धर्माच्या नावानं माणूस रक्तपातही घडवतो, पण खरा धर्म जीवनात उतरवण्यासाठी स्वत:चं रक्त आटवायला तयार नसतो! त्यामुळे अशाश्वताचा जोर जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा खरा धर्म न जाणणारे त्या अशाश्वताच्या ओढीपायी अधर्मालाच धार्मिकतेचा मुलामा देतात आणि मग खरा धर्म कोणता, त्याची जाण पुन्हा निर्माण करण्यासाठी सद्गुरू अवतरित होतात. जो ‘परीक्षित’ असतो, अर्थात जो खरं आणि खोटं, शाश्वत आणि अशाश्वत, सार आणि नि:स्सार यातला भेद जाणतो आणि त्यानुसार विवेकपूर्वक निवड करतो तो कलीच्या अर्थात अशाश्वताच्या प्रभावापासून दूर असतो. तोच खऱ्या अर्थानं शुद्ध आत्मज्ञानाचा अधिकारी असतो. आणि म्हणूनच शुकांनी भगवंताच्या परम भक्तीचं भागवत-रहस्य परीक्षितीला सांगितलं. आता त्यासाठी जे निमित्त झालं, ते सर्वज्ञात आहे. परीक्षितीनं बळानं रोखल्यानं घाबरलेल्या कलीनं परमात्म्याला विनवलं की, आपण नेमून दिलेल्या युगक्रमानुसार माझं अवतरण होत आहे. तरी परीक्षितीचं मन वळवावं. परमात्म्यानं परीक्षितीची समजूत घातल्यावर त्यानं कलीला जिथं शिरकाव करता येईल,  अशा मोजक्या गोष्टी सांगितल्या. त्यातली एक जागा होती सुवर्ण! पण आपल्या डोक्यावरचा मुकुट सोन्याचाच आहे, हे राजा विसरला. त्यामुळेच एकदा वनात शिकारीला गेला असताना ध्यानस्थ ऋषीचा अपमान त्याच्याकडून झाला. त्यानं त्या ऋषीच्या गळ्यात मेलेला साप घातला. ऋषीपुत्राला ते जेव्हा नंतर समजलं तेव्हा रागाच्या भरात त्यानं शाप दिला की, ‘‘हे राजा, तू येत्या सात दिवसांत तक्षकाच्या दंशानं गतप्राण होशील!’’ ऋषी भानावर आले तेव्हा झाला प्रकार ऐकून त्यांनी परीक्षितीचं माहात्म्य सांगत पुत्रालाच खडसावलं. पण परीक्षितीनं तो शाप स्वीकारला. पुत्र जनमेन्जयाला अभिषेक करून, राज्यवैभव त्यागून गंगेच्या किनारी विरक्त होऊन तो राहू लागला. आता उरलेल्या सात दिवसांत असं काय करावं की या जन्माचं सार्थक होईल, असं त्यानं सर्वच ऋषीश्रेष्ठांना विचारलं. तेव्हा शुकदेव तिथं आले आणि त्यांनी भागवत सांगायला सुरुवात केली. त्यामुळेच भक्तिच्या अभावानं तहानलेल्या जिवांना तृप्त करण्यासाठी भागवताची ही पाणपोई पृथ्वीवर अवतरली, असं एकनाथ महाराज सांगतात. ते म्हणतात, ‘‘तो अभिमन्यूचा परीक्षिती। उपजला पावन करीत क्षिती। ज्याचेनि भागवताची ख्याती। पातली त्रिजगतीं परमार्थपव्हे।। १६४।।’’ खरं पाहता मरणाचं स्मरण जिवंत राहिलं तरच अशाश्वतातलं गुंतणं कमी होऊ लागेल.  परीक्षितीला सात दिवसांआधीच मृत्यूची कल्पना आली होती, पण कुणी तेवढी तरी खात्री देऊ शकेल का हो? अहो, पुढच्या क्षणाचीही खात्री देता येत नाही! मग जाणवेल की, जन्मलेला प्रत्येकजण खरंतर जन्मापासून मृत्यूकडेच अग्रेसर होत आहे. मग जो वेळ आपल्याला लाभला आहे त्याचं सोनं का करू नये? अशाश्वताचा प्रभाव मिटणं सोपं नाही, पण निदान शाश्वताचा विचार तरी का सुरू करू नये? खरंच या जीवनात शाश्वत काय आहे? आपल्या मनात इतर वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीबद्दल जी तळमळ आहे त्या तळमळीचं कारण कशात आहे? आपल्या सुप्त वासनात्मक भावनेतच ते दडलेलं नाही का? याचा शोध आपलं मन खरवडून आपण घेतला तर जीवनातला कितीतरी वेळ कितीतरी व्यर्थ गोष्टींसाठी कसा व्यर्थ वाहून जात आहे, ते लक्षात येईल आणि आपण भानावर येऊ!

– चैतन्य प्रेम