– चैतन्य प्रेम

जगाचं भजन सुटून परमतत्त्वाचं भजन सुरू झालं पाहिजे. जगाची ओढ सुटून सद्गुरू-बोधानुरूप जगण्याची ओढ निर्माण झाली पाहिजे. पण हे कसं साधेल? भगवंतच तो मार्ग सांगताना म्हणतात की, ‘‘तरी बाह्य़ आणि अंतरा। आपुलिया सर्व व्यापारा। मज व्यापकातें वीरा। विषयो करी।। (ज्ञानेश्वरी)’’ आत आणि बाहेर तुझे जे व्यापार सुरू आहेत ना, त्यांचा विषय मलाच कर! ‘आत आणि बाहेर’ म्हणजे काय? तर देहानं आपण जगात बाह्य़ कृती करीत असतो, पण त्या कृतीचं मूळ अंतर्मनात असतं. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष कृती बाहेर होताना दिसते, पण मनात अन्य कृतींचं स्वप्नरंजनही सुरू असतं किंवा अन्य मनन, चिंतन, स्मरण सुरू असतं. आता या आंतरिक आणि बाह्य़ कृतीचा पाया आहे भौतिक! म्हणजे कृतीही जगासाठीच सुरू आहे आणि आंतरिक चिंतनही जगाचंच सुरू आहे. हे पालटायला भगवंत सांगत आहेत. म्हणजे काय करावं? तर, प्रत्येक कृतीचा पाया हा भगवंत म्हणजेच सद्गुरू असावा. निसर्गदत्त महाराज एकदा एका शिष्याला म्हणाले की, ‘‘मी तुमच्यासारखाच या जगात राहतो, असं तुम्हाला वाटतं. पण फरक इतकाच की, मी जगात राहतो आणि जग तुमच्यात राहत असतं!’’ म्हणजे काय? तर सत्पुरुषही जगातच वावरताना दिसतात, पण त्यांच्या अंत:करणात जगाला मोहजन्य थारा नसतो! त्याउलट आपण जगात राहतोच, पण आपलं अंतर्मनही जगाच्याच मोहानं, ओढीनं भरून गेलेलं असतं. त्यात अन्य चिंतनाला, मननाला वावच नसतो. हे चित्र अभ्यासपूर्वक पालटायचं आहे. जगात खुशाल राहावं, भौतिक यशाचं शिखरही सर करावं; पण अंत:करणातून जगाच्या ओढीपासून अलिप्त असावं. जग सुखी व्हावं यासाठी आपल्या बाजूनं जे करता येईल ते करावं, पण आपल्या आत्मसुखप्राप्तीच्या अभ्यासाला अग्रक्रम द्यावा. त्यासाठी आपण जे काही करीत आहोत ते सद्गुरू इच्छेनं, याचं स्मरण मनात सदोदित बाळगावं. मग मी नोकरी करतोय का? तर तीही सद्गुरूंची इच्छा आहे म्हणून, हा भाव ठेवावा. प्रपंचातली प्रत्येक गोष्ट त्यांना स्मरून करावी. हा अभ्यास आहे. तो काही लगेच अंगवळणी पडणार नाही. तो करीत असताना आणखी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. अनेकदा अनेक जन्मांच्या संस्कारातून काही देहगत ऊर्मी उसळून येतात. त्या उत्पन्न झाल्या म्हणून स्वत:ला अध:पतित वा पापी मानू नये. नीतीला अनुसरून त्यांचं शमन होऊ द्यावं. दुसरी गोष्ट म्हणजे तारतम्य सुटू देऊ नये. तुम्ही विवाहबद्ध असाल, तर जोडीदाराच्या किमान अपेक्षांच्या पूर्तीची जबाबदारीही तुमच्यावर आहे. तेव्हा त्यांची कदर राखून आपला अभ्यास सांभाळता आला पाहिजे. थोडक्यात, प्रारब्धामुळे कोणत्याही परिस्थितीत असलो तरी ती परिस्थिती स्वीकारून, त्यानुरूप वाटय़ाला आलेली सर्व कर्तव्यर्कम करून आपला आत्माभ्यास सुरू राहिला पाहिजे. तो जगाला शक्यतो दिसूच नये आणि त्याचं स्तोम तर जगात मुळीच माजवू नये. हा अभ्यास करताना जगातला वावर कसा असावा? तर भगवंत सांगतात की, ‘‘आघवां आंगीं जैसा। वायु मिळोनि आहे आकाशा। तूं सर्व कर्मी तैसा। मजसीचि अस।।’’ आकाशात जसा वायू भरून असतो तसा तुझ्या प्रत्येक क्रियेत माझं स्मरण राख. समुद्र किनारी जाळी बांधली असतात पाहा.. तर त्या जाळ्यात वारा शिरतो, पण जाळ्यात अडकत मात्र नाही! तसा सर्व कर्मात राहूनही फलाशेच्या म्हणजे ‘या कर्माचं अमुक फळ मिळावं’ या आशेच्या जाळ्यात न अडकता मोकळा राहा, असंच भगवंत सांगत आहेत.

– चैतन्य प्रेम