गीतेमध्येही भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की, ‘‘हे अर्जुना मी माणसाच्या रूपात जन्मलो की मूढ लोक मला ओळखू शकत नाहीत.’’ अर्थात भगवंताचं जे दिव्यत्व आहे, त्याचं जे सर्वव्यापकत्व आणि कर्तेपण आहे, ते मूढ लोक ओळखू शकत नाहीत. ते त्याच्याबरोबर देहबुद्धीनंच वावरतात. त्यामुळे त्याच्या सहवासाचा, जवळ असण्याचा जो खरा परमलाभ असतो तो त्यांना साधत नाही. ‘परमहंस’ म्हणजे शाश्वताशी लय पावलेलं परमतत्त्व. त्या परमतत्त्वानंच जो व्याप्त आहे त्याला केवळ जो विवेकी आहे, तोच जाणू शकतो. ( ते परमहंसीं आरूढ। तिसी विवेकहंस जाणती दृढ।) मात्र जो विवेकी नाही, अर्थात जो अविवेकी आहे, जो नश्वरात, अशाश्वतात मनाच्या आसक्तीप्रवण ओढींनी गुंतला आहे आणि म्हणूनच जो मूढ आहे, ज्याचं भाग्यच अत्यंत मंद आहे, त्याला मात्र समोर ढळढळीतपणे असलेला सद्गुरू दिसत नाही! (जवळी असतां न देखती मूढ। अभाग्य दृढ अतिमंद।।) हे ‘सद्गुरू न दिसणं’ म्हणजे काय? तर सद्गुरू दिसत नाही म्हणजे त्याची कळकळ, जिवाप्रतिची त्याची तळमळच दिसत नाही. मग अशांची मति मूढ असते. त्यांचं भाग्य मंद असतं. नुसतं मंद नव्हे, अतिदृढपणे मंद असतं! याचं कारण ज्यानं ते भाग्य उजळतं त्या कृतीशील वाटेवर त्याचं पाऊलही पडत नाही. शारदेचं हे वंदन ३४व्या ओवीपर्यंत आहे आणि त्यानंतर आहे ते सज्जनांचं वंदन. अर्थात भगवंताशी, परमतत्त्वाशी, सद्स्वरूपाशी जे  अनन्य भावानं एकरूप आहेत, अशा भक्तजनांचं अर्थात सद्गुरूंचंच हे वंदन आहे. या सज्जन वंदनेतही सद्गुरूंचं स्वरूप आणि त्यांचं जीवउद्धाराचं कार्य यांचंच विराट दर्शन आहे. या सगळ्याच ओव्या अत्यंत मननीय आहेत. ‘जवळी असतां न देखती मूढ, अभाग्य दृढ अतिमंद,’ हेच सूत्र या ओव्यांतून पुढे नेताना नाथ सांगतात : ते जगामाजीं सदा असती। जीवमात्रातें दिसती। परी विकल्पेंचि ठकिजती। नाहीं म्हणती नास्तिक्यें।। ४२।।  हा सद्गुरू जगात सदैव असतो. तो जीवमात्रांनाही दिसतो, पण विकल्पामुळे जीव ठकतो आणि मग हा सद्गुरू असूनही तो नसल्याचंच आपण मानतो! म्हणजे भोंदू, बाजारू गुरुंची चलती असते, पण जिथं शुद्ध परमार्थ असतो तिथपर्यंत पोहोचूनही माणूस खऱ्या अर्थानं पोहोचत नाही! एक सत्पुरुष म्हणाले की, ‘‘जिथं चांगला फोटो काढून मिळतो अशाच दुकानात लोकांची गर्दी असते! जिथं तुम्ही जसे असता तसाच फोटो काढला जात असेल तर त्या दुकानात लोकांची वर्दळ कमी असते!’’ म्हणजे भौतिकात बुडालेल्या माणसाला त्या भौतिकासाठीच प्रोत्साहन देणारा गुरू आवडतो, खरा वाटतो. जो भौतिकातला फोलपणा वारंवार लक्षात आणून देतो, त्या भौतिकाच्या आसक्तीतून सोडवू पाहतो तो आवडत नाही. अशा सद्गुरूकडे गर्दी कमीच असायची! त्याच्याबद्दल मनात विकल्प यायचेच. खरं तर अशा सद्गुरूचा नुसता सहवास हीच साधना असते, हे स्पष्ट करताना याआधीच्या ओव्यांत नाथ सांगतात: ते पाहती जयांकडे। त्यांचें उगवे भवसांकडें। परब्रह्म डोळियांपुढें। निजनिवाडें उल्हासे।।४०।। तेथें साधनचतुष्टय़सायास। न पाहती शास्त्रचातुर्यविलास। एक धरिला पुरे विश्वास। स्वयें प्रकाश ते करिती।। ४१।। म्हणजे ज्यांच्याकडे ते कृपादृष्टी टाकतात त्या जिवाचं भवसंकट ओसरतं आणि त्याच्या डोळ्यापुढे परमतत्त्व प्रकाशमान होतं.

– चैतन्य प्रेम