– चैतन्य प्रेम

उन्हानं त्रस्त झालेल्या जीवांना पाणी पाहून आनंद होतो. खरं पाहता सगळ्या नद्या वरकरणी सारख्याच ना? पण तरीही भक्ताला गंगेच्या दर्शनानं आणि परिक्रमावासी साधकांना नर्मदेच्या दर्शनानं अपार आनंद होतो. त्या आनंदाला विशुद्ध भावनेचा स्पर्श असतो. आपल्या अंत:करणातील वाईटही या प्रवाहात वाहून जाईल, चित्त शुद्ध होईल, ही श्रद्धाही असते. मग तीर्थालाही ज्याच्या सहवासानं तीर्थत्व येतं, अशा योग्याचं दर्शन किती आनंददायी असेल? नाथ लिहितात, ‘‘पर्जन्योदक देखता जाण। जेवीं निवती सकळही जन। का गंगादिकांचे दर्शन। करी मोचन पापाचें।।४७५।। तैसें योगियाचें दर्शन। भाग्येंवीण नव्हे जाण। ज्याणें देखिले त्याचे चरण। करी मोचन भवरोगा।।४७६।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). पाऊस पाहून जनांचे डोळे निवतात, गंगा आदी तीर्थाच्या दर्शनानं भावजागृती होऊन अभाव ओसरतो, पण ही दर्शनं सहजी होतीलही. योग्याचं दर्शन मात्र भाग्य असेल, तरच साधेल. स्वयंघोषित बाबा-बुवांची दर्शनं हवी तितक्यांदा घडतील हो! पण जो सदोदित परम भावानं व्याप्त आहे अशा योग्याचं दर्शन काही सोपं नाही. त्याचे चरण जरी पाहिले, तरी भवरोग मिटतो. अर्थात त्याच्या मार्गानं आचरण सुरू केलं, तर भ्रम, मोह, आसक्तीयुक्त भवरोग आटोक्यात येऊ लागतो. आता पुढील ओव्यांतील सहा ओव्यांनी एका मोठय़ा शंकेचं निरसनही झालं आहे. पुढचीच ओवी सांगते की, अशा योग्याचं दर्शन जर साधलं नसेल ना, तर नुसता त्याच्या नामाचा जप करा. तेवढय़ानंही भवाचं जे बंधन आहे ते तुटून जाईल! (न घडे दर्शन स्पर्शन। तरी करावें त्याचें नामस्मरण। इतुकेनि भवमूळ जाण। करी छेदन तें नाम।।४७७।।). अनेकांच्या मनात प्रामाणिक शंका येते की भगवंताचं नाव घेण्याऐवजी सत्पुरुषाच्या नामाचा जप करणं योग्य की अयोग्य? म्हणजे गजानन महाराज, साईबाबा, स्वामी समर्थ यांचा जप हा सिद्धमंत्र आहे की नाही? तो जप करावा की नाही? पुढच्या पाच ओव्या त्याचा स्पष्ट खुलासा करतात. यदु-अवधूत संवादाच्या माध्यमातून श्रीएकनाथ महाराज सांगतात की, ‘‘सांडूनि भगवंताचें कीर्तन। केल्या भक्ताचे नामस्मरण। केवीं तुटेल भवबंधन। ऐसें न म्हणा सर्वथा।।४७८।।’’ भगवंताचं नामसंकीर्तन सोडून भक्ताचं म्हणजेच भगवंताचा दास म्हणविणाऱ्या सत्पुरुषाच्या नामाचं स्मरण केलं, तर भवबंधन कसं काय तुटेल, अशी शंकाही मनात आणू नका. का? तर, ‘‘देवासी पूर्वी नामचि नाहीं। त्यासी भक्तीं प्रतिष्ठूनि पाहीं। नामरूपादि सर्वही। नाना विलास अर्पिले।।४७९।। ऐसा भक्तीं देवा थोर केला। आणूनि वैकुंठीं बैसविला। भक्तउपकारें दाटला। मग त्याच्या बोलामाजीं वर्ते।।४८०।।’’ अहो, त्या देवाला स्वत:चं नावच नव्हतं. त्याला नामरूपादी सर्व देऊन भक्तानंच त्याची भक्ती रुजवली, वाढवली. भक्ताच्या भक्तीनं देव थोर झाला! त्याला वैकुंठात आणून भक्तानंच वसवलं. भक्ताच्या या ‘उपकारा’नं देव त्याचा ऋणी झाला आणि मग भक्ताचं बोलणं तो खरं करू लागला!

chaitanyprem@gmail.com