– चैतन्य प्रेम

‘एकनाथी भागवत’ हा ग्रंथ म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या आज्ञाप्रतापानं प्रकट झालेलं वैभव आहे, ही त्यांचीच कृपा आहे, हाच एकनाथांचा भाव आहे. पहिल्या अध्यायात ते म्हणतात, ‘‘तैसें माझेनि नावें। ग्रंथ होती सुहावे। आज्ञाप्रतापगौरवें गुरूवैभवें सार्थकु।।’’ (ओवी ११०). या ग्रंथाला सद्गुरूंचं वरदान आहे. त्यामुळे ‘‘मुक्त मुमुक्षु इतर लोक। श्रवणमात्रेंचि देख। निजात्मसुख पावती।।’’ म्हणजे या ग्रंथाचं नुसतं श्रवण करताच, पठण करताच बद्ध आणि मुमुक्षूच नव्हेत, तर मुक्तांनाही निजसुख लाभेल! आता बद्ध म्हणजे कोण? तर आपण! आपण कसे आहोत? तर संसारात गुंतून आहोत. सकाळी जाग येताच आपली अनेक कामांची यादी तयार असते. त्यात कर्तव्य कर्माबरोबरच मोह आणि भ्रामक ओढींतूनही अनेक कामं उत्पन्न झालेली असतात. कर्तव्य कर्म करतानाही आवश्यक ते कर्म पूर्ण होऊनही त्यापुढे मोहापायी कर्मपसारा वाढवला जात असतो तो वेगळाच. तर अशा बद्धांनाही जे खरं निजसुख आहे, ते या ग्रंथाच्या श्रवणानं प्राप्त होतं. आता इथे थोडी गंमतही आहे बरं का! कारण या ओवीत मुमुक्षू आणि मुक्त या दोघांचा उल्लेख आहे. पण ‘बद्ध’ असा उल्लेख न करता, ‘मुक्त मुमुक्षु इतर लोक’ असा उल्लेख आहे. अर्थात, ‘बद्ध’च्या जागी ‘इतर लोक’ म्हटलं आहे. म्हणजेच ‘बद्ध’चा परीघ व्यापक केला आहे. मग हे ‘इतर लोकां’तले बद्धांबरोबरचे आणि बद्धांसमान असलेले लोक कोण? तर मुक्त आणि सिद्ध झाल्याच्या आभासानं स्वत:लाच गुरू मानू लागलेले लोक! तर हे अध्यात्माचा बाजार मांडणारे स्वयंघोषित गुरूही खरं तर बद्धच आहेत. सामान्य माणूस आपल्या घरादाराच्या संसारात बद्ध असतो, तर हे स्वघोषित गुरू आश्रम, शिष्यसंख्या वाढविण्याचा मोह आणि नावलौकिकाच्या प्रपंचात बद्ध असतात. यानंतर येतात मुमुक्षू. आता बद्धांनाही या ग्रंथाच्या श्रवणानं निजसुखाचा परम लाभ मिळणं शक्य असेल, तर जे मुमुक्षू आहेत- म्हणजे जगात राहूनही जगाच्या प्रभावातून अलिप्त राहण्याची ज्यांना इच्छा आहे,  त्यांनाही या सद्ग्रंथ श्रवणानं हे सुख लाभेल, यात काय नवल? आता बद्ध आणि मुमुक्षूंबरोबर मुक्तांचा जो उल्लेख आहे तो प्रथम आपल्याला थोडा आश्चर्यकारक वाटतो. कारण जो मुक्त आहे, त्याला निजसुख मिळालंच असलं पाहिजे, असं आपण गृहीत धरतो. मग इथं अभिप्रेत असलेला मुक्त म्हणजे कोण? तर जगाच्या प्रभावातून जो सुटला आहे, तरीही भक्तिप्रेममय ज्ञानापासून जो वंचित आहे तो! आता महर्षि व्यास काय मुक्त नव्हते? पण तरीही ते समाधानी नव्हते. नारदांच्या भक्तिहृदयातून भागवताचं श्रवण जेव्हा घडलं, तेव्हाच त्यांना निजसुखाचा हा ठेवा प्राप्त झाला. तर असं या ग्रंथाचं माहात्म्य आहे. इथं सगळीकडे ‘श्रवण’ शब्दही वापरला आहे. म्हणजे या ग्रंथाचं श्रवण जे करतील त्यांना हे सुख लाभेल, असं म्हटलं आहे. याच कारण ‘श्रवण’ म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे! ऐकल्यानुसार आचरण, हे खरं श्रवण आहे. तेव्हा खरं महत्त्व कृतीलाच आहे. नुसतं ऐकण्याला नाही! या ग्रंथातील सद्गुरूमयतेचा बोध जे आचरणात आणतील, त्या बद्धांपासून मुक्तांपर्यंतच्या सगळ्या मनुष्यांना निजसुख लाभेल, असंच एकनाथ महाराज उच्चरवानं सांगत आहेत. आता सद्गुरूशी ऐक्य पावण्याची गरज काय; त्याशिवाय सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही का; या निजसुखाचा मार्ग नेमका कोणासाठी कसा आहे, या प्रश्नांचा विचार करू..