतो ती अशी : ‘भक्ति’ म्हणजे सर्व भूतीं। सप्रेम भजनयुक्ती। ‘प्राप्ति’ म्हणिजे अपरोक्षस्थिती। भगवत्स्फूर्ती अनिवार।।६१५।। ‘विरक्ति’ म्हणिजे ऐशी पहा हो। स्त्रीपुत्रदेहादि अहंभावो। समूळ जेथें होय वावो। विरक्ति-निर्वाहो या नांव राया।। ६१६।। भक्ती म्हणजे काय? तर सर्व प्राणीमात्रांच्या ठायी सप्रेम भावना. म्हणजेच केवळ मनुष्यांच्या ठिकाणीच नव्हे, तर या सृष्टीत जे जे काही अस्तित्वात आहे, मग ते सजीव असो की निर्जीव, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल सप्रेम भाव! पण नुसता प्रेमभाव सांगितलेला नाही, तर त्याला भजनयुक्तीची जोडही आहे! हा ‘भजनयुक्ती’ शब्द पटकन निसटतो आणि तोच खूप महत्त्वाचा आहे. सर्व प्राणीमात्रांबद्दल प्रेमभाव असलाच पाहिजे, पण त्या प्रेमभावाचा पाया, हे विश्व ज्या भगवंताचं आहे त्या भगवंताचं प्रेम हाच असला पाहिजे! झाडावर प्रेम आहे, पण मुळालाच पाणी घातलं नाही, तर काय उपयोग? पाना-पानाला पाणी घालत बसलो, पण झाडाच्या मुळाशी पाण्याचा थेंबही घातला नाही, तर पाना-फुलावरच्या प्रेमाला काय अर्थ उरला? तेव्हा जगावर प्रेम करतानाही या जगाचा मूळ आधार जो भगवंत त्याचं भजन मनात असलं पाहिजे आणि ‘भजन’ या शब्दाची विराट व्याख्या याच अध्यायात आपण पाहिली की, चराचरातील प्रत्येक गोष्टीबाबतचं कर्तव्य पार पाडताना त्या गोष्टीची आसक्ती मनात न आणता भगवंताचंच स्मरण साधणं, हे खरं भजन आहे. जर भजनाची ही युक्ती साधली नाही, तर मग काय होईल? तर प्रेम करताना अपेक्षादेखील मनात सहजपणे उफाळून येतील. मग ते प्रेम खरं प्रेमच नसेल, तर ‘मी एवढं केलं, तर त्यानं इतपत तरी केलं पाहिजे,’ असा व्यवहारभाव उत्पन्न होऊ लागेल. तेव्हा भक्तीचा विराट मार्ग हा जगाला प्रेम अर्पायलाच शिकवतो, पण जगाकडून कसंही करून प्रेम ओरपायची भावना निर्माण होऊ देत नाही!

– चैतन्य प्रेम

First Published on August 12, 2019 2:17 am

Web Title: loksatta ekatmatayog 157 mpg 94
Just Now!
X