मन जेव्हा मनपणानं उरत नाही, तेव्हा ‘मी’देखील उरत नाही. ‘मी’चा प्रभाव संपला की ‘माझे’चा पगडाही संपतो. मग ‘माझे’ टिकवण्याची तळमळ, त्याच्या वियोगाची भीती, हे सारं संपतं. जेव्हा हे मन अहंभावानं जागं असतं तेव्हा काय होतं? कवि नारायण सांगतो की, ‘‘मनीं स्फुरे द्वैताची स्फूर्ती। तेथ भवभयाची दृढस्थिती। ते मनीं जाहली हरीची वस्ती। यालागीं भवभयनिवृत्ती द्वैतेंसीं।।६६९।।’’ मन अहंभावानं जागृत असलं की, द्वैताची स्फूर्ती होते. द्वैत म्हणजे काय? तर संपूर्ण जग हे एकाच चैतन्य तत्त्वानं भरून असताना, त्या एकाच चैतन्य तत्त्वाच्या आधारावर टिकून असताना आणि त्या एकाच चैतन्य तत्त्वात लय पावत असताना स्वत:ची स्वतंत्र सत्ता मनात निर्माण होणं. मग ‘मी’ आणि ‘माझे’ अधिक दृढ होतं. त्यामुळे ओघानंच ‘मी’ ला जे जे भावतं ते सुखाचं आणि जे जे भावत नाही ते दु:खाचं, अशी विभागणी होते. या सुख आणि दु:ख अर्थात सुखाची आवड आणि दु:खाची नावड, सुखाची प्रीती आणि दु:खाची भीती यातूनच यश-अपयश, मान-अपमान, लाभ-हानी, अनुकूलता-प्रतिकूलता अशी द्वैताची साखळी तयार होत जाते. एका अहंभावानं द्वैत आणि त्यायोगे भवभयाची स्थिती दृढ होत जाते. पण त्याच मनात जेव्हा हरीची वस्ती होते तेव्हा द्वैतासकट भवभयाचीही निवृत्ती होते. आता ‘हरीची वस्ती’ म्हणजे काय? श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत, ‘तुम्ही तुमच्या हृदयात मला जागाच ठेवत नाही!’ म्हणजे या हृदयात अहंकार, लोकेषणा म्हणजे जगाची ओढ, जगाचं प्रेम, जगाची आसक्ती, वित्तेषणा म्हणजे भौतिकासाठीची तळमळ, दारेषणा म्हणजे कामनापूर्तीची आस अशा सगळ्या गोष्टी भरून आहेत. मग तिथं सद्गुरूंचा निवास कसा होणार? जेव्हा केवळ त्यांच्याविषयीचंच प्रेम, त्यांच्या बोधानुसार जगण्याची आवड असेल, तर त्यांना त्या हृदयात निवास करायला आवडेल ना? तर हरीची वस्ती म्हणजे हरीला जे जे आवडतं त्याची आवड त्या मनात असली पाहिजे. हरीला म्हणजे खऱ्या सद्गुरूला काय आवडतं? तर परम तत्त्वाप्रती अव्यभिचारी निष्ठा, परम तत्त्वाच्या अनुसंधानात जगणं, सद्गुरू बोधानुरूप जीवन व्यवहार, वृत्तीचा सरळपणा, जगण्यातली सहजता आणि साधेपणा, मानसन्मान-मोठेपणा-प्रसिद्धी यांची नावड अशा काही गोष्टी सांगता येतील. अशा भक्ताचं जीवन अगदी सहज, सरळसाधं असतं. त्याच्या मनात परम तत्त्वाप्रती अव्यभिचारी निष्ठा असते. ‘अव्यभिचारी’ म्हणजे त्या निष्ठेच्या जोरावर भौतिकातलं काही मिळवण्याचा सुप्त हेतू त्याच्या मनातही नसतो. अशा भक्ताचा भगवंतही त्याचा ऋणी होतो! मनाचं असं सुमन होतं तसंच बुद्धीचीही सुबुद्धी झाली असते. कवि नारायण सांगतो, ‘‘देहबुद्धीमाजीं जाणा। नानापरी उठती तृष्णा। ते बुद्धि निश्चयें हरीच्या स्मरणा। करितां परिपूर्णा विनटली स्वयें।।६७०।।’’ देहबुद्धीमध्ये अनंत तृष्णांचं बीज असतं. म्हणजे देहबुद्धी जागी झाली की ती अनेक गोष्टींच्या प्राप्तीसाठीची तहान जागी करते. तीच बुद्धी हरीच्या स्मरणात दृढ झाली की मग त्या हरीपाशीच पूर्णपणे जडून जाते. मग अशा बुद्धीत भौतिकाची सूक्ष्म ओढ क्वचित उत्पन्न झालीच तरी, ‘‘जेथें जें जें स्फुरे तृष्णास्फुरण। तेथें स्वयें प्रगटे नारायण। तेव्हां तृष्णा होय वितृष्ण। विरे संपूर्ण पूर्णामाजीं।।६७१।।’’ त्या बुद्धीत तृष्णा स्फुरताच त्या जागी सद्गुरूस्मरण प्रगटतं आणि मग अतृप्ती पूर्णतृप्तीत विरून जाते!

– चैतन्य प्रेम