चैतन्य प्रेम

सर्व चराचरावर निरपेक्ष प्रेम शिकवणाऱ्या आणि भगवंताच्या स्मरणापासून क्षणमात्रही न ढळणाऱ्या भक्तीनंतर कवि नारायण ‘प्राप्ती’ची व्याख्या मांडतो. तो म्हणतो की, ‘प्राप्ति म्हणिजे अपरोक्षस्थिती। भगवत्स्फूर्ती अनिवार!’ अर्थात प्राप्ती म्हणजे अपरोक्ष साक्षात्कार अर्थात भगवद्रूपाची अनिवार स्फूर्ती. अपरोक्षस्थिती म्हणजे काय? स्वामी नित्यबोधानंदतीर्थ यांनी ‘अपरोक्षानुभूती’ या ग्रंथाच्या प्रास्ताविकात अपरोक्षानुभूती या शब्दाची फोड सांगितली आहे. ते म्हणतात, ‘‘आपल्या प्रत्येकाच्या देहात असणाऱ्या आत्मदेवाची, ब्रह्मस्वरूपाची अनुभूती ही अपरोक्षानुभूती. ‘अ’ म्हणजे नाही, ‘पर’ म्हणजे दुसरा, ‘अक्ष’ म्हणजे डोळे आणि अनुभूती म्हणजे अनुभव. अर्थात जो अनुभव आम्हाला घ्यायचा आहे तो आमच्याच डोळ्यांनी, म्हणजे स्वत:च स्वत:ने घ्यायचा आहे. आमच्या देहातील आत्मतत्त्वाचा अनुभव परका म्हणजे दुसरा कोणीही देऊ शकत नाही. जो ज्याचा त्यानेच घ्यावयाचा असतो. अशी ही आत्मानुभूती, स्वानुभूती म्हणजच अपरोक्षानुभूती आहे. स्वत:मधील आत्मतत्त्वाचा स्वत:लाच आलेला प्रत्यक्ष अनुभव होय.’’ इथं कवि नारायण सांगतो की, प्राप्ती कशाची आहे? तर ती अपरोक्षस्थितीची आहे! म्हणजेच आपल्याच देहातील परमतत्त्वाचा साक्षात्कार स्वत: अनुभवून जी आत्मतृप्ती विलसू लागते ती नि:शंक, निश्चिंत, निर्भय आणि परमपूर्ण स्थिती ती अपरोक्षस्थिती! त्या स्थितीत काय घडतं? तर, भगवत्स्फूर्ती अनिवार! म्हणजे भगवंताची, दिव्यत्वाची अनिवार अशी स्फूर्ती होऊ लागते आणि ती अनिवार राहाते. तर सद्गुरू स्मरणाचा आधार न सोडता सर्वाभूती जो प्रेमभाव विलसू लागतो ती ‘भक्ती’ आणि तिच्याबरोबर अभिन्नपणे येणारी ‘विरक्ती’ यांच्याबरोबर येते ती ही दिव्यत्व भावाच्या अनुभूतीची ‘अपरोक्ष स्थिती’. आता ‘विरक्ती’चा अर्थ काय? तर, ‘विरक्ति’ म्हणिजे ऐशी पहा हो। स्त्रीपुत्रदेहादि अहंभावो। समूळ जेथें होय वावो। विरक्ति-निर्वाहो या नांव राया।। म्हणजेच स्त्री, पुत्र, देह यांच्याशी ममत्वाचा जो अहंकार असतो तो समूळ मिथ्या होऊन जाणं याचा अर्थ विरक्ती. माणसाला आपल्या गोतावळ्याबद्दल ममत्व असतं आणि आपल्या देहरूपाबद्दलही ममत्व असतं. हे ‘मी’ आणि ‘माझे’चंच आसक्तीयुक्त प्रेम आहे. ते नष्ट होणं म्हणजे विरक्ती. म्हणजेच प्रथम सर्वाभूती प्रेम आणि त्या सर्वाचा आधार असलेल्या भगवंताचं भजन ही झाली ‘भक्ती’, त्या भगवंताच्या भक्तीनं दिव्य भावाचं स्फुरण ही झाली ‘प्राप्ती’ आणि त्या दिव्यत्वाच्या प्रकाशात ‘मी’ आणि ‘माझे’चा संपूर्ण निरास ही झाली विरक्ती! या तिन्हीचा संयोग ज्याच्या अंतरंगात स्थिरावत असेल, त्याच्या वात्सल्यपूर्ण, करुणामय, दिव्य, अनासक्त, निराग्रही, निरपेक्ष, सरळ अंत:करणाची अथांगता शब्दांत मांडता येणार नाही. जर माणूस संकुचितपणाच्या जोखडातून सुटत असेल आणि व्यापक मनानं चराचराबाबत सहृदय होत असेल, तर ती भक्ती अवश्यमेव करायलाच हवी. कवि नारायणही सांगतो की, ‘‘यालागीं राया निजहितार्थी। आदरें करावी हरिभक्ती। तेणें अवश्य भगवत्प्राप्ती। उपसंहारार्थी कवि सांगे।।६१८।।’’ हे राजा, निजहितासाठी निजहितासाठी, आपल्या खऱ्या हितासाठी हरीची भक्ती अवश्य करावी त्यानं भगवंताची अर्थात व्यापकतेची, दिव्यत्वाची, पूर्णत्वाची प्राप्ती होते.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…