– चैतन्य प्रेम

जे दमन करायचं आहे ते दृश्याचं नव्हे, तर दृश्यप्रभावाचं आहे. ते दमन तरी का करायचं? कारण जे दृश्य आहे ते अशाश्वत, अनित्य आणि सतत बदलणारं म्हणजेच अस्थिर आहे. त्यात जर माझं मन गुंतलं तर ते कधीच स्थिर राहणार नाही. मन स्थिर नसेल, तर बुद्धी स्थिर राहणार नाही. मग या मनुष्यजन्माचा खरा लाभ मला घेता येणार नाही. श्रीगुरुजींचा एक दोहा आहे. त्यात म्हटलंय, ‘‘नहीं एक जैसा समय ए हमेशा। प्रतिक्षण में परिवर्तनहिं हो रहा है।। बन ना अचेतहिं चेतन ओ प्रानी। सभी आवरण नर्तनहिं हो रहा है।।’’ म्हणजे जगातील वस्तू, व्यक्ती सोडाच, काळसुद्धा एकसारखा राहत नाही. प्रत्येक क्षण परिवर्तनाचा असतो आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्या बदलाच्या तालावर नाचत असते. मग अशा अस्थिर दृश्याला सत्य मानणारं, कायमचं सुखाचं मानणारं आणि त्या भावनेनं धरून ठेवणारं मन कधी स्थिर होईल का? त्यासाठीच हा दृश्यप्रभाव शिष्याच्या मनातून ओसरावा, ही सद्गुरूंची इच्छा असते. त्या दिशेनंच ते प्रयत्नही करीत असतात. दृश्य सोडायची गरज नसते, त्या दृश्याचं वास्तविक स्वरूप आणि व्याप्ती कळणं आवश्यक असतं. ती कळली, तर दृश्यात राहूनही दृश्याच्या प्रभावातून, पगडय़ातून बाहेर पडता येईल. आता क्वचित कुणाच्या मनात शंका येईल की, श्रीकृष्ण म्हणजे सद्गुरू आणि अर्जुन म्हणजे शिष्य कसा? तर त्याला ‘गीते’चा अर्थात ‘ज्ञानेश्वरी’चा दाखला आहे. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, ‘‘जयाचेनि संबंधें बंधु फिटे। जयाचिया आशा आस तुटे। जें भेटलया सर्व भेटे। आपणपांचि।। तें तूं गुरुलिंग जी माझें। जें येकलेपणींचें विरजें। जयालागीं वोलांडिजे। अद्वैतबोधु।।’’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १८/ ओव्या १५६९-७०). म्हणजे, ‘ज्याच्याशी अनन्य संबंध जुळताच सगळे बंध नष्ट होतात, ज्या एकाची आशा मनात अखंड उत्पन्न होऊ  लागली की जगाची आस मावळते, ज्याची प्राप्ती झाली असता पूर्णप्राप्ती आपोआपच होते, ज्याच्या प्रीतीकरिता अद्वैतबोधही उल्लंघून प्रेमी आणि प्रियतम अर्थात भक्त आणि भगवंत या द्वैतात उतरून एकांतातच ज्याला गवसता येते अशी गुरुमूर्ती, हे कृष्णा तूच आहेस!’ पुढे १५७३ व्या ओवीत, ‘‘तो तूं माझा जी निरुपचारु। श्रीकृष्णा सेव्य सद्गुरू।’’ म्हणजे निरुपाधिक सेवा करण्यास योग्य असा सद्गुरू तूच आहेस, असंही म्हटलं आहे. आणि जिथे असा खरा सद्गुरू आणि खरा शिष्य यांचं खरं ऐक्य घडतं, तिथं विजय ठरलेलाच आहे, असं ‘गीता’च सांगते! आणि असं ऐक्य जिथं घडलं आहे तिथं ‘क’ अर्थात दृश्याच्या प्रभावाचं दमन करण्यासाठी साह्य़भूत झालेला ‘कदम्ब’ही आहेच! आणि म्हणून ‘भक्तकदम्ब’ अशी शब्दयोजना माउलींनी केली आहे. आता भगवंतानं अर्जुनाला आणि उद्धवाला हा एकरूपतेचा उपदेश स्वतंत्र काळी, स्वतंत्र पार्श्वभूमीवर केला. एकाला लढायला प्रवृत्त करताना, तर दुसऱ्याला संन्यास घेण्याची प्रेरणा देताना हा एकात्मयोग सांगितला. आपण काही त्यांच्या जवळपासही कणभरदेखील पोहोचू शकत नाही, हे खरं. मग आपल्यासाठी काही मार्ग आहे की नाही? तर, निश्चितच आहे! तो नसता किंवा सांगायचा नसता, तर एकादश स्कंधावर एकनाथ महाराजांनी इतकी विस्तृत ग्रंथनिर्मिती केलीच नसती! अर्जुनाला लढण्याची आणि उद्धवाला संन्यस्त होण्याची प्रेरणा देणारा भगवंत या माध्यमातून आपल्याला या दोन्ही गोष्टींच्या दिशेनं अलगद वळवीत असतानाच खऱ्या अर्थानं जगण्याची प्रेरणा देत आहे.