– चैतन्य प्रेम

आकाशासारखं ज्याचं मन व्यापक आणि उदासीन असतं, तो भक्त मला प्रिय आहे, असं भगवान श्रीकृष्ण ‘गीते’त अर्जुनाला सांगतात. या श्लोकातला ‘अनपेक्ष’ हा शब्द फार वेगळा आहे, असं गेल्या भागात म्हटलं. ‘एकनाथी भागवता’त यदु राजा आणि अवधूताच्या संवादात अवधूतानं आपले २४ गुरू सांगताना ‘आकाश’ या गुरूचे गुण सांगितले. त्यात यदुला अवधूत सांगतो की, ‘‘आकाश अभेदत्वानं सर्व पदार्थमात्रांत समानतेनं भरून आहे, पण ते असंग आहे! त्यामुळे आकाशाला मी गुरू मानलं आहे.’’ आता हे जे उदासीन, अनपेक्ष आणि असंग शब्द आहेत ना, ते फार विलक्षण आहेत. ‘उदासीन’ म्हणजे काय? तर यात दोन शब्द आहेत ‘उद्’ आणि ‘आसीन’. ‘उद्’  म्हणजे वरती आणि ‘आसीन’ म्हणजे असणं. थोडक्यात उदासीन म्हणजे जगात वावरत असताना जगाची जी स्वार्थमूलक आणि स्वार्थकेंद्रित मनोरचना आहे तिच्यापासून वर स्वत:ला स्थित करणं! ‘असंग’ आणि ‘अनपेक्ष’ हे शब्दच किती वेगळे आहेत पाहा! आपल्याला ‘नि:संग’ आणि ‘निरपेक्ष’ हे शब्द माहीत आहेत. नि:संगमध्ये संगातून सुटका आहे, निरपेक्ष म्हणजे अपेक्षा ठेवण्याच्या वृत्तीतून सुटका आहे. पण याचाच अर्थ, जो आज नि:संग झाला आहे तो कधीकाळी संगामध्ये बद्ध होता! जो निरपेक्ष झाला आहे तो कधीकाळी अपेक्षांमध्ये बद्ध होता! आता त्या मनोवृत्तीच्या पकडीतून तो मोकळा झालाय. आणखी एक ढळढळीत सत्य असं आहे की, या जगातली कोणतीही गोष्ट तुम्हाला संगामध्ये बद्ध करीत नाही की अपेक्षांत अडकवीत नाही. मनाच्या ओढीतून आपणच भ्रम, मोह, आसक्तीनं त्यात बद्ध होतो, अपेक्षा बाळगत लाचार होतो. तर सांगायचा मुद्दा असा की, नि:संग आणि निरपेक्ष या शब्दांना कधीकाळच्या संगाचा आणि अपेक्षांचा ओसरत चाललेला वास येतो, पण असंग आणि अनपेक्ष हे शब्दच खणखणीत आहेत! असंगमध्ये कधी संग घडलेलाच नाही आणि अनपेक्ष म्हणजे कधी अपेक्षा मनाला शिवलेलीच नाही, याचं सूचन आहे. आता असे केवळ आणि केवळ सद्गुरूच असतात. म्हणूनच तर असंग आकाशात अवधूताला गरुबोध गवसला. आपण सर्व या ना त्या प्रकारे संगामध्ये बद्ध आहोत, अपेक्षांमध्ये बद्ध आहोत, म्हणूनच ‘आपला’ आणि ‘परका’ अशा भेदबुद्धीनं जगाकडे पाहात आहोत. पण जर अध्यात्माच्या मार्गावर चालायचं असेल, तर आपल्याच मनानं दृढ केलेली संगाची जाळी आपल्यालाच तोडावी लागतील. याचा अर्थ जगाशी संबंध तोडावा, असं नव्हे. नाती तोडावीत, असाही नव्हे. जगात वावरावं, भौतिकाचा उपभोगही घ्यावा, नाती आणि नात्यांतली कर्तव्यं जपावीत; पण त्यात स्वत:ला जखडून घेऊन त्यापलीकडे आयुष्यच नसल्यागत गुंतून पडू नये. आळंदीचे शिंदे माउली म्हणून ज्ञानेश्वरीचे अभ्यासू निरूपणकार आहेत. त्यांनी एका निरूपणात सांगितलं की, ‘‘परमार्थ न करणाऱ्या माणसापेक्षा परमार्थ करणाऱ्यांच्याच चेहऱ्यावर दु:ख जास्त दिसतं! कारण आपला परमार्थ विचाराचा नाही!’’ काय अंतर्मुख करणारं सत्य सांगितलंय पाहा! अरे, परमार्थाला लागलो ना? मग त्या साधनेचं थोडं तरी प्रतिबिंब चेहऱ्यावर नको का? कसून व्यायाम करूनही शरीर लेचंपेचंच राहिलं, तर त्याचा अर्थ, व्यायाम नीट सुरू नसावा, असाच कुणीही लावील ना? तेव्हा विचाराचा परमार्थ करायचा म्हणजे परमार्थ समजून आणि उमजून केला पाहिजे. अवधूतानं त्यासाठी जणू अवघ्या जगालाच गुरू मानलं होतं!