चैतन्य प्रेम

अशाश्वतातून शाश्वत सुख मिळविण्याची आपली धडपड असते आणि अशाश्वत हे अशाश्वत आहे, याचं स्मरणही अधेमधे असतं. म्हणजे जवळच्या माणसांचा संयोग कायमचा नसतो. परिस्थितीनुरूप माणसं शरीरानं किंवा मनानंही दूर जाऊ शकतात आणि मृत्यूनं तर त्यांचा कायमचा वियोग होतो, हे आपण जन्मापासून सभोवताली बघत आलो आहोत. वस्तूंचाही संयोग कायमचा नसतो, हादेखील अनुभव असतो. तरीही या अशाश्वताच्या आधारानं शाश्वत सुख मिळेल, हा भ्रम काही संपत नाही. अशाश्वत, अस्थिर अशा भौतिकाला चिकटलेलं अंत:करण जर शाश्वत आणि स्थिर परमात्म तत्त्वाला चिकटेल, तरच त्याच्या जीवनातली अस्थिरता ओसरेल, असं संत सांगतात. हा जो उत्तम भक्त आहे तो मन, चित्त, बुद्धी आणि अस्तित्वभावनेनं परमात्म तत्त्वालाच चिकटून असतो. त्यामुळे त्याच्या वाटय़ाला भय येत नाही. कवि नारायण सांगतो, ‘‘भावें करितां भगवद्भक्ती। क्षुधेतृषेची नव्हे स्फूर्ती। एवढी पावले अगाध प्राप्ती। ते भवभयें निश्चितीं डंडळतीना।।६६७।।’’ भगवंताच्या भक्तीत जर संपूर्ण भाव एकवटला, तर तहान-भुकेचीही जाणीव उरत नाही. या अगाध प्राप्तीनं हा भक्त संसारभयानं डळमळीत होत नाही. इथं तहान-भूक ही केवळ पाण्याची वा अन्नाची नव्हे, तर भौतिकाच्या प्राप्तीचीच तहानभूक आहे. जेव्हा भाव हरीचरणी एकवटतो, तेव्हा भौतिकाची तहान-भूक ओसरते आणि एकदा का भौतिकाच्या प्राप्तीची भूक किंवा अतृप्ती उरली नाही, तर मग भवभय तरी कुठून उरणार? आपला भाव सध्या जगात विखुरला गेला आहे. जगाच्याच आधारानं सुख मिळेल, या भावनेमुळे जगाचे आपण भावनिक गुलाम झालो आहोत. हा विखुरलेला भाव एकवटवण्यासाठी साधना आहे. साधना तरी मनात काय बिंबवते? तर माझ्या जीवनाचा सूत्रधार भगवंत आहे, त्यामुळे माझ्या हिताचं जे असेल, ते तो घडवील. जर माझ्या जीवनात काही दु:खाचं घडत असेल, तर त्यातही माझंच हित असलं पाहिजे. ते दु:खंही मला काहीतरी शिकवण्यासाठीच आलं असेल, असा आतंरिक भाव तयार होत जाईल. आता इथं सामाजिक दु:खं अभिप्रेत नाहीत आणि अगदी खरं सांगायचं तर व्यक्तिगत दु:खापलीकडे अन्य कोणतंही दु:खं आपल्याला इतकं अस्वस्थ करीत नाही की ज्याच्या निवारणासाठी आपण सर्व क्षमतेनिशी प्रयत्न करू! तर भक्ती ही या व्यक्तिगत दु:खांचा प्रभाव एकतर कमी करते किंवा त्या दु:खांतून मार्ग काढण्याचे प्रयत्न करण्यासाठी मनाची शक्ती जागी करते आणि  त्या प्रयत्नांना सकारात्मकतेचीही जोड देते. मग, ‘‘मनामाजीं भवभयभरणी। तें मन रातलें हरिचरणीं। आतां भयातें तेथ कोण मानी। मन मनपणीं असेना।।६६८।।’’ म्हणजे जे मन भवभयानं भरलं असायचं, तेच आता हरीच्या चरणांपाशी एकवटलं आहे.  मनच मनपणानं उरलं नाही, मग आता भयाची जाणीव तरी कशी आणि कुणाला होणार? कारण मन जागं असतं, तेव्हाच ‘मी’ची जाणीव जागी असते. ‘मी’ जागा असतो तेव्हा ‘माझे’ची भावनाही दृढ असते. मग जे जे ‘माझे’ आहे किंवा व्हावंसं वाटतं ते ते टिकवण्याची आणि मिळवण्याची धडपड अव्याहत असते. त्यातूनच भवभयाचा चिखल मनात साचत असतो. पण जेव्हा मनच मनपणानं उरत नाही तेव्हा ‘मी’ची सत्ता मावळते. मग ‘माझे’चा पगडाही संपतो आणि भवभयाचा प्रभावही उरत नाही.