माणसापासून देवांचा राजा इंद्रापर्यंत सगळेच दु:खं भोगत आहेत. आता एकानं विचारलं की, देव म्हणजे परमात्मा, ईश्वर ना? मग तो दु:खी कसा असेल? तर देव आणि परमात्मा एकच नाहीत. हा देवयोनीतला देव आहे, देवलोकातला देव आहे. या देवांचा राजा इंद्र आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश, राम, कृष्ण हे वेगळे आहेत. हे सगळ्या पुराणांतूनही उघड होतंच. कारण हे देवलोकात राहात नाहीत. ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक, विष्णूचा विष्णुलोक, शिवाचा शिवलोक, रामांचं साकेतधाम, कृष्णांचा गोलोक, विठ्ठलाचा वैकुंठलोक हे स्वतंत्र आहेतच. मग देवलोकातले देव कोण आहेत? सनातन तत्त्वमतानुसार, पुण्यबळ ज्याचं अपरंपार होतं तो देवलोकी वा स्वर्गलोकी निवास करतो. पण या ‘देवा’ला पुण्य क्षीण होऊन पुन्हा मृत्युलोकात परतावं लागण्याची भीती आहे. ‘गीते’त भगवान कृष्णही हेच वास्तव ‘‘क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति,’’ या शब्दांत मांडतात. कुणी तप सुरू केलं की इंद्राला- त्या तपस्व्याचं पुण्यबळ वाढून आपलं इंद्रपद तो बळकावील, याची भीती वाटते. तेव्हा माणसापासून देवांच्या राजापर्यंत सगळेच दु:खाच्या कचाटय़ात आहेत. या दु:खाचं जे कारण संत एकनाथ महाराज सांगतात ना, ते मोठं पारमार्थिक सूत्र आहे. ही ओवी सांगते की, ‘‘एवं सुर नरलोक लोकीं। आत्ममरणें सदा दु:खी। ते केवीं भार्येसी करिती सुखी। भजावें मूर्खी ते ठायीं।।२५४।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). माणसापासून इंद्रापर्यंत सर्वच जण सदा दु:खी आहेत याचं कारण आहे ‘आत्ममरण’! आता आत्म-मरण म्हणजे काय हो? हे जाणण्यासाठी ‘आत्मा’ म्हणजे काय पाहायला गेलो, तर तत्त्वचर्चेच्या शाब्दिक वावटळीत सापडू, पण अनुभूतीच्या अंगानं हाती काहीच लागणार नाही. ‘स्वात्मसुख’ या लघुप्रकरण ग्रंथात एकनाथ महाराज सांगतात की, ‘‘गगन सर्वासी स्पर्शे। परी स्पर्शिलें हें न दिसे। आत्मा तैसा सन्निध असे। आडळेविण।।१६।।’’ गगन म्हणजे आकाश सर्वानाच स्पर्श करत असतं, पण ते स्पर्श करताना दिसत नाही. तसा आत्मा हा अगदी निकट असतो. इतकंच नाही, तर ‘‘शून्यत्व सांडूनि गगनें। सर्वत्र जेवीं असणें। आत्मा तैसा पूर्णपणें। सर्वा सर्वी।।१७।।’’ गगन जसं शून्यत्व सांडून सर्वत्र असतं तसंच हे आत्मतत्त्व पूर्णपणे सर्वव्याप्त असतं. देह काळाच्या पकडीत आहे, देहाला जन्म-मृत्यू आहे, पण तो देह ज्या आत्मतत्त्वाशिवाय टिकूच शकत नाही ते आत्मतत्त्व सर्वत्र असून सर्व बंधनातीत आहे. जुनी वस्त्रं टाकून नवी वस्त्रं धारण करावीत, तसा जीवात्मा एक देह टाकून कालांतरानं दुसरा देह धारण करतो, हे ‘गीते’तलं वचन प्रसिद्ध आहे. याच आत्म्याचं ‘गीते’नं दुसऱ्या अध्यायात २३ आणि २४ या दोन श्लोकांत केलेलं वर्णनही चिरपरिचित आहे. त्यानुसार देहाला शस्त्रानं छेदता येत, पण आत्म्याला नव्हे. तो अच्छेद्य आहे. देहाला अग्नी जाळू शकतो, पण आत्म्याला नव्हे. तो अदाह्य़ आहे. त्याला पाणी विरघळवू शकत नाही की वारा सुकवू शकत नाही. थोडक्यात, देह पंचमहाभूतांच्या कक्षेत असला तरी आत्मतत्त्वावर त्यांची सत्ता नाही! त्यामुळे सर्व बंधनांत जगत असलेल्या माणसातच असं एक तत्त्व आहे जे चैतन्यस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. त्याच्या जाणिवेनंच समस्त बद्धपणाचाच निरास होतो. त्या स्वरूपाची प्राप्ती अन्य कोणत्याही उपायानं नव्हे, तर खऱ्या सद्गुरूंच्या बोधानुरूप जीवन घडवितानाच होऊ शकते. त्या आत्मस्वरूपाला विन्मुख होऊन देहरूपालाच सर्वस्व मानून सुरू असलेलं जगणं हे आत्ममरणच आहे.
– चैतन्य प्रेम