– चैतन्य प्रेम

कुणीही तपश्चर्यारत असला तर तो आपलं पद घेईल, ही भीती देवराज इंद्राला असते, असं अनेक पुराणकथांतही सांगितलं आहे. हे रूपकदेखील आहे बरं का! इंद्र म्हणजे इंद्रियं. या इंद्रियांत सर्वात महत्त्वाचं अकरावं इंद्रिय आहे मन. माणूस बहिर्मुखता लोपवणारी आणि अंतर्मुखता वाढविणारी साधना करू लागला, की इंद्रियांची खळबळ वाढते. मग ती या माणसाला अधिक मोठय़ा ताकदीनं वश करू पाहतात. योग्याला वश करण्यासाठी देवांची जी साधनं अवधूत सांगतो ना, तीच साधनं मनादि इंद्रियं वापरतात! ही साधनं माया आणि त्रिगुणांचा प्रभाव! योग्याला वश करण्याची देवांची साधनं नमूद करताना अवधूत सांगतो की, ‘‘हातीं न धरवे खदिरांगारू। तैसा योगिया अतिदुर्धरू। तयासी न शके आवरूं। मायाव्यवहारू गुणेंसी।।४८९।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). खैराचे निखारे जसे हाती धरवत नाहीत, तसाच योगीही ताब्यात आणता येत नाही. मायेचा आणि तिच्या गुणांचा व्यवहार योग्यावर आपला प्रभाव पाडू शकत नाही! थोडक्यात, माया आणि सत, रज, तम हे तीन गुण माणसाला वश करण्याचे इंद्रियांचे उपाय आहेत. तपोभंगासाठी हेच उपाय देवराजानं वापरले आहेत. पण ते योग्यासमोर फिके पडतात. कारण तो गुणातीत आणि मायातीत असतो! म्हणून अवधूत सांगतो की, ‘‘अग्नीसीं जेवीं मुखचि पात्र। तैसें योगियासी उदर मात्र। ठेवा ठेवणें विचित्र। नाहीं पात्र गांठीसी।।४९०।। अग्नीनें जें जें सेवणें। तें तें जाळूनि आपुल्या ऐसें करणें। यापरी सर्व भक्षणें। नाहीं स्पर्शणें मळासी।।४९१।।’’ म्हणजे, अग्नी जे स्वीकारतो ते भक्षण करून टाकतो. तो काही राखून ठेवत नाही. तसा योगीही अपरिग्रह वृत्तीनं राहतो. तो संग्रह करीत नाही. पोट हेच त्याचं पात्र! त्या पोटाला पुरेसं तो खातो. बाकी नंतर खाण्यासाठी म्हणूनही काही राखून ठेवत नाही. कारण ते त्या वेळी मिळेल, हा त्याचा विश्वास असतो. त्याचबरोबर अग्नी ज्याचं ज्याचं सेवन करतो, ते जाळून आपल्यासारखं करतो. म्हणजे काय? समजा, आगीत आपण वेगवेगळ्या आकारांची लाकडं टाकली तरी उत्पन्न होत असतात त्या ज्वाळाच! आणि लाकडं जरी वेगवेगळी असली, तरी त्या ज्वाळा एकसमानच दिसतात. त्या रूपानं वेगवेगळ्या दिसत नाहीत. दिसते ती फक्त एकाच स्वरूपाची आग! इतकंच नाही, तर जे काही मलीन आगीला अर्पण होतं, ते स्वाहा करूनही आग स्वत: मलीन होत नाही; उलट ती त्यालाही आपल्यात सामावून घेते. तसा चित्त मलीन असलेला जीव खऱ्या सत्पुरुषापाशी पोहोचला तरी तो योगी त्याला झिडकारत नाही. त्या मलीन माणसामुळे तो मलीन होत नाहीच, उलट आपल्यात सामावून घेतो आणि आपल्यासारखाच निर्लिप्त करतो. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे. त्यांच्यापाशी राहात असलेल्या दोन साधकांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यातले एक साधक श्रीमहाराजांपाशी गेले आणि काहीशा त्राग्यानं म्हणाले, ‘‘महाराज, कशाला असली माणसं तुम्ही पदरी बाळगता? ती तुम्हाला कमीपणा आणतात!’’ त्यावर श्रीमहाराजांनी दिलेलं उत्तर सत्पुरुषाच्या करुणाहृदयाची प्रचीती देणारं आहे. महाराज म्हणाले, ‘‘अहो, मी जर एखाद्याला थारा दिला नाही ना, तर जगात कोण त्याला थारा देईल? आणि ते आता नाम घेत आहेत ना? मग त्यांच्यात पालट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याउपर माझ्या मोठेपणाची काळजी मला नाही. ती चिंता रामाकडे!’’