चैतन्य प्रेम

ज्याला शुद्ध परमार्थ करायचा आहे, त्याला जनमानाची गोडी सोडावीच लागते. आता शुद्ध परमार्थ म्हणजे काय? आपले अनंत जन्मं झाले आहेत, पण ‘शितावरून भाताची परीक्षा’ या म्हणीनुसार या जन्मातलं आतापर्यंतचं जगणं पाहिलं तरी पुरेसं आहे. अध्यात्माच्या मार्गावर येईपर्यंत परमार्थ काय, ते आपल्याला माहीत नव्हतं. उमजू लागलं त्या वयापासून स्वार्थ मात्र हाडीमांसी खिळला होता. त्या स्वार्थामुळेच वास्तवाचं भान न येता अवास्तव कल्पना व भावनांच्या ओढींनुसार जगणं सुरू होतं. त्यातून जी अनंत र्कम घडत होती त्या कर्माची फळंही तशीच होती. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत ना, त्याप्रमाणे- पाप करायचं असेल तर अवश्य करा, पण त्याचे भोगही मग स्वीकारावे लागतील! खरं तर माणसाचा पापाकडेच ओढा असतो, पण त्याला फळ मात्र पुण्याचं हवं असतं! हे ‘पाप’ म्हणजे काय? तर देहमनाच्या ओढींनुसार जसं जगायचं आहे तसं जगणं. पण त्या जगण्याचे दुष्परिणाम माणसाला नकोसे असतात. साधं उदाहरण घ्या. एखाद्याला मधुमेह आहे, तर त्यानं गोड काही खाता कामा नये. पण मनावर ताबा नसल्यानं त्याला गोड तर खायचं असतं आणि त्यापायी प्रकृतीच्या तक्रारी वाढू नयेत, असंही वाटत असतं. तसंच ‘मी’ आणि ‘माझे’च्या ओढींनुसार लुभावणारं जे जे कृत्य आहे ते ते करावंसं वाटतं. पण त्याचा दुष्परिणाम वाटय़ाला येऊ नये, अशी इच्छा असते. तेव्हा ‘मी’ व ‘माझे’नं व्यापलेल्या या स्वार्थाचरणापल्याड नेणारं जे ज्ञानाचरण आहे तीच परमार्थाची सुरुवात आहे. स्वार्थाच्या पकडीतून सुटण्याचा प्रामाणिक अभ्यास करणाऱ्यांस नाथांनी ‘चिरंजीवपदा’त कळकळीनं बोध केला आहे. ज्यानं विषयेच्छा पूर्ण सोडली आहे, त्याचा देह हा परमार्थ प्राप्तीचं पूर्ण साधन बनतो, हे खरं. पण इंद्रिययुक्त देह आहे तोवर त्या इंद्रियांनुसार मनाला भुलवणारे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पाच गळ आहेतच. त्यातला पहिला गळ आहे तो ‘शब्द’ व या शब्दांनी लोकांकडून होणारी स्तुती! त्या स्तुतीची सुरुवात कशी असते? नाथ सांगतात, ‘‘वैराग्य पुरुष देखोनी। त्याची स्तुती करिती जनीं। एक सन्मानेंकरोनी। पूजेलागोनि पैं नेती।।१३।।’’ वैराग्याचा प्रामाणिक अभ्यास करणारा साधक पाहून लोक स्तुती करतात. काहीजण त्याचा मानसन्मान करतात, त्याला प्रेमादरानं बोलावून पूजतात. ‘‘त्याचें वैराग्य कोमळ कंटक। नेट न धरीच निष्टंक। देखोनि मानस्तुति अलोकिक। भुलला देख पैं तेथें।।१४।।’’ पण वैराग्य कोवळ्या काटय़ासारखं लवचीक असल्यानं ते नेट धरू शकत नाही. त्या अलौकिक मान व स्तुतीला तो भुलतो. ‘‘जनस्तुति लागे मधुर। म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार। आम्हांलागीं जाहला स्थिर। तेणें तो धरी फार ‘शब्दगोडी’।।१५।।’’ ही स्तुती कशी असते? तर, हा वैराग्यशील पुरुष म्हणजे जणू हरीचाच अवतार आहे.. अशा मधुर स्तुतीनं ‘शब्दगोडी’च्या गळात तो अडकतो. नाथ म्हणतात, ‘‘हा पांच विषयांमाजीं प्रथम। ‘शब्द’ विषयसंभ्रम!’’ शब्दयोजना पाहा : हा शब्द विषय संभ्रम वाढविणारा आहे!  मग विषय संभ्रमाच्या दुसऱ्या गळाकडे नाथ लक्ष वेधतात,‘‘मग ‘स्पर्श’ विषय सुगम। उपक्रम तो ऐसा।।१६।।’’