डोळे उघडे ठेवून आपल्याला ध्यान काही साधत नाही! उलट ध्यान ‘करायला’ बसलो, तरी डोळे मिटल्यावरही भौतिकच जग लख्खपणे दिसत असतं! पण जेव्हा ‘मनें’ करावें हरीचें ध्यान म्हणजे मनानं सद्गुरू चरित्राचं आणि सद्गुरू बोधाचंच ध्यान होऊ लागतं तेव्हा डोळे उघडे असूनही भौतिक जगाचा पूर्वीसारखा प्रभाव मनावर पडत नाही आणि म्हणूनच डोळे बंद असोत की उघडे, सद्गुरूमय मनाचं ध्यान हे सद्गुरूंच्या बोधाचंच होतं. मग जिव्हेला नामाची आणि कानांना सद्गुरूबोधश्रवणाची ओढ लागते, गोडी लागते. यानंतर सांगतात की, ‘करीं’ करावें हरिपूजन। ‘चरणीं’ देवालयगमन! याचा सरळ शब्दार्थ असा की, हातांनी हरीची पूजा करावी आणि पायांनी त्याच्या देवालयांकडे गमन करावं. वरकरणी पाहता कुणालाही असं वाटेल की, याचा अर्थ माणसानं अहोरात्र पूजाअर्चा करीत राहावं आणि जमेल तेव्हा तीर्थयात्रा करीत जावं, एवढाच त्याच्या जगण्याचा परीघ असावा काय? व्यवहाराचा प्रभाव उरला नसला तरी व्यवहारात राहाणं जर भाग असेल, तर मग व्यवहार पूर्ण सोडता तरी कसा येईल? व्यवहारातले प्रयत्न करायला नकोत का? तर असं वाटणं स्वाभाविक आहे. पण या चरणांचा आणखी खोलवर विचार केला की त्याच्या अन्य अर्थछटाही जाणवू लागतील. हात आणि पाय ही मनुष्यदेहातली दोन अत्यंत महत्त्वाची कर्मेद्रियं आहेत. पण ‘हात’ हे कर्तेपणाचंही रूपक आहे आणि ‘पाय’ हे गतिमानतेचं प्रतीक आहे. तेव्हा  ‘करीं’ करावें हरिपूजन म्हणजे हातांनी सदोदित हरीपूजन करावं,   हा जरी अर्थ असला, तरी ‘हरीपूजना’ चा परीघ फार व्यापक आहे. हातांनी जी जी र्कम करू ती ती सद्गुरूंचीच पूजा आहे, असा भाव कर्मरत राहाताना असला पाहिजे. म्हणजेच कर्म जीव ओतून करावं, चांगलं करावं, पण मनाला कर्तेपणा चिकटू देऊ नये. समस्त कर्तेपणा सद्गुरूंचा आहे, अशी मनाची धारणा असावी. तसं पाहता माणसाचं कर्तेपण खरंच काही आहे का हो? कर्म करणं तेवढं आपल्या हातात आहे. पण कर्म यशस्वी होण्यात परिस्थिती, त्या कर्माशी संबंधित इतर माणसं आणि आपलं दैव यांचाही मोठा भाग असतो. आपल्यात कर्म करण्याची क्षमता हीसुद्धा आपल्या ताब्यात नसते. म्हणजे समजा आपण आजारी पडलो, तरी कर्म तडीस नेता येत नाही. तेव्हा ज्या देहाच्या आधारे कर्म करता येतं त्या देहावर आपलं खऱ्या अर्थानं नियंत्रण नसतं. तेव्हा कर्मासाठी आटोकाट प्रयत्न अवश्य करावा, पण कर्तेपणा घेऊ नये. पूजा करणारा पूज्य म्हणजे शून्य झाला की जो खरा पूज्य म्हणजे पूजनीय आहे त्याची खरी पूजा होते! तेव्हा कर्तेपणाच्या बाबतीत आपण शून्य म्हणजे अहंभावाबाबतीत रितं झालं पाहिजे. मग जी जी र्कम घडतील ती ती पूजा ठरतील. कारण त्यात त्यांचं दिव्यस्मरण व्याप्त असेल. त्याचप्रमाणे ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ हा भाव मनात स्थिर होत गेला, तर जिथं कुठं आपण जाऊ तिथं तिथं सद्गुरूस्मरणाचीच अखंड सोबत असेल. मग जिथं जाऊ ती वास्तू ‘देवालय’च होईल! देवळाचा हेतू काय असतो? तर तिथं गेल्यावर तरी देवाचं स्मरण तीव्र व्हावं. मग जर ते स्मरण मनात सदोदित असेल, तर मग प्रत्येक ठिकाणी देवच दिसू लागेल. आपलं अंतरंग देवत्वभावानं भरून गेलं की चराचरातली भगवंताची लीला उमगू लागेल. मग ही अवघी सृष्टी हेच भव्य देवालय होईल. संकुचिताचा चित्तातून लय होऊ लागेल आणि परमभावाची लय स्थिरावू लागेल!

– चैतन्य प्रेम