– चैतन्य प्रेम

आपलं मन सद्गुरूंचंच मन झालं पाहिजे, म्हणजे मनानं त्यांच्याशी एकरूपता आली पाहिजे. ती येण्याचा पहिला उपाय म्हणजे, ‘‘माझिया भजनी प्रेम धरीं!’’ भजन म्हणजे भजणं. आज आपल्याकडून भजन सुरूच आहे, पण ते भौतिकाचं आहे. देहबुद्धीच्या सवयीमुळे भौतिक हाच सुखाचा प्रमुख आधार वाटतो आपल्याला. ते भौतिक ज्या जगात मिळवता येतं, भोगता येतं ते जग आपल्याला म्हणूनच हवंहवंसं वाटतं. त्या जगाचं अहोरात्र भजन आपण करतो. हे भजन का सुरू आहे? तर त्याबदल्यात जग आपल्या अपेक्षा पूर्ण करील, अशी आस आहे. माझ्यासारख्या अगणित ‘मीं’नी हे जग बनलं आहे आणि ‘मी’ स्वार्थी असल्यानं जगही स्वाभाविकपणे स्वार्थी आहे, हे मला जेव्हा उमगेल तेव्हाच जगाचं भजन थांबेल! जगातला वावर थांबणार नाही, लोकसंपर्क थांबणार नाही, पण जगाकडून अपेक्षा बाळगत जगण्याची सवय ओसरू लागेल. खरं पाहता, जगाचं हे वास्तविक स्वरूप आपल्याला उमगतं; पण तरीही भ्रम आणि मोहाचा प्रभाव असा विलक्षण असतो की, आपण परत परत जगातच रुतत असतो. श्रीधर स्वामींनी या आपल्या दशेचं फार मनोज्ञ रूपकाद्वारे वर्णन केलं आहे. ते म्हणतात, ‘‘माणसाला तहान लागली आहे आणि ती भागवण्यासाठी सागराचं पाणी तो पिऊ लागला, तर तहान भागेल का हो? पण त्याची गत अशी आहे की, तो ते खारं पाणी प्यायचं थांबवत नाही. या पाण्यानं आज ना उद्या आपली तहान भागेलच, अशी आशा बाळगून तो ते खारं पाणी कसंबसं पीतच राहतो. यावर कडी म्हणजे, आज ना उद्या हे पाणी गोड होईल, या आशेनंही ते तो पीत राहतो!’’ काय समर्पक वर्णन आहे बघा! आपल्याला सुखाची तहान लागली आहे आणि दु:खमय जगात ती भागवण्याची आपली धडपड आहे. त्या धडपडीत जगाचे आघात आपण सोसतो, पण तरीही जगाचा स्वभाव बदलेल आणि आज ना उद्या आपल्याला सुख मिळेलच, ही आशा काही सुटत नाही! आता जग दु:खमय का आहे? तर ते माझ्यासारख्या अनंत स्वार्थी ‘मीं’मुळेच दु:खमय आहे. ते आनंदानं भरून टाकणंही माझ्याच हातात आहे. पण त्यासाठी मनातून लालसा, अपेक्षा, स्वार्थ, अहंभाव सुटला पाहिजे. जो स्वत: आनंदानं पूर्णतृप्त आहे, तोच ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ हे म्हणू शकतो हो! तर, जगाचं खरं स्वरूप उमगून त्या जगाचं भजन थांबलं आणि सद्गुरूंचं भजन सुरू झालं, तर या मार्गावरची वाटचाल सुरू होईल. पण इथं भगवंताला नुसतं भजन अपेक्षित नाही, तर त्यात प्रेम अपेक्षित आहे! ‘माझिया भजनीं प्रेम धरीं’ असं भगवंत म्हणतो, नुसतं ‘माझे भजन करी’ असं म्हणत नाही. नाथांचाच प्रसिद्ध अभंग आहे, ‘‘आवडीने भावे। हरिनाम घेसी। तुझी चिंता त्यासी। सर्व आहे।।’ आवडही पाहिजे आणि भावही पाहिजे. प्रेमात या दोन्ही गोष्टी असतातच; आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे निरपेक्षता! ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याकडून प्रेमाच्या मोबदल्याची अपेक्षा नसते. तेव्हा भजन सद्गुरूंचं सुरू आहे आणि प्रेमाच्या ऊर्मी मात्र जगासाठी आहेत, असं असेल तर त्या भजनाला काही अर्थ नाही! आता सद्गुरूंचं भजन म्हणजे तरी काय हो? तर प्रपंचासकट सर्व गोष्टी भगवंताच्या आहेत, मी संसारातली कर्तव्यं तेवढी करायची आहेत- या भावनेनं जगात राहणं, प्रपंचात राहणं, हे खरं भजन आहे! ‘एकनाथी भागवता’च्या दुसऱ्या अध्यायाच्या चिंतनातच हा व्यापक अर्थ आपण जाणून घेतला आहे. तेव्हा आपल्याकडून अहोरात्र सुरू असलेलं जगाचं भजन थांबून हे खरं भजन सुरू झालं पाहिजे!

– चैतन्य प्रेम