भगवंत व्यापक आहे, त्यामुळे त्याची भक्ती करणाराही अंतरंगातून व्यापक होत जातो. भगवंत परम स्वतंत्र आहे आणि म्हणून त्याची भक्ती करणाराही पूर्वजीवनात स्वत:च निर्माण केलेल्या आणि बळकट केलेल्या अनंत मानसिक, भावनिक बंधनांपासून मुक्त होत जातो. देहानं तो जगात वावरत असतो, पण त्या देहाचा त्याच्यावर पूर्वीसारखा प्रभाव नसतो.  देहाला तो योग्य ते महत्त्व देतो, त्याची काळजी घेतो, पण देह हा आत्माभ्यासासाठी लाभला आहे, हा अग्रक्रम तो कधीच विसरत नाही. हरीभजनानं हा भक्त नित्यमुक्त होतो, पण त्या मुक्तीचंही त्याला कौतुक नसतं! कवि नारायण सांगतो, ‘‘भावें करितां भगवद्भक्ती। भक्त मुक्तीही न वांछिती। तरी त्यांपाशीं चारी मुक्ती। दास्य करिती सर्वदा।।६२३।।’’ भगवंताच्या या भक्तापाशी चारही मुक्ती सदैव वास करीत असतात, पण त्याला त्यांची इच्छाही नसते! श्रीतुकाराम महाराज म्हणतात ना? ‘न लगे मुक्ती धनसंपदा, संतसंग देई सदा’! तसं आहे हे. या भक्ताला सद्गुरूच्या सख्यत्वातच आनंद असतो.  पण ही स्थिती केवळ जो खरा उत्तम भक्त आहे, त्याचीच असते बरं का. भक्तांचे तीन प्रकार कवि नारायण मग सांगतो. हा जो उत्तम भक्त आहे तोच साक्षात्कारी सत्पुरुष म्हणता येईल. सद्गुरू आणि साक्षात्कारी सत्पुरुष यांच्यात सूक्ष्म असा भेद आहे. परब्रह्म स्वरूपाचा देहातला अवतार म्हणजे सद्गुरू, असं ‘गुरूगीते’त भगवान शिवही सांगतात. हा जो खरा सद्गुरू आहे त्याला आपला जन्मावतार कशासाठी आहे, याची आधीपासूनच स्पष्ट जाणीव असते आणि त्या ध्येयासाठीच त्याच्या जीवनातला प्रत्येक क्षण व्यतीत होत असतो. साईबाबा श्यामाला म्हणाले होते ना? की हा तुझा आणि माझा चौऱ्याहत्तरावा जन्म आहे! तेव्हा अशा अवतारी सद्गुरूला जन्माआधीपासून आणि जन्मभर आपल्या परमदिव्य कार्याची जाणीव असते. आता समाजात ‘सद्गुरू’ म्हणून जे वावरतात, पण जे लौकिकापासून, प्रसिद्धी आणि मानसन्मानापासून विरक्त नाहीत, ज्यांना थोडाही विरोध झाला तरी आपली यंत्रणेतील ‘ताकद’ दाखवावीशी वाटते, त्यांना या निकषावर पारखून पाहिलं तरी पुरेसं आहे. हा जो उत्तम भक्त असतो तो कसा असतो? या सगळ्याच ओव्या फार सुरेख आहेत आणि आपण त्या मुळात वाचाव्यात. त्या वाचताना प्रत्येक ओवीबरोबर एकेक सद्गुरूचरित्र डोळ्यासमोर साकारल्याशिवाय राहणार नाही. पण या उत्तम भक्ताच्या वर्णनातील शेवटच्या ओव्यांत कवि नारायण सांगतो की, ‘‘सर्व भूतीं भगवंत पाहीं। भूतें भगवंताचे ठायीं। हें अवघें देखे जो स्वदेहीं। स्वस्वरूप पाहीं स्वयें होय।।६४५।। तो भक्तांमाजी अतिश्रेष्ठ। तो भागवतांमाजीं वरिष्ठ। त्यासी उत्तमत्वाचा पट। अवतार श्रेष्ठ मानिती।।६४६।। तो योगियांमाजीं अग्रगणी। तो ज्ञानियांचा शिरोमणी। तो सिद्धांमाजीं मुगुटमणी। हें चक्रपाणी बोलिला।।६४७।।’’ म्हणजे, सर्व प्राणिमात्रांत जो भगवंताला पाहतो आणि भगवंतामध्ये सर्व प्राणीमात्रांना पाहतो आणि हे सर्व आपल्या ठायीही एकवटलेलं पाहतो तो स्वस्वरूपातच स्थित होतो. तो भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे, भगवंताच्या निजजनांमध्ये वरिष्ठ आहे, तोच उत्तम आहे आणि अवतारही आहे, हे ओळख. तो योग्यांमध्ये अग्रगणी, ज्ञान शिरोमणि, सिद्धांचा मुकुटमणी आहे, असं साक्षात भगवान कृष्णानंही सांगिलं आहे.

– चैतन्य प्रेम