08 August 2020

News Flash

३३०. तीन अपराध

सद्गुरू हा ‘साक्षात’- म्हणजे डोळ्यांना दिसणारं परब्रह्मच आहे

 

– चैतन्य प्रेम

अवधूत हा यदुराजाला चराचरांतील गुरुतत्त्व सांगत आहे, त्यामागेही एक रहस्य आहे बरं का! सद्गुरू-तत्त्वाचं वर्णन काय आहे? तर ‘गुरू: साक्षात् परब्रह्म’! सद्गुरू हा ‘साक्षात’- म्हणजे डोळ्यांना दिसणारं परब्रह्मच आहे. परब्रह्म म्हणजे काय? तर चराचरांत सर्वत्र जे व्याप्त आहे ते. आणि म्हणूनच गुरुतत्त्वाचं दर्शनही चराचरांत सर्वत्र घडतं, असं अवधूताचं सांगणं आहे. ‘अवधूत गीते’च्या आठव्या अध्यायात पहिला श्लोक आहे तो असा : ‘‘त्वद्यात्रया व्यापकता हता ते। ध्यानेन चेत: परता हता ते। स्तुत्या मया वाक् परता हता ते। क्षमस्व नित्यं त्रिविधा पराधान्।।’’ या श्लोकावर श्रीधर स्वामी यांनी ‘गुरुतत्त्व’ या प्रवचनात विवेचन केलं आहे. त्याचाही आधार आपल्या या चिंतनाला आहे. तर, ‘त्वद् यात्रया’ म्हणजे तुला भेटण्यासाठी मी यात्रा करतो आणि त्यामुळे व्यापक अशा तुला एका गावात, एका स्थानी, एका रूपात मी कोंडून टाकतो. म्हणजे साईबाबांचं दर्शन घ्यायचंय ना, तर शिर्डीलाच जायला हवं, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी, गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यातच जायला हवं. तिथं जाऊन मीच वर उच्चरवानं म्हणतो, ‘‘अनंतकोटी ब्रह्माण्डनायक.. अखंड मंडलाकारं’’! तिथून बाहेर पडलं आणि एकदा का सद्गुरूंचं गाव मागे पडलं, की त्यांनी चराचर व्यापल्याचा तो भाव क्षणार्धात विसरतो. याचा अर्थ सद्गुरूस्थानाला महत्त्व नाही असा नाही बरं. पण तिथं गेल्यावरच त्यांचं दर्शन घडतं, हा भाव चुकीचा आहे, हा पहिला अपराध आहे, हे ‘अवधूत गीता’ लक्षात आणून देते. मग आम्ही ध्यानानं त्यांचं दर्शन साधायचा प्रयत्न करतो. आता हे ध्यान मनानंच घडतं आणि त्यामुळे जो मनातीत आहे त्याला मनानं जाणण्याचा प्रयत्न हा दुसरा अपराध आहे. आपण स्तुतीनं त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जो वाणीपलीकडे आहे, वाणीनं ज्याचं वर्णन होऊ शकत नाही, त्याचं वर्णन वाणीनं करण्याचा तिसरा अपराध घडतो. बाबूराव अथणी म्हणून एका भक्तानं चिले महाराजांच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यात कोल्हापूरचा एक प्रसंग आहे. एकदा बाबूराव महाराजांकडे येत असताना त्यांचे एक मित्र वाटेत भेटले. त्यांचा काही महाराजांवर विश्वास नव्हता. त्यामुळे ते बाबूरावांना म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्यांनी तरी अशांकडे जाऊ नये.’’ त्यावर हे महाराज कसे वेगळे आहेत, चांगले आहेत हे काही उदाहरणं देत बाबूराव सांगू लागले. त्यात अर्धा तास गेला. ते धावतच महाराजांकडे आले, तर महाराज संतापले होते. यांना कळेना, काय झालंय ते. महाराज एकदम ओरडले, ‘‘चल, आधी अंबाबाईची क्षमा मागायला चल!’’ त्यांना पायात चपला घालू न देता महाराज स्वत:ही अनवाणी निघाले. भर माध्यान्हीचं टळटळीत ऊन. रस्ता तापलेला. पाय पोळताहेत. अर्धा तास कित्येक गल्लीबोळांतून महाराजांनी फिरवलं. बाबूराव दमल्यावर एका झाडाच्या सावलीत त्यांना बसू दिलं. महाराज मात्र अनवाणी पायांनी भर उन्हातच उभे. बाबूराव क्षमा मागू लागल्यावर महाराज म्हणाले, ‘‘अर्धा तास माझी निंदा करत होतास काय? आता सांग की परत असं करणार नाही!’’ बाबूराव कळवळून म्हणाले, ‘‘मी तुमची स्तुतीच करीत होतो.’’ महाराज ताडकन म्हणाले, ‘‘अरे, ज्याच्या हृदयात श्रद्धा नाही, त्याच्यासमोर केलेली स्तुती निंदेतच परावर्तित होते!’’ म्हणजे स्तुतीही अपराधच ठरते!

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 12:06 am

Web Title: loksatta ekatmayog article 330 abn 97
Next Stories
1 ३२९. पूर्ण तयारी
2 ३२८. सेवा हाचि उंबरठा!
3 ३२७. प्रश्नाचा उंबरठा
Just Now!
X