– चैतन्य प्रेम

अर्जुन कुणी सामान्य नव्हता. तो शूर होता, लढवय्या होता. कौरवांविरुद्धचं युद्ध आपण जिंकूच, असा त्याला पूर्ण विश्वास होता. पण तरीही प्रत्यक्ष रणभूमीवर, ज्यांना आपण मारणार आहोत ते आपलेच आप्तस्वकीय आहेत, हे पाहून त्याच्या मनात क्लेश आणि मोह उत्पन्न झाला. त्यानं तो गलितगात्र झाला. साधनेच्या पथाकडे वळलेल्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं जीवन म्हणजेसुद्धा एक संघर्षच आहे. हा आंतरिक संघर्ष असतो. आपल्या मनाच्या भ्रामक ओढींविरोधात पावलं टाकत सद्बोधानुसार जीवन जगायला धैर्य लागतं. खरं तर ते धैर्य आणि त्या सर्व क्षमता आपल्यात असूनही आपण भ्रम आणि मोहामुळे स्वत:ला हतबल मानू लागतो. तेव्हा आपल्याला या जीवनसंघर्षांत केवळ सद्गुरूंची आणि त्यांच्या बोधाचीच साथ असते. अर्जुनाला जीवनवास्तवाला सामोरं जाण्याची कला भगवंतानं ‘गीते’तून शिकवली आहे. तो ‘गीते’चा पाया आहे, तर मुक्तीच्याही पलीकडे असणाऱ्या अभेद भक्तीचं भगवंतानं उद्धवाला घडवलेलं दर्शन आणि त्या भक्तीचा उलगडवून दाखवलेला मार्ग हा ‘भागवता’चा कळस आहे! आपल्या जीवनाचं ध्येय ते असावं, निदान जो साधना करीत आहे त्याचं तरी ध्येय ते असावं, हा निश्चय ‘भागवत’ बिंबवतं. आता ती अभेद भक्ती काही सहजी साधत नाही. म्हणून लहान मुलाला आई ज्या प्रेमानं, रूपकांचा वापर करीत हळूहळू घास भरवते, तसं ‘भागवतकथा’रूपी माउली साधकाची अलगद जडणघडण करते. आई मुलाला त्याच्या अवतीभवतीच्या पशुपक्ष्यांची नावे घेत शब्द शिकवते आणि अन्नाचा एकेक घासही भरवते. त्याचा हेतू ज्ञान वाढावं आणि शरीराचं पोषण व्हावं, हाच असतो. त्याप्रमाणे अवधूताच्या माध्यमातून या सृष्टीकडे  गुरुतत्त्वाच्या दृष्टीनं पाहायला ‘भागवतकथा’रूपी माउली अगदी नकळत शिकवत असते. अवधूत योगी आणि यदु राजाच्या संवादातून चराचरांतलं गुरुतत्त्वच आपल्यासमोर उलगडतं. पृथ्वी या पहिल्या गुरूकडून आपण शांती, समत्व आणि दातृत्व हे तीन गुण कसे ग्रहण केले, हे अवधूतानं सांगितलं. त्यानंतर वायू या दुसऱ्या गुरूकडून समदृष्टी आणि अलिप्तपणा कसा शिकलो, हे सांगितलं. या दोन तत्त्वांचा आपण विचार केला आणि आता अवधूताचा जो तिसरा गुरू आहे ‘आकाश’, त्या आकाशतत्त्वाकडे आपण आता वळणार आहोत. अर्थात, पृथ्वी आणि वायूनंतरचा आकाश हा त्याचा तिसरा गुरू आहे! या तिसऱ्या गुरूकडे वळण्याआधी थोडा विचार करा. अवधूताला अवतीभवतीच्या सृष्टीतच बहुतांश गुरू गवसले आहेत. त्यानं निवडलेल्या २४ गुरूंपैकी पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, समुद्र, माशी, मधमाशी, मासा, बालक आणि आपला नरदेह या गोष्टी आपण आजवर असंख्य वेळा पाहिल्या आणि कमी-अधिक प्रमाणात अनुभवल्याही आहेत. पण तरी अवधूताच्या मनाला त्यांच्यातलं जे ‘गुरुत्व’ भिडलं वा उमजलं, ते आपल्या मनाला का भिडत नाही? ते भिडावं, हाच तर या यदु-अवधूत संवादाचा हेतू आहे. जोवर खरा सद्गुरू आधार प्राप्त होत नाही, तोवर माणसानं सावधपणे वावरलं पाहिजे. ढोंगी गुरूच्या नादी लागता कामा नये. त्यापेक्षा सद्ग्रंथातील बोधाचा आधार घेत भगवंताच्या स्मरणाला चालना देईल, अशी उपासना आचरली पाहिजे. डोळे उघडून त्यानं भवतालच्या सृष्टीकडे पाहिलं तरी ही सृष्टीसुद्धा त्याला बोध करीत असते, हेच अवधूताच्या संवादामुळे कळतं!