31 March 2020

News Flash

१६६. बंधाचे पंचायतन!

मृगजळात बसलेला जणू त्या जळानं स्नान करीत आहे

मृगजळात बसलेला जणू त्या जळानं स्नान करीत आहे, असं वाटावं, तसा प्रपंचात कर्तव्यरत असलेला उत्तम भक्त हा आपल्याप्रमाणेच प्रपंचात अडकून आहे, असं सर्वसामान्यांना वाटू शकतं. पण प्रपंचात असलेल्या या दोघांमध्ये फार मोठा आंतरिक फरक असतो. आपण प्रपंचात पूर्ण बद्ध असतो, तर उत्तम भक्त हा प्रपंचाच्या बंधनातदेखील मुक्त असतो! चोराला बेडय़ा ठोकतात आणि बेडीचं दुसरं कडं एखादा पोलीस आपल्या हातातही अडकवतो आणि त्या चोराला घेऊन जात असतो. तेव्हा दिसायला दोघंही बेडीमध्ये बद्ध दिसतात, पण चोर हा खऱ्या अर्थानं बद्ध असतो, तर पोलीस हा रुबाबात चालत असतो. तसे आपण प्रपंचात अगदी रुतून गेलो असतो, तर उत्तम भक्त हा प्रपंचात देहानं असूनही मनानं मुक्त असतो. मग सामान्य माणूस प्रपंचात का बद्ध होतो? नाथ महाराज कवि नारायणाचा बोध मांडताना फार सुरेख शब्दरचना योजतात ती म्हणजे ‘बंधाचं पंचायतन’! ते म्हणतात, ‘‘देह-इंद्रिय-मन-बुद्धि-प्राण। हेंचि बंधाचें पंचायतन। क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण। जन्ममरण इत्यादि।। ६६४।। या पांचां स्थानीं अपार श्रम। या नांव म्हणिजे ‘संसारधर्म’। निजभक्तां प्रसन्न आत्माराम। त्यांसी भवभ्रम स्वप्नींही नाहीं।।६६५।।’’ देह, इंद्रिये, मन, बुद्धी आणि प्राण हीच बंधाची पाच स्थाने आहेत. क्षुधा, तृषा, भय, क्लेश आणि जन्म-मरण या पाच स्थानांत भरलेली आहेत. त्यामुळे देह, इंद्रिये, मन, बुद्धी आणि प्राण हे पाचही तहान-भूक, भीती, क्लेश आणि जन्म-मरणाचं चक्र टाळण्यासाठी अपार श्रम करीत असतात. नीट लक्षात घ्या, इथं जन्म-मरणाचं चक्र अभिप्रेत आहे. म्हणजे जीवाला जन्म नकोसा नसतो, पण, ‘मृत्यू म्हणजे जुनी वस्त्रं टाकून नवी वस्त्रं घालण्याइतकी साधी गोष्ट आहे, जुनी वस्त्रं टाकताना आपल्याला वाईट वाटतं का? मग मृत्यूचही वाईट वाटू नये,’ हे तत्त्वज्ञान जीवाला रूचत नाही! त्याला जगायचंच असतं, मृत्यू कधीच नको असतो. फक्त जे जगणं आहे ते उत्तम असावं, अडचणींपासून मुक्त असावं, मनाजोगतं असावं, मानाचं असावं, निरोगी शरीरासह असावं, अशी त्याची स्वाभाविक इच्छा असते. तर या तहान-भूक, भीती, क्लेश आणि मरणभय या गोष्टींचा अडसर जगताना येऊ नये यासाठीचे सर्व अपार श्रम जीव  हा तन, मन, बुद्धी झोकून अगदी प्राणपणानं करीत असतो. हे या पाचांच्या ठिकाणी परिश्रमरत राहणे, हाच संसारधर्म आहे! माणसाचा अवघा प्रपंच या पाच गोष्टींनीच भरलेला असतो. पण जो उत्तम भक्त असतो, निजभक्त म्हणजे जो परमतत्त्वाच्या निकट देह, मन, बुद्धी, इंद्रिय आणि प्राणासह वास करतो त्याच्यावर या संसारधर्माचा प्रभाव पडत नाही. देहानं प्रपंचात असूनही मनानं तो परम तत्त्वाशी एकरूप होत असल्यामुळे त्याच्या मनाला वेगळ्याच शांतिचा, निश्चिंतीचा स्पर्श झाला असतो. त्यामुळे त्याच्या मनातून भीती ओसरली असते. त्यामुळे तहान, भूक (उपजीविकेची साधने), भय (जे घडून गेलं आणि जे घडू शकतं त्याच्या परिणामांच्या अनिश्चिततेनं मनात उमटणारी भावना), क्लेश (मानसिक आणि शारीरिक ) तसंच जन्म-मरण (अस्तित्व टिकवण्यासाठी देह टिकवण्याची धडपड आणि देह गमावल्यास अस्तित्व गमावण्याची भीती) या गोष्टी त्याच्या अंत:करणाला स्पर्श देखील करीत नाहीत. त्यामुळेच सभोवतालचा भवताल स्वप्नातही त्याच्या मनात भ्रम निर्माण करीत नाही.

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 12:11 am

Web Title: loksatta ekatmatayog 166
Next Stories
1 १६५. मृगजळाचं स्नान
2 १६४. भेदाचं मूळ
3 १६३. प्रतिमा-भंग
Just Now!
X