13 August 2020

News Flash

३२६. दिव्य गुणदर्शन

यदु- अवधूत संवाद सुरू का झाला आणि चराचरातील आपल्या गुरूंची महती अवधूत का गात आहे, हे पुन्हा एकदा लक्षात घेऊ.

 

– चैतन्य प्रेम

यदु- अवधूत संवाद सुरू का झाला आणि चराचरातील आपल्या गुरूंची महती अवधूत का गात आहे, हे पुन्हा एकदा लक्षात घेऊ. मग या ‘गुरूं’चं महत्त्व अधिक उमगेल.  हा यदु-अवधूत संवाद उद्धवाला सांगण्याआधी भगवंतानं यदुची थोरवीही मांडली होती. भगवंत म्हणाले की, ‘‘राजा यदु म्हणसी कैसा। क्षात्रसृष्टीचा सूर्यो जैसा। राजचंद्राच्या प्रकाशा। निजतेजवशा लोपितु।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय ७, ओवी २५६). यदुराजा हा क्षत्रियांच्या मांदियाळीत स्वयंप्रकाशानं तळपणारा सूर्यच.. इतर राजे जणू चंद्र! अर्थात चंद्राचं तेज जसं सूर्याकडूनच घेतलेलं असतं, तसं या राजांचं सामर्थ्य आणि दरारा यदुच्याच कृपेवर अवलंबून होता. आणि अशा या सामर्थ्यवान राजानं जेव्हा अवधूताला पाहिलं तेव्हाच तो त्याच्या स्वयानंद स्वयंतेजपूर्ण रूपानं थक्क झाला होता. तो अवधूत निर्भय, नि:शंक आणि समग्र सृष्टीशी जणू एकरूप होता. समस्त चराचर जणू त्याच्या अधीन भासत होतं. त्याच्या कोणत्या गुणांनी यदु प्रभावित झाला? यदुनं स्वत: त्या गुणांचा उच्चार केला आहे. तो म्हणतो, ‘‘अपूर्व बुद्धि हे स्वामी। तुमचे ठायीं देखो आम्ही। जे न लभे यमनियमीं। कर्मधर्मी आचरता।।’’ (अ. ७, ओवी २७८). ‘हे स्वामी, तुमची बुद्धी अपूर्व आहे. ती यम-नियम उपासनेनं किंवा कर्माचरण आणि धर्माचरणानं प्राप्त होणारी नव्हे!’ पाहा, स्वत: सम्राट असलेला यदु अवधूताला ‘स्वामी’ म्हणत आहे, त्याच्यासमोर नम्रतेनं मस्तक झुकवत आहे! पुढील ओव्यांत तर गुणांची उधळणच आहे. यदु म्हणतो, ‘‘दिसतोसी सर्वार्थी कुशळ। परी काही न करुनि निश्चळ। अकर्तात्मबोधे तूं केवळ। जैसें बाळ अहेतुक।। २७९।।’’ म्हणजे तू सर्वार्थानं कुशल आहेस, पण तरीही कर्तेपणापासून मुक्त आणि निश्चळ आहेस. ‘‘तूं बालाऐसा वर्तसी। परी बालबुद्धि नाहीं तुजपासीं। सर्वज्ञ सर्वथा होसी। ऐसें आम्हांसी दिसतसे।।२८०।।’’ तू बालकवत् निरागस आहेस, पण बालबुद्धीचा नाहीस! तू सर्वज्ञ आहेस. अवधूताच्या आंतरिक स्थितीविषयी यदु म्हणतो की, ‘‘निजानंदे निवालासी। अंतरी शीतलु झालासी।’’ म्हणजे, तू निजानंदानंच तृप्त आहेस. अंत:करणपूर्वक शीतल आहेस. मग म्हणतो, ‘‘सदा सावध निजरूपेंसी। यालागीं माझें तुझें न म्हणसी।’’ म्हणजे तू सदैव सावध आहेस, निजरूपाचं तुझं ज्ञान क्षणभरही ढळत नाही. म्हणूनच ‘माझं-तुझं’ अशा संकुचित द्वैतभावात तू कधीच अडकत नाहीस. पुढे म्हणतो की, ‘तुझी अक्षोभ्यता नवल वाटावी अशी आहे.’ एका राजाचं वरकरणी सामान्य भासणाऱ्या अवधूताकडे नुसतं लक्षच जाऊ नये तर त्याच्यातील गुणही कळावेत, हेच मोठं नवल. नाहीतर असं होतं की तुम्ही भौतिक जगात जितक्या उंचीवर जाता तितके खुजे होत जाण्याचा, संकुचित होत जाण्याचा धोका मोठा असतो. आपल्याइतका असामान्य कुणी झालाच नाही आणि होणारही नाही, अशा दर्पानं ग्रासलं गेल्यावर दुसऱ्या माणसातले गुणही दिसेनासे होतात. यदुची तशी गत झाली नाही. अवधूताला तो मोठय़ा आदरानं म्हणाला, ‘तू ब्रह्मवेत्ता आहेस, निजानंदानं परिपूर्ण आहेस, त्या आनंदाचं कारण विशद करून सांग! .. तू कृपाळू, आर्तबंधू, दीनदयाळ, भक्तवत्सल असूनही अलिप्त कसा आहेस, हेही सांग!’ यदुराजाच्या या प्रश्नाच्या उत्तरात अवधूतानं चराचरातले चोवीस गुरू सांगितले. पण या ‘गुरूं’मागील त्याचा भाव अतिशय विराट आहे. तो जाणून घेताना साधकही अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 12:05 am

Web Title: loksatta ekatmayog article 326 abn 97
Next Stories
1 ३२५. असंग उदासीन
2 ३२४. व्यापक आणि उदास!
3 ३२३. सर्वव्यापक
Just Now!
X