भौतिकातील ज्ञानाला महत्त्व नाही, असं नव्हे, पण आधीच सांगितल्याप्रमाणे मनातल्या अनंत इच्छाभ्रमांचा भवसागर कसा पार करायचा, त्याचा प्रभाव कसा ओलांडायचा, हे केवळ ज्या विशुद्ध ज्ञानानं कळतं ते सद्गुरूप्रदत्त आत्मज्ञानच. अर्थात या जगाचं आणि माझं खरं स्वरूप त्यानं उमगतं आणि मग या जगाशी माझा नेमका संबंध काय, या जगात मी नेमकं कसं राहायचं आहे, हेदेखील जाणवू लागतं. ‘मी’चं खरं स्वरूप ज्या योगे उकलतं त्या या विशुद्ध ज्ञानासाठीची एकमेव उपासना म्हणजे भक्ती! आपणही जन्मापासून भक्तीच तर करत असतो! ती भक्ती असते ‘मी’ आणि ‘माझे’ची. म्हणजेच देहाची आणि जगाची! जगाची ही भक्ती सोडून भगवंताची भक्ती करायची आहे. गंमत अशी, की जग दिसत असतं, पण भगवंत अदृश्य असतो. त्यामुळे जग खरं भासतं आणि संत म्हणतात म्हणून आपण भगवंताचं अस्तित्व मानत असलो, तरी जगाइतकी त्याच्या अस्तित्वाची भावना पक्की नसते. बरं जग दिसतं खरं, पण त्या जगाचं स्वरूप काही नुसतं पाहून लक्षात येत नाही. अनेकदा जे दिसतं तो दृष्टीभ्रमही असू शकतो, हे अनुभवानंही उमगतं, पण मन मानत नाही. स्वामी नित्यबोधानंदतीर्थ यांनी ‘अपरोक्षानुभूती’ या ग्रंथाच्या विवरणात म्हटलं आहे की, ढगांनी वेढलेला चंद्र आपण पाहतो, पण प्रत्यक्षात तो चंद्र त्या ढगांपासून कितीतरी दूर असतो. तसंच वाऱ्यानं ढग वाहू लागतात तेव्हा आपल्याला वाटतं की चंद्रच धावत आहे. बरं, चंद्र स्वत:भोवती आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असला तरी तो स्थिरच दिसतो! तेव्हा जे दिसतं ते जसं दिसत असतं तसंच खरं असतं, असं नव्हे. अगदी त्याचप्रमाणे जगाचं जे रूप आपण पाहात असतो, तसंच जग नसतं. जगाचं खरं स्वरूप काय आहे? तर ते सतत बदलतं आहे. या जगात असंख्य माणसं आहेत आणि त्या प्रत्येक माणसाचं भावविश्व हे अनंत इच्छा, वासना आणि कामनांनी भरलेलं आहे. त्यामुळे समन्वय आणि संघर्ष अशा दोन टोकांवर या जगात आपला एकमेकांच्या इच्छांशी सतत संबंध येत असतो. एकमेकांचा स्वार्थही एकमेकांच्या आड येत असतो. दुसऱ्यांनी नि:स्वार्थी असावं, अशी प्रत्येकाची भावना असते. स्वार्थ सोडायला मात्र कुणीच तयार नसतो. तेव्हा अशा या जगात विरक्त भावानं राहिल्याशिवाय मन निर्लिप्त होणं साधत नाही. मन निर्लिप्त झाल्याशिवाय जगाचं खरं स्वरूप ठसत नाही. जगाचं खरं स्वरूप ठसल्याशिवाय त्या जगाचा प्रभाव झुगारता येत नाही. जगाचं खरं स्वरूप ज्या योगे उकलतं ते ज्ञान आणि त्या ज्ञानासाठी आवश्यक ती विरक्ती केवळ भक्तीनंच सहजसाध्य होते. हेच परमार्थाचं सार आहे. या भक्तीवाचून अन्य काही विचार करू नकोस, असं जनार्दन स्वामींनी एकनाथांना सांगितलं (मुख्य ती उपासना भक्ती। ज्ञान विरक्ति तेणं जोडे।। १।। हेंचि एक परमार्थ सार। आणिक विचार करूं नये।।२।।). योग, याग आणि तप कितीही केलंस तरी मनाचा बाधक संकल्प काही ओसरणार नाही. त्यामुळे सावध होऊन हृदयात सद्गुरूबोधाचं सतत स्मरण हाच एकमेव उपाय आहे (योगयाग तपतां तप। न जाय संकल्प मनीचा।। ३।। म्हणे जनार्दन एकनाथा सावध। हृदयीं गोविंद आठवी सदा।।४।।). जोवर ही भक्ती नाही, तोवर समाधानही नाहीच!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com