एकनाथ महाराज सद्गुरूवंदना करीत आहेत आणि ‘एकनाथी भागवता’तील सद्गुरूवंदनेच्या या सर्वच ओव्या अत्यंत मार्मिक आणि सखोल आहेत.  या सद्गुरूच्या कृपाकटाक्षानं काय साधतं? नाथ महाराज म्हणतात, ‘‘जयाचेनि कृपाकटाक्षें। अलक्ष्य लक्ष्येंवीण लक्षे।’’ त्यांचा कृपापूर्ण कटाक्ष असा आहे की त्यायोगे अलक्ष्य असलेली वस्तूही लक्ष दिल्याशिवाय लक्षात येते! अलक्ष्य वस्तू लक्षिल्याशिवाय लक्षिली जाते. पुढे नाथ सांगतात, ‘‘तेणें जीवेंवीण जीवविलें। मृत्यूवीण मरणचि मारिलें। दृष्टि घेऊनि दाखविलें। देखणें केलें सर्वाग।। ८२।।’’ भक्ताला सद्गुरू कसं आपल्यात पूर्ण एकरूप करून टाकतो, याचं हे वर्णन आहे! या भक्ताचा आता संसारात जीव रमत नाही, पण तरीही त्याला याच संसारात तो जगवत आहे, त्या भक्ताच्या ‘मी’ आणि ‘माझे’चा मृत्यू त्याला उघडय़ा डोळ्यांनी दाखवला आहे आणि या ‘मी’च्या मरणाचा सोहळा तो अनुभवू लागला आहे, जगाकडे असलेली त्याची दृष्टीच सद्गुरूनं काढून घेतली आहे आणि ती दृष्टी काढून त्याला क्षणोक्षणी सत्यदर्शन साधून दिलं आहे. आता त्याला केवळ शाश्वताचंच दर्शन घडतं. गोरक्षनाथांच्या आणि मच्छिंद्रांच्या लीलाचरित्राचा वेध आपण ‘पूर्ण-अपूर्ण’ या गुरुगीतेवरील सदरात घेतला होताच. त्यातही अशी एक कथा आहे की, गोरक्षनाथ भिक्षा मागायला गेले आणि एका घरी काही सोहळा होता. त्यामुळे पंचपक्वान्नांचं भोजन होतं. घरातल्या सौंदर्यवती ललनेनं ती भिक्षा गोरक्षनाथांना घातली. ती घेऊन गोरक्षनाथ आले तेव्हा त्यातले वडे मच्छिंद्रनाथांना आवडले. त्यांनी गोरक्षनाथांना पुन्हा त्याच घरी जाऊन ते आणायला सांगितले. गोरक्षनाथ गेले तेव्हा त्या ललनेनं डिवचलं की, ‘‘गुरूचं नाव सांगून तू मलाच पाहण्याच्या बहाण्यानं आला आहेस. तू तुझे डोळे काढून दे, मगच मी भिक्षा देते.’’ गोरक्षनाथांनी तत्काळ तसं केलं तर घाबरून तिनं त्यांची क्षमा मागितली. गोरक्षनाथ डोळ्यावर फडकं घट्ट धरून मच्छिंद्रांकडे गेले. त्यांनी वारंवार विचारलं की डोळ्यावर हे फडकं का, तर प्रथम ते सांगेनात. मग घडला प्रकार कळला तेव्हा मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांच्या डोळ्यांवरून हात फिरवला आणि त्यांना दिव्य दृष्टी लाभली. म्हणजेच जगाकडे लागलेली दृष्टी जेव्हा सद्गुरूंकडेच वळते तेव्हाच दिव्य दृष्टी लाभते. आता ही ‘दिव्य दृष्टी’ म्हणजे काय? तो काही चमत्कार आहे का? तर नाही. त्या दिव्य दृष्टीनं ‘मी’पणाच्या भिंगातून जे पाहणं अव्याहत सुरू असतं, ते थांबतं आणि वस्तू, व्यक्ती, गोष्टी जशा आहेत तशा त्यांच्या वास्तविक स्वरूपातच दिसू लागतात. मग हे नुसतं ‘दृष्टि घेऊनि दाखविलें’ उरलं नाही, तर ‘देखणें केलें सर्वाग’ ही अवस्थाही आली. म्हणजे संपूर्ण देहच पाहू लागला! अर्थात प्रत्येक इंद्रिय हे त्याच्या त्याच्या इंद्रियविषयात भ्रममोहानं न गुंतता अशाश्वतात जे शाश्वत आहे ते आणि तेवढंच ग्रहण करू लागलं. तसंच, कोणत्याही दृश्य वस्तूचं संपूर्ण यथासांग दर्शन घडू लागलं. भक्त मग खऱ्या अर्थानं सद्गुरूकडे गेला, खऱ्या अर्थानं एका सद्गुरूचा झाला. तो कसा झाला, याचं अत्यंत मनोहारी वर्णन करताना नाथ म्हणतात, ‘‘अभावो भावेंशी गेला। संदेह नि:संदेहेशी निमाला। विस्मयो विस्मयीं बुडाला। वेडावला स्वानंदु।।’’

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com