मृगमायेनं भरताला दुसरा जन्म मिळाला तो हरणाचाच होता, पण त्या जन्मात त्याचं पूर्वजन्माचं स्मरण जागं होतं. त्यामुळे तो हरणाचा जन्म त्यानं हरिस्मरणातच व्यतीत केला. त्यासाठी ऋषीमुनींच्या आश्रमालगतच तो राहात असे. त्याच्या कानावर त्यामुळे सदोदित भगवंताचीच चर्चा पडत असे. तो जन्म सरला आणि तिसरा जन्म मिळाला तो जडभरताचा. खरं तर त्याचं या जन्मातलं नावही भरत असंच होतं. एका ज्ञानसंपन्न आणि ऐहिकदृष्टय़ाही श्रीमंत अशा ब्राह्मणाच्या घरी तो जन्मला होता. मात्र या जन्मी मागील दोन्ही जन्मांचं स्मरण असल्यानं हा जन्म वाया जाऊ द्यायचा नाही, असा त्यानं दृढनिश्चय केला. पित्याचं त्याच्यावर अकृत्रिम प्रेम होतं आणि म्हणूनच आपल्या या पुत्राला वेदशास्त्रसंपन्न करण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र ज्ञानानं माणूस समजंस होण्याऐवजी, संवेदनशील होण्याऐवजी आणि सूक्ष्म भगवंताशी एकरूप होण्याऐवजी अहंकारी होण्याचाच धोका मोठा असतो, हे जाणून भरतानं अडाणीपणाचं सोंग घेतलं आणि ते दीर्घकाळ जपलं. अंगापिंडानं धष्टपुष्ट असलेला हा पुत्र शारीरिक कामांमध्ये प्रवीण आहे, पण ज्ञानाभ्यासात त्याला काडीचीही गती नाही, या जाणिवेनं पित्याला अपार दु:खं होत असे. विशेष म्हणजे भरत हा कुणाशी काही बोलतही नसे. कुणी खायला दिलं तर खात असे. कुणी कामाला बोलावलं तर लगेच जात असे. कोणाची ओझी वाहावीत, कुणाच्या शेतीत श्रम करावेत, कुणाला रांजणभर पाणी वाहून आणून द्यावं; अशी शारीरिक कष्टाची कामं तो सहज करीत असे. मात्र कुणाशी एका शब्दानंही न बोलणाऱ्या आणि ज्ञानाभ्यासातही अत्यंत कच्च्या असलेल्या  भरताचं नाव म्हणूनच ‘जडभरत’ असं पडलं! पित्याच्या आणि मातेच्या निधनानंतर घरात त्याची एखाद्या नोकरापलीकडे किंमत नव्हती. कष्टाची कामं आली की भरताला बोलवावं आणि ती नसली की त्याचा यथेच्छ अपमान करावा, असाही प्रकार होत असे. पण भरत अपमानानं, देहदु:खानं, कष्टानं कधीही खचत नसे. नव्हे, त्याच्या चेहऱ्यावर कोणतीच प्रतिक्रियाही उमटत नसे. एकदा असाच तो एका झाडाखाली बसला होता. तोच तिथून राजा रहूगणाची पालखी चालली होती. राजा रहूगण याला ज्ञानाचं आकर्षण होतं. त्यासाठी विविध ग्रंथ वाचून घ्यावेत, त्यावरील निरूपण ऐकावं, वेगवेगळ्या साधुसंतांच्या दर्शनाला जावं, त्यांना आत्मज्ञानाविषयी विचारावं, याचा त्याला छंद होता. बहुधा त्याच हेतूनं तो कुठल्याशा आश्रमाकडे निघाला असतानाच त्याची पालखी वाहून नेणाऱ्यापैकी एक जण आजारी पडला आणि म्हणून पालखी खांद्यावरून वाहू शकणाऱ्या चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू झाला. तोच झाडाखाली बसलेल्या आणि अंगापिंडानं मजबूत असलेल्या भरताकडे राजसेवकांचं लक्ष गेलं. त्यांनी भरताला पालखी वाहण्याच्या कामी येण्यास सांगताच त्यानं शांतपणे एका बाजूनं पालखी खांद्यावर घेतली. कोणत्याही स्थितीत भरताची आंतरिक जागृती कधीच ओसरत नसे. त्या ज्ञानाच्या प्रकाशातच तो पावलं टाकू लागला. मात्र रस्त्यावरून जाताना आपल्या पावलाखाली किडय़ामुंग्या येऊ नयेत याकडेही त्याचं लक्ष होतं. त्यामुळे झालं असं की पालखीची गती मंदावू लागली. राजा क्रोधित झाला आणि त्यानं आपल्या सेवकांना खडसावलं. त्यावर घाबरून त्यांनी जडभरताकडे बोट दाखवलं आणि म्हणाले की, ‘‘महाराज, या नव्या माणसामुळे आमची चाल चुकत आहे!’’

– चैतन्य प्रेम