– चैतन्य प्रेम

परमतत्त्वाशी सदोदित ऐक्यतेचा योग ज्याला सहज लाभलेला असतो, तोच खरा योगी असतो. अशा योग्याचा- म्हणजेच खऱ्या सद्गुरूचा सहवास माणसाचं आत्महित साधणारा असतो. असा प्रत्यक्ष संग मिळाला नाही तरी त्याच्या नामाचा आधारही पुरेसा असतो, असं अवधूत सांगतो. इथं पृथ्वी, वायू, आकाश आणि जल हे चराचरांतले चार गुरू सांगून झाले. खरं पाहता जन्मापासून ज्यांनी ज्यांनी आपल्याला घडवलं किंवा जे आपल्या जडणघडणीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत झाले, ते माणसाचे गुरूच असतात. श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकर म्हणतात, ‘‘तू आईच्या पोटातून भूमीवर जन्म घेऊन आलास तेव्हा तुला काही कळत होते का? खाण्याला, पिण्याला, चालायला, बोलायला, बरे-वाईट, वाचन, अर्थज्ञान, सत्य-असत्य, विवेचन इत्यादी अनेक गोष्टी तुला लोकांनी शिकवल्या. ते सगळे तुझे गुरू होत. आणि तुला प्राप्त झालेल्या गोष्टींचं विचारपूर्वक ग्रहण, त्याग तू स्वत: केलास म्हणून तुझा तूच गुरू झालास आणि स्थिर चर सृष्टीपासून तुला परमार्थ प्रपंचाची खूण कळली म्हणून सर्वच गुरू!’’ (‘प्रेमतरंग’, पृ. २१-२२). थोडक्यात, लहानपणापासून अनेक लोक आपल्या जडणघडणीत सहभागी होतात, ते आपले गुरूच ठरतात. दुसरं म्हणजे, ‘मी’देखील काही गोष्टी आत्मसात करतो, तर काहींचा त्याग करतो. याअर्थी निवड आणि त्यागाची प्रेरणा देणारा ‘मी’देखील स्वत:चा एका मर्यादेपर्यंत गुरूच असतो. तिसरी म्हणजे, अवघी सृष्टी.. चराचर, हीसुद्धा मला शिकवतच असते. तर.. असं गुरुतत्त्व सर्वव्यापी आहे. अवधूत आता चराचरांतला पाचवा गुरू सांगत आहे, तो म्हणजे- ‘अग्नी’! जल हा गुरू कसा आहे, हे सांगताना अवधूतानं जलाची योग्याशी, खऱ्या भक्ताशी, अर्थात सद्गुरूंशी तुलना करीत जलतत्त्वाच्या मर्यादाही मांडल्या होत्या. आता अग्नीचं गुरूपण मांडत असतानाही योग्याची, अर्थात सद्गुरूंची महती गायली गेली आहे; पण इथं अग्नितत्त्वाला समान स्थान आहे! या अग्नीची गुरू म्हणून काय लक्षणं आहेत? तर अवधूत सांगतो, ‘‘अग्नि निजतेजें देदीप्यमान। साक्षात् हातीं न धरवे जाण। उदरमात्रीं सांठवण। सर्वभक्षण निजतेजें।।४८७।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). म्हणजे अग्नी हा स्वत:च्या तेजानंच इतका दीप्तीमान असतो की, तो हातात धरवतही नाही; पण हाच अग्नी जठराग्नी बनून पोटातही विलसत असतो, अन्नपदार्थ पचवत असतो! पुढे अवधूत एक मनोरम गोष्ट सांगतो आणि त्यामागचं रहस्य जाणवतही नाही. तो म्हणतो, अग्नी जसा हातात धरवत नाही ना, तसाच योगी भक्तीच्या तेजानं असा तळपत असतो की देवांनाही त्याला वश करता येत नाही! (तैसाचि योगियाही जाण। भगवद्भावें देदीप्यमान। त्यासी धरावया आंगवण। नव्हे जाण सुरनरां।। ४८८।।). आता, अग्नी आपण हातात धरू शकत नाही हे कळतं; पण ‘देव योग्याला त्याच्या तेजानं वश करू शकत नाहीत,’ हे वचन त्याच्या जोडीला सुसंगत कसं, असा प्रश्न आपल्याला पडतो. तर इथं मुळात योग्याला वश करून घ्यावं, असं देवांना का वाटतं, याचाही विचार केला पाहिजे. तो करता, उग्र साधना करीत असलेल्या कुणाचीही भीती देवराज इंद्राला वाटते, हे दिसून येईल. कुणीही तपानं आपलं देवेंद्रपद हस्तगत करील, अशी क्षुद्र भीती त्यामागे आहे! योग्याला वश करण्याची देवांची साधनं तरी कोणती आहेत?