– चैतन्य प्रेम

भक्तानं माझ्याशी कसं एकरूप व्हावं, ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. त्यातूनच सद्गुरूशी एकरूप होण्याचा मार्गही प्रकाशमान होत आहे. भगवंतानं सांगितलं की, ‘‘तरी बाह्य़ आणि अंतरा। आपुलिया सर्व व्यापारा। मज व्यापकातें वीरा। विषयो करी।। आघवां आंगीं जैसा। वायु मिळोनि आहे आकाशा। तूं सर्व कर्मी तैसा। मजसीचि अस।। (ज्ञानेश्वरी).’’ तुझ्या सर्व शारीरिक आणि मानसिक क्रिया माझ्या स्मरणात कर किंवा त्या सगळ्या गोष्टी तू माझ्याचसाठी करीत आहेस, हा भाव ठेव. भगवंत हा व्यापक आहे. आपल्या सर्व शारीरिक आणि मानसिक क्रिया या ‘मी’ आणि ‘माझे’ या परिघापुरत्याच सुरू असतात. त्या संकुचित असतात. त्याच क्रिया जेव्हा संकुचित ‘मी’साठी न होता व्यापक भगवंतासाठी होऊ लागतील, तेव्हा आपणही मनानं व्यापक होऊ. मग आपल्या वृत्तीतला, दृष्टिकोनातला, धारणेतला संकुचितपणा ओसरेल आणि जीवनदृष्टीही व्यापक होईल. भगवंत म्हणतात, ‘‘नुसतं तुझं मन माझ्याशी जोडून काही लाभ नाही, तुझ्या आणि माझ्या मनाची अशी एकरूपता व्हावी, की ते एकच होऊन जावं.’’ याला माऊलींनी फार सुंदर शब्द योजला आहे- ‘एकायतन’! माऊली म्हणतात, ‘‘किंबहुना आपुलें मन। करीं माझें एकायतन। माझेनि श्रवणें कान। भरूनि घालीं।। (ज्ञानेश्वरी).’’ ‘आयतन’ म्हणजे घर! एकायतन म्हणजे तुझं-माझं मन जणू एकच घर होऊन जावं! या सर्व ओव्यांमध्ये या एकरूपतेची प्रक्रियाच माऊलींनी उलगडली आहे. अंतर्बाह्य़ सर्व क्रिया भगवंतकेंद्रित करायला प्रथम सांगितलं. आता त्या कशा साधाव्यात? तर भगवंत सांगतात, ‘‘हाताचें करणें। का पायांचें चालणें। तें होय मजकारणें। तैसें करीं।।’’ जे काही कृत्य करशील आणि त्यासाठी या देहाद्वारे जगात तुझा जो वावर असेल, तो माझ्याच स्मरणात असू दे. जेव्हा पूर्ण एकरूपता येईल, सद्गुरूशी मनानं तादात्म्य पावू, तदाकार होऊ तेव्हा काय घडेल? तर, ‘‘मग भरलेया जगाआंतु। जाऊनि तिजयाचि मातु। होऊनि ठायील एकांतु। आम्हां तुम्हां।।’’ अगणित माणसांनी भरलेल्या याच जगात भक्त आणि भगवंताला जणू पूर्ण एकांत मिळेल! तिसरा कुणी या दोघांमध्ये येणारच नाही. ‘‘तेव्हां भलतिये अवस्थे। मी तूंतें तूं मातें। भोगिसीं ऐसें आइतें। वाढेल सुख।।’’ भगवंत म्हणतात, मग कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही परिस्थितीत तू फक्त माझ्यासाठी व मी फक्त तुझ्यासाठीच उरलो असेन! ही पूर्णावस्था सहज, आयतीच भोगता येईल आणि त्यानं आत्मसुख वाढत जाईल! आता ही फार परमोच्च अवस्था झाली. आपल्या काही ती आवाक्यातली नाही असं आपल्याला वाटेल, यात काही शंका नाही. भगवंतानं अर्जुन आणि उद्धवाला हा एकरूपतेचा उपदेश स्वतंत्र पार्श्वभूमीवर केला. एकाला लढायला प्रवृत्त करताना, तर दुसऱ्याला संन्यास घेण्याची प्रेरणा देताना हा एकात्मयोग सांगितला!

chaitanyprem@gmail.com