चैतन्य प्रेम

सोन्याचं कुत्रं केलं म्हणून सोन्याची किंमत काही कमी होत नाही. अगदी त्याचप्रमाणे देहरूपात आलेला भक्त स्वत:ला ‘मी म्हणजे देह’ या ओळखीत चिणून टाकत नाही. आपण देहभावात जगत असतो आणि म्हणूनच आपल्या देहाला जोपासण्यात, देहाच्या आवडी-निवडी जपण्यात आणि देहाला ज्यायोगे सदोदित अनुकूलता लाभते त्या अनुकूलतेच्या प्राप्तीच्या धडपडीत सदैव मग्न असतो. त्या देहभावामुळेच आपण स्वत:ला कर्ता  मानतो. अर्थात कर्तेपणाचा अहंकार बाळगतो. पण हा जो भक्त आहे तो स्वत:ला केवळ निमित्त मानतो, कर्ता नव्हे! कवि नारायण सांगतो,  ‘‘तो कर्म करी परी न म्हणे ‘मी कर्ता’। जेवीं गगनीं असोनि सविता। अग्नि उपजवी सूर्यकांता। तेवीं करोनि अकर्ता निजात्मदृष्टीं।।७०६।। सूर्ये सूर्यकांतीं अग्निसंग। तेणें होतु याग कां दाध। तें बाधूं न शके सूर्याचें अंग। तेवीं हा चांग करूनि अकर्ता।।७०७।।’’ सविता म्हणजे सूर्य; तर सूर्य ज्याप्रमाणे आकाशात असूनही त्याच्या तेजानं पृथ्वीवर अग्नि निर्माण होतो; पण त्या अग्निनं यज्ञ होवोत की दावाग्नि भडको, त्यानं सूर्याचं अंग काही भाजत नाही. त्याप्रमाणे भक्ताच्या देहानं कर्म घडतात, पण ती र्कम त्याला बाधत नाहीत. हे थोडं समजून घेऊ. इथं सूर्याच्या तेजानं अग्नी निर्माण होतो, असं म्हटलं आहे आणि या अग्नीचा व्यापक अर्थही लक्षात घेतला पाहिजे. सूर्यामुळेच तर जीवसृष्टी नांदती आहे. त्याच्या प्रकाशानं व तेजानं अनंत गोष्टी घडत आहेत. पाण्याची वाफ होऊन त्याचं ढगांत रूपांतर होतं आणि मग पाऊस पडून ते पाणी सृष्टीला परत मिळतं, या एका प्रक्रियेनंच अवतीभवतीची विराट जीवसृष्टी नांदत आहे. पण हे मी केलं किंवा माझ्यामुळे घडलं, असा भावही सूर्याच्या मनात नाही. नव्हे, आपल्यामुळे काय घडत आहे, हे पाहायलाही सूर्याला उसंत नाही! तशी भक्ताकडून सदैव अनंत सत्कृत्य घडत असतात, अनंत र्कम घडत असतात; पण त्याचं कर्तेपण तो स्वत:कडे घेत नाही की कर्तेपणाच्या अहंकारानं फुलून जात नाही. कवि नारायण सांगतो, ‘‘अचेतन लोह चुंबकें चळे। लोहकर्मे चुंबक न मैळे। तेवीं हा कर्मे करुनि  सकळें। अनहंकृतिबळें अकर्ता।।७०८।।’’ काय सुंदर रूपक आहे! लोहचुंबक हा अचेतन असतो म्हणजे तो हालचाल करीत नाही; पण त्याच्या संपर्कात खिळे, टाचण्या वगैरे  लोखंडी वस्तू हालचाल करताना दिसतात. पण त्या हालचालीत लोहचुंबक सामील होत नाही. तद्वत हा उत्तम भक्त देहाकडून जी जी र्कम होतात, त्यात मनानं रूतत नाही. म्हणजेच कर्तव्यभावनेनं तो प्रत्येक कर्म सहजतेनं आणि अचूकतेनं करतो. पण कर्माचा कर्तेपणा घेत नाही की कर्मापासूनच्या फळाच्या अपेक्षेत अडकत नाही. इतकंच नव्हे, तर हा भक्त जातीपातीच्या जाणिवेतही अडकत नाही (जन्म-कर्म-वर्णाश्रम-जाती। पूर्ण भक्त हातीं न धरिती।). श्रेष्ठत्वाच्या भावनेनं भल्याभल्यांना गुंतवलं आहे. कवि नारायण सांगतो, ‘‘ऐशा नाथिल्या अहंकृती। ब्रह्मादिक गुंतले ठाती। वाढवितां वर्णाश्रम जाती। सज्ञान गुंतती निजाभिमानें।। ७१९।। ऐशी अहंतेची अतिदुर्धर गती। ब्रह्मादिकां नव्हे निवृत्ती। सोडूं नेणे गा कल्पांतीं। सज्ञान ठकिजेती निजाभिमाने ।।७२०।।’’ अहंतेच्या या भ्रमात भलेभले फसतात आणि कल्पांतीही तो भ्रम त्यांना सुटत नाही.

chaitanyprem@gmail.com