11 August 2020

News Flash

३२९. पूर्ण तयारी

परम ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर सर्वभावे संतांना भजावं.

 

– चैतन्य प्रेम

परम ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर सर्वभावे संतांना भजावं. मग ज्ञानाचं माहेरच अशा संताच्या बोधानं जागृत होऊन गर्व सोडून दास्य करीत असताना प्रपंच आणि परमार्थाचं संतुलन जो राखतो, त्यालाच सत्पुरुष आत्मज्ञान करून देतील! आता प्रश्न असा की, यदुराजानं यातलं काहीच केल्याचं वरकरणी दिसत नसताना आणि केवळ नम्रतेनं प्रश्न विचारला असताना अवधूतानं एवढं विस्तारानं उत्तर कसं दिलं? तर याचं उत्तर जाणून घेण्याआधी-प्रपंच आणि परमार्थाचं संतुलन म्हणजे काय, तेही जाणून घेतलं पाहिजे. संतुलन म्हणजे निम्मं निम्मं नव्हे, समप्रमाणात नव्हे! संतुलन म्हणजे यथायोग्य त्या प्रमाणात! समर्थाचंही वचन आहे, ‘‘आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका!’’ त्याचाही अर्थ लोक असाच घेतात की, समर्थानी प्रपंच आधी नीटनेटका करायला सांगितला आहे, मग परमार्थ! पण ‘नेटका’ म्हणजे आवश्यक तितकाच, हा अर्थ आपण लक्षात घेत नाही. ‘ज्याला प्रपंच जमत नाही, त्याला परमार्थही साधत नाही,’ असं एक बोधवचन आहे. पण हीदेखील प्रपंचाची भलामण नव्हे. तर, थोडक्यात आटोपायचा प्रपंचच ज्याला आटोपता येत नाही, तो परमार्थ सुरूही करू शकत नाही, हे वास्तवच मांडलं आहे. यदुराजा हा जरी सम्राट होता तरी त्याच्या अंत:करणात प्रपंचलालसा नव्हती. खरं पाहता, आपल्याहून कुणी आनंदी असेल, हेच कुणा सम्राटाला कधी वाटणार नाही! फार सूक्ष्म आहे बरं हे! तर यदुराजानं मात्र हे जाणलं की, आपल्याहून हा फकीर वृत्तीचा योगी अधिक आनंदी आहे. हे जाणून तो थांबला नाही, तर मोठय़ा नम्रतेनं त्या आनंदाचं कारणही त्यानं विचारलं. यदूची ही नम्रता पाहूनच तर अवधूतानं चराचरांतील गुरुतत्त्वाची माहिती त्याला दिली. वरकरणी पाहता ती लगेच दिली असं वाटतं; पण यदूच्या अंतरंगाची पारख अवधूतानं क्षणार्धात केली आणि मग तो भरभरून बोलू लागला आहे. तेल नसलेली आणि ज्योतही जळून गेलेली अशी पणती पेटू शकत नाही; पण ज्याच्या अंतर्मनाच्या पणतीत श्रद्धारूपी तेल काठोकाठ भरून होतं आणि सूक्ष्म ज्ञान ग्रहण करण्याइतपत बुद्धीरूपी वातही एकाग्र होती, ती पणती अवधूताच्या आत्मज्योतीच्या स्पर्शानं पेटायला कितीसा वेळ लागणार होता! श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या लीलाचरित्रातील एक प्रसंग आहे. श्रीब्रह्मानंद बुवा हे गोंदवल्यास श्रीमहाराजांकडे आले आणि पाहता पाहता अतिशय वेगानं श्रीमहाराजांशी एकरूप झाले. त्यामुळे एक-दोन शिष्यांच्या मनात थोडा विकल्प आला. की, बुवा आमच्यानंतर आले, तरी त्यांची प्रगती कशी झाली? दोघांमध्ये ही चर्चा सुरू असताना ते कुठलीशी वस्तू आणायला खोलीत गेले. खोलीत अंधार होता आणि दोघं ती वस्तू शोधण्यात गर्क होते, पण ती वस्तू काही सापडत नव्हती. तोच ब्रह्मानंद बुवा छोटी दिवली घेऊन खोलीत आले आणि ती वस्तू सापडली. मग या दोघांनी अतिशय प्रामाणिकपणे बुवांनाच आपल्या मनातला प्रश्न विचारला. बुवा हसून म्हणाले, ‘‘तुम्ही शोधत होतात ती वस्तू याच खोलीत होती, पण अंधारामुळे ती मिळत नव्हती. दिवा आणताच ती मिळाली. तसंच आहे हो हे!’’ म्हणजे काय? तर महाराजांनी जे नाम बुवांना दिलं तेच प्रत्येकाला दिलं होतं आणि देत होते. पण बुवांनी त्या नामाला सर्वस्व मानलं आणि म्हणून त्यांना पूर्णज्ञान साधलं. यदुराजाच्या अंत:करणाची तशी तयारी होती म्हणून अवधूतानं गुरुतत्त्वाचं ज्ञान तात्काळ दिलं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:05 am

Web Title: loksatta ekatmayog article 329 abn 97
Next Stories
1 ३२८. सेवा हाचि उंबरठा!
2 ३२७. प्रश्नाचा उंबरठा
3 ३२६. दिव्य गुणदर्शन
Just Now!
X