– चैतन्य प्रेम

जिथं श्रीवल्लभ श्रीकृष्ण आणि भक्तकदंब एकत्र आहेत, तिथं अक्षय सुख, अक्षय लाभ आणि मांगल्य आहे! (जेथ तो श्रीवल्लभु। जेथ भक्तकदंबु। तेथ सुख आणि लाभु। मंगळाचा।।). इथं ‘भक्तकदम्ब’चा अर्थ भक्तसमुदाय, असा सांगितला जातो. पण या ओवीत ‘कदम्ब’ शब्दाची योजना फार भावसूचक आहे. कदम्ब हा असा वृक्ष आहे, ज्याचं श्रीकृष्ण चरित्रात महत्त्वाचं स्थान आहे. कालिया ज्या डोहात होता, तो डोहही कदम्ब वृक्षाच्या छायेत होता. विशेष गोष्ट अशी की, कालियाच्या विषप्रभावानं या डोहाच्या आसपासचे वृक्ष नष्ट झाले होते, पण केवळ हा एकच कदम्ब वृक्ष टिकून होता. या कदम्ब वृक्षावरूनच बालकृष्णानं कालियाच्या फण्यावर उडी घेत नाचायला सुरुवात केली होती. त्यामुळे कालियानं शरणागती पत्करून तो डोह सोडला होता. ‘कालिया’ म्हणजे अहंकाराचं प्रतीक. कालिया जसा डोहात आपल्या परिवारासह राहत होता, तसा हा अहंकार आपल्या आप्तांसह अंत:करणरूपी डोहात नांदत असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ हे सगळे या अहंभावाचे आप्तस्वकीय. त्या अहंकाराच्या माथ्यावर सद्गुरू नर्तन करीत नाहीत तोवर अंत:करणाच्या डोहातून अहंभाव निघून जात नाही. त्या अहंकाराच्या माथ्यावर भगवंतानं जी उडी घेतली तो वृक्ष कदम्बच का असावा? कृष्णचरित्रातला आणखी असाच एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे गोपींची वस्त्रं चोरण्याचा. गोपींची वस्त्रं चोरून बालकृष्ण ज्या वृक्षावर बसले होते, तो वृक्षही कदम्बच होता! या गोपी कोण होत्या? तर प्रभूंच्या पूर्वावतारात- म्हणजेच श्रीराम अवतारात चित्रकूटच्या वनातले अनेक थोर तपस्वीच गोपी म्हणून जन्मले होते! का? तर प्रभूंचं सीतामाईवरील अनन्यप्रेम पाहून, ‘भगवंताचं असं प्रेम आम्हालाही प्राप्त व्हावं,’ अशी इच्छा या तपस्वी जनांनी व्यक्त केली होती. ही इच्छा पुढील अवतारात पूर्ण होईल, असं अभिवचन प्रभूंनी दिलं होतं. त्यानुसार या मधुर अवतारात प्रेमभक्तीचा लाभ मिळवता यावा यासाठी प्रभूंनी त्यांना गोप-गोपी म्हणून जन्म दिला. पण जन्म होताच हे सारे मायाप्रभावात असे गुंतून गेले की, त्यांना भानावर आणणं गरजेचं होतं. त्यामुळे भगवंतानं त्यांची ‘वस्त्रं’- म्हणजे अहंभावरूपी अखंड जाणिवेची आवरणं चोरली. गोपींनी विनवण्या केल्यावर बालकृष्णानं ती परत केली खरी, पण कृष्णाच्या दिव्य हातांनी स्पर्शित झालेली ती वस्त्रं अंगावर चढवताच त्या गोपी अंतर्बाह्य़ कृष्णमयच झाल्या. आपल्या जन्माचं उद्दिष्ट कृष्णमयता हेच आहे, ही त्यांची जाणीव नंतर कधीच ओसरली नाही. पण ही वस्त्रं चोरून भगवंत ज्या वृक्षावर बसला होता, तो वृक्षही कदम्बच का असावा? रूपकाच्या अंगानं विचार करता त्यामागचं रहस्य ध्यानी येईल. ‘क’ म्हणजे दृश्य जगाचा प्रारंभ, व्यक्त रूप. ‘क’ अक्षराआधी अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: हे स्वर येतात. ते सूक्ष्माचं प्रतीक आहेत. ‘क’पासून व्यंजनं सुरू होतात. थोडक्यात, ती स्थूल जगाचा प्रारंभ आहेत. पण गंमत अशी की, स्वर मिसळल्याशिवाय व्यंजनांना पूर्णत्व येत नाही, पण त्या पूर्णाला पूर्णत्व देणारा सूक्ष्म आधार उमगत नाही. साधं उदाहरण घ्या. ‘क’ कसा घडला? तर क् +अ मिळूनच ना? पण, तरी ‘क’ म्हणताना त्या ‘क’ला पूर्णत्व देणारा ‘अ’ दिसत नाही. थोडक्यात, या दृश्य जगाला आधारभूत सूक्ष्म तत्त्व लपून जातं. या ‘क’चं- म्हणजेच भ्रमपोषक दृश्यप्रभावाचं दमन म्हणजे खरा ‘कदम्ब’ आहे! लक्षात घ्या, हे दृश्याचं दमन नाही, तर त्याच्या भ्रामक प्रभावाचं दमन आहे!