चैतन्य प्रेम

भागवतधर्माचा इतिहास मग नारद सांगू लागले. वसुदेवानं जो प्रश्न केला होता, तोच जनकानंही नऊ आर्षभांना केला होता. आता हे आर्षभ कोण, हे सांगण्यासाठी नारदांनी त्यांची वंशावळच सांगायला सुरुवात केली. त्या वंशावळीत ते ऋषभापर्यंत आले. ऋषभ हा वासुदेवाचाच अर्थात देवाचाच अंश होता. मोक्षधर्मावर लोकांची श्रद्धा दृढ व्हावी हाच त्याच्या अवतारामागचा हेतू होता. त्याच्या पुत्रात भरत हा सर्वात ज्येष्ठ पुत्र होता. त्याच्याच नावावरून या खंडाला ‘भरतवर्ष’ असं नाव पडलं. हा भरत सदोदित आत्मस्थितीच्याच आधारानं जगत होता. त्याचं हे आत्मनिष्ठ जगणं मांडताना नारद फार सुंदर रूपक वापरतात. ते म्हणतात, ‘‘जेवीं मार्गी चालतां। पाउलें वक्रेंही टाकितां। दैववशें अडखळतां। आश्रयो तत्त्वतां भूमिकाचि।। १३९।।’’ म्हणजे जमिनीवरूनं चालताना पाऊल वाकडंतिकडं पडलं किंवा ठेच लागली, तरी जमिनीचा आश्रय कुणी सोडत नाही. त्याचप्रमाणे, ‘‘तेवींचि तयासी असतां। राज्यधर्म चाळितां। यथोचित कर्म आचरतां। निजीं निजात्मता पालटेना।। १४०।।’’ राज्यकारभार करीत असतानाही आणि यथोचित कर्म आचरत असतानाही त्या भरताची निजात्म स्थिती कधी पालटली नाही. हिलाच कधीच खंडीत न होणारी अर्थात अखंडस्थिती म्हणतात! ‘‘या नांव बोलिजे ‘अखंडस्थिती’। जे पालटेना कल्पांतीं। जेथ असतां सुखी होती। पुनरावृत्ति असेना।। १४१।।’’ जीवनात वाटय़ाला आलेली भूमिका आणि त्या भूमिकेला अनुरूप कर्तव्यकर्मे करीत असतानाही  ज्याची निजात्मस्थिती म्हणजे आपलं मूळ स्वरूप हे या देहापलीकडे आणि या देहाला चिकटलेल्या ओळखीपलीकडे आहे, याचं भान ज्याच्या अंत:करणात सदा जागृत असतं त्यानं अखंडस्थितीला प्राप्त केलं असतं. आपलं मूळ स्वरूप हे या देहापलीकडे आणि या देहाला चिकटलेल्या ओळखीपलीकडे आहे, म्हणजे काय? तर देहाच्या आधारे आपण वावरत असलो तरी देहभावनेपलीकडेही आपण पोहोचतो, ही जाणीव होऊ लागते.. आणि आपणही आठवून पाहा, एखाद्या गोष्टीशी आपण एकरूप होतो तेव्हा आपल्यालाही देहभावनेचं विस्मरणच तर झालं असतं! तेव्हा देह म्हणजेच मी, असा प्राथमिक भाव क्षीणपणे का होईना, ओसरू लागला असतो आणि मनन, चिंतन, धारणेतून देहविस्मरणही होत असतं. त्याचप्रमाणे या देहाला चिकटलेली ओळख म्हणजेच या देहाशी रक्ताच्या नात्यानं जोडल्या गेलेल्या गोतावळ्यातली आपली ओळख, हा देह जिथं वावरतो त्या घोळक्यातली मित्रत्वाची ओळख, हा देह जिथं उपजीविकेसाठी श्रमतो तिथली सहकारी वा अधिकारी म्हणून असलेली ओळख.. अशा सर्व ओळखींपलीकडेही आपण आणखी उरतोच.. या ओळखींचे लेप खरवडल्यावरही आपण उरतोच, हे भान येऊ लागतं. मग खरा मी कोण, याचा शोध आतमध्येच सुरू होतो आणि त्या अंतर्यात्रेतून जे अनुभूतीचे किरण पसरू लागतात त्यांच्या प्रकाशात तादात्म्य पावत आपल्यातील परम तत्त्वाच्या जाणिवेचा विकास होऊ लागतो. त्याच्याशी एकरूप राहूनही जगात वावरता येतं, जगातली देहगत भूमिका पार पाडता येते. तर अशा अखंडस्थितीत भरत स्थित होते आणि ही स्थिती अशी होती की जी कल्पांतीही पालटू शकत नव्हती आणि त्यात पुनरावृत्ती म्हणजे जन्म-मृत्यू-जन्म यांच्या आवर्तनांची शक्यताही नव्हती. तरी ते आवर्तन घडलंच!