– चैतन्य प्रेम

आता सद्गुरूशी ऐक्य म्हणजे काय? तर हे ऐक्य आंतरिकच आहे. अंतर्निष्ठा हेच ऐक्य आहे. म्हणजे दिसायला देह दोन आहेत; पण आचार, विचार, उच्चार यात लेशमात्रही भेद नाही! अशा ऐक्यतेचं परिपूर्ण दर्शन शिव आणि शक्तीमध्ये आहे. ‘अमृतानुभवा’त माउलींनी ते फार सुंदर रूपकांमधून मांडलं आहे. स्वामी स्वरूपानंदांनी त्याचा अतिशय मनोज्ञ असा अभंगानुवाद केला आहे. त्यातली काही रूपकं पाहू. कंसात स्वामींचा अभंगानुवाद आहे. ग्रंथारंभी माउलींच्या हृदयातून संस्कृतात पाच श्लोक प्रकटले आहेत. त्यातल्या एका श्लोकात माउली म्हणतात, ‘‘सरध केन च कस्यरध शिवयो समरूपिणो:। ज्ञातुं न शक्यते लग्नम् इति द्वैतच्छलात् मुहु:।।३।।’’ याचा स्वामी स्वरूपानंद यांनी केलेला अभंगानुवाद असा : ‘‘नित्य द्वैतमिषें। भासती जीं भिन्न। एक चि असोन। शिव-शक्ति।।७।। तेथें कोण होय। कोणाशीं संलग्न। कोणाचें कीं कोण। अर्ध होय।।८।। संबंध हा गहन। जाणेल हा कोण। ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान। एक जेथें।।’’ दोन दिसत असूनही शिव आणि शक्ती एकच आहेत. पण शक्ती ही शिवाची अर्धागिनी आहे की शिव हा शक्तीचं अर्धाग आहे, हेच कळू नये इतकी एकरूपता, तादात्म्य आहे. जिथं जाणणारा, जाणली जाणारी वस्तू आणि जाणणं अथवा जाणीव हेच एक आहे तिथं कोण कुणात विलीन आहे, हे कोणाला उमगावं? पुढे माउलींची रूपकं आणि स्वामींचा अभंगानुवाद पाहा : ‘‘दो दांडी एक श्रुती। दोहों फुलीं एक दृति। दोहों दिवीं दीप्ती। एकीची जेवीं।।१८।। दो ओठीं एकी गोष्टी। दो डोळां एकी दृष्टी। तेवीं दोघीं जिहीं सृष्टी। एकीची जे।।१९।।’’ (जरी वीणा दोन। एक चि तो नाद। एक चि सुगंध। दोहों पुष्पीं।।५८।। एक चि प्रकाश। दीप जरी दोन। दोन ओठांतून। शब्द एक।।५९।। जरी डोळे दोन। एक चि ती दृष्टि। तैसीं शिव-शक्ति। सृष्टीमाजीं।।६०।। शिव-शक्तिरूपें। ह्यपरी अफूट। एक चि अद्वैत। असे वस्तु।।६१।।). दोन वीणांतून एकच नाद झंकारावा किंवा दोन टिपऱ्यांतून एकच नाद निनादावा, दोन फुलांतून एकच सुगंध दरवळावा, दोन दिव्यांचा एकच प्रकाश पसरावा आणि माणसाच्या मुखाला दोन ओठ असले तरी एकच शब्द उमटावा, चेहऱ्यावर दोन डोळे असले तरी दृष्टी समान असावी; त्याप्रमाणे शिव आणि शक्ती एकरूप आहेत. दोन दिव्यांच्या प्रकाशात नेमका कोणत्या दिव्याचा कोणता प्रकाश आहे, एकच दृश्य दोन डोळ्यांनी पाहात असता नेमका कुठला डोळा काय पाहतो आहे, हे वेगळेपणानं सांगता येऊ नये, तसं शिव-शक्तीला भिन्नत्वानं दाखवता येत नाही. पुढे माउली म्हणतात, ‘‘गोडी आणि गुळु। कापुर आणि परिमळू। निवडूं जातां पांगुळु। निवाडु होय।।२३।।’’ गूळ आणि त्याची गोडी, कापूर आणि त्याचा परिमळ हे वेगळं करू पाहणारी बुद्धीच हतप्रभ होईल; पण गुळापासून गोडीला वा कापरापासून परिमलाला वेगळं करता येत नाही! खरा सद्गुरू व त्याच्या कृपेनं घडलेला खरा शिष्य, यांच्यातील पूर्णत्व वा ऐक्य हे असं असतं!

chaitanyprem@gmail.com