– चैतन्य प्रेम

प्रपंचात गुंतून असलेल्या मनावरचा प्रपंच-प्रभाव सहजासहजी दूर होत नाही. प्रपंच दोन प्रकारचा असतो. स्थूल आणि सूक्ष्म. स्थूल प्रपंच म्हणजे आपलं घरदार, अन्य मालमत्ता, आप्तस्वकीय या सगळ्यांनी मिळून बनलेला दृश्यातला प्रपंच. तर पाच ज्ञानेंद्रियांनी जगाकडे असलेली जी ओढ, तो सूक्ष्मातला प्रपंच! आणि ज्यानं वरकरणी स्थूल प्रपंचाचा त्याग केला आहे असा संन्यासी या सूक्ष्म प्रपंचात अडकलेलाही असू शकतो. राजा जनक वनात दर आठवडय़ाला ठरावीक दिवशी एका तपस्वी महामुनींकडे सत्संगासाठी जात असे. जवळपासचे अनेक संन्यासी, तपाचरणीही हळूहळू ते ज्ञान ग्रहण करण्यास येऊ लागले. कधी कधी असं होई की तपस्वी, संन्यासी आधी येऊन बसत, पण राजा येईपर्यंत मुनी सत्संग सुरू करीत नसत. त्यामुळे कालांतरानं काही संन्याशांच्या मनात किंतु उत्पन्न झाला. तो असा की, आम्ही प्रपंचाचा त्याग करून आमचं आयुष्य आत्मसाक्षात्कारासाठी वाहिलेलं असताना वैभवात लोळत असलेल्या एका राजासाठी हे महामुनी थांबून राहतात, तो येईपर्यंत सत्संग सुरू करीत नाहीत, हे काही बरोबर नाही. मुनींनी त्यांच्या मनातली ही खदखद ओळखली होती. एकदा जनक राजा सत्संगासाठी आला. महामुनी सुरुवात करणार इतक्यात एक सेवक घोडय़ावरून तिथं वेगानं आला आणि जनकांना म्हणाला, ‘‘महाराज, आपल्या प्रासादाला आग लागली असून राजकोषाचा काही भागही भस्मसात झाला आहे.’’ जनकानं शांतपणे सांगितलं, ‘‘हा सत्संग झाल्यावर मी येईन. नंतर पाहू!’’ आता सत्संग सुरू होणार, तोच काही संन्याशांचे शिष्य धावत आले आणि म्हणाले, ‘‘आपल्या आश्रमांतील काही कुटींना आग लागली आहे आणि ती पसरतच आहे.’’ हे ऐकताच कित्येक संन्याशांनी घाबरून आश्रमाकडे धाव घेतली. काही वेळानं ते परतले, तोवर महामुनीही थांबून होते. ते येऊन बसल्यावर मुनी म्हणाले, ‘‘राजप्रासादाला आग लागूनही जनकांना धाव घ्यावीशी वाटली नाही. आपण तर सगळे संन्यासी. घरादाराचा त्याग करून इथं आलोय. आपल्याजवळ खरं तर गमावण्यासारखंही काही नाही. तरीही पर्णकुटींना आग लागल्याचं कळताच सत्संग सोडून तुम्हाला धाव घ्यावीशी वाटली. मग खरं सत्संगाचं मोल कुणाला आहे? ते ज्याला आहे त्याच्यासाठी मी थांबून राहतो, यात काही चूक वाटते का?’’ सर्व लज्जित आणि नि:शब्द झाले. तर सूक्ष्म प्रपंचाची ओढही इतकी सूक्ष्म असते. तेव्हा या प्रपंचात, दृश्य जगात अडकलेल्या माणसाला सत्पंथाकडे वळवणं ही सोपी गोष्ट नव्हे. ते वळवलं जाण्यासाठी सद्गुरूचं एक रूप, एक स्थान यांचा आधार घ्यावा लागतो. जगाच्या विविध मायावी रूपांत रुतलेल्या माणसाचं मन एका सद्गुरुरूपाच्या चिंतनात गोळा होऊ लागलं, जगात अनेक ठिकाणी वणवण भटकंती करणारं मन एका सद्गुरुस्थानी वारंवार येऊ लागलं, की मग जगातील मायावी रूपांचा आणि भटकंतीचा फोलपणा हळूहळू उमगू लागतो. पण अशा मनाला मग अशी सवय लागते की, सद्गुरूंचं दर्शन घ्यायचं ना? तर मग त्यांच्या गावीच गेलं पाहिजे. सद्गुरूंचं रूप पाहिलं की मगच त्याच्या अंतरंगातला भाव जागा होतो. या प्रकारे सद्गुरूंना एका साच्यात कोंडणाऱ्या आणि त्यापलीकडे त्यांचं दर्शन करू न पाहणाऱ्या मनाला व्यापक करण्यासाठी आणि चराचरांतील व्यापक गुरुतत्त्वाचं भान आणण्यासाठीच प्रत्येक गोष्टीतला गुण वा दोषसुद्धा ज्ञान देणारा गुरूच असतो, हे अवधूतानं लक्षात आणून दिलं!