– चैतन्य प्रेम

अवधूताच्या गुणांनी प्रभावित झालेल्या यदुराजानं अवधूताच्या आनंदाचं कारण विचारलं. हा निजानंद होता बरं का! म्हणजे तो आनंद कोणत्याही बाह्य वस्तू, व्यक्ती वा परिस्थितीवर अवलंबून नव्हता. कोणत्याही परिस्थितीत तो भंगणारा नव्हता. त्याउलट आपला आनंद हा बाह्य़ परिस्थितीच्या अनुकूलतेवर, प्रिय व्यक्तीच्या असण्या-नसण्यावर, आवडत्या वस्तूच्या मिळण्या-न मिळण्यावर अवलंबून असतो. पुन्हा जी परिस्थिती आज अनुकूल वाटते तीच उद्या प्रतिकूल वाटू शकते, जी व्यक्ती आज प्रिय आहे तीच उद्या अप्रिय होऊ शकते, जी वस्तू आज हवीहवीशी वाटते ती उद्या डोईजड वाटू शकते; हा भाग वेगळाच. मग हे सारं अवधूत कुणाकडून शिकला, हाच प्रश्न खरं तर यदुच्या मनात आला आहे आणि त्यानं मोठय़ा नम्रतेनं त्या प्रश्नाचं उत्तर ज्यातून गवसेल, असा प्रश्न विचारला आहे की, ‘‘हे ब्रह्मवेत्त्या, तुझ्या आनंदाचं कारण काय? रहस्य काय?’’ सत्पुरुषाकडे पाहून आपल्या मनातही खरं तर हा प्रश्न तरळून जातो की, ‘हे इतके आनंदी कसे?’ पण त्या उत्तराची तळमळ नसल्यानं क्षणभर आश्चर्य वाटण्यापलीकडे आपली मजल जात नाही. आपण पुन्हा आपल्या दु:खमिश्रित जगण्यात स्वत:ला लगेच झोकून देतो! कलावती आई एक गोष्ट सांगत. एका चातुर्मासात एका गावात बाहेरगावच्या एका पुराणिकानं रोज निरूपण सुरू केलं. निरूपणाआधी तो ‘‘नर्मदे हर.. हर हर गंगे नमामि गंगे!’’ म्हणायचा. तर एका बाईच्या डोळ्यांना आसवांची धार लागे. निरूपण संपेपर्यंत बाई डोळे पुसत असत. एक महिना उलटला तेव्हा पुराणिकाला या बाईच्या संवेदनशील स्वभावाचं कौतुक वाटलं. त्यानं न राहवून विचारलंच की, ‘‘बाई तुम्ही निरूपण सुरू झाल्यापासून का बरं रडता?’’ बाई म्हणाली, ‘‘तुम्ही नर्मदे हर, हर गंगे म्हणता ना? तर गंगा आणि नर्मदा या माझ्या दोन गायींची मला फार आठवण येते. त्या काही वर्षांपूर्वीच गेल्या बघा!’’ तर अशी आपली स्थिती आहे. प्रवचन ऐकतानाही आम्हाला आमचं भौतिकच आठवत असतं. मग, कोणत्याही परिस्थितीत आनंद कसा लाभतो, हा प्रश्न मनात कशाला येईल? पण यदुराजाच्या मनात प्रश्नही आला आणि त्यानं तो नम्रतेनं विचारला. इथं भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील ३४व्या श्लोकाचं स्मरण होतं. भगवंत सांगतात की, ‘‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन:।।’’ म्हणजे, ‘गुरूंकडे जाऊन नम्रपणे त्यांना प्रश्न विचार, त्यांची सेवा कर मग ते तुला परमज्ञान देतील!’ याचा भावानुवाद करताना माउलीही म्हणतात की, ‘

‘तें ज्ञान पैं गा बरवें। जरी मनीं आथि आणावें।

तरी संतां या भजावें। सर्वस्वेशीं।।

जे ज्ञानाचा कुरुठा। तेथ सेवा हा दारवंटा।

तो स्वाधीन करीं सुभटा। वोळगोनी।।

तरी तनुमनुजीवें। चरणासीं लागावें।

आणि अगर्वता करावें। दास्य सकळ।।

मग अपेक्षित जें आपुलें। तेंही सांगती पुसिलें।

जेणें अंत:करण बोधलें। संकल्पा न ये।।’’

याचा प्रचलित अर्थ हाच सांगतात की, ‘ते परम ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर सर्वभावे संतांना भजावं, मग ज्ञानाचं माहेरच अशा संताची सेवा हाच उंबरठा आहे. तो स्वाधीन करून गर्व सोडून दास्य केल्यास ते आत्मज्ञान करून देतील!’ आता प्रश्न असा की मग यदुराजानं यातलं काहीच न करता आणि केवळ नम्रतेनं प्रश्न विचारला असता अवधूतानं एवढं विस्तारानं उत्तर कसं दिलं?