19 January 2021

News Flash

३४३. खरा कृपापात्र

मुंबईत अनेकदा अनेक जण नियम तोडून रेल्वेमार्गावरही चालताना दिसतात.

– चैतन्य प्रेम

गैरकृत्य केलेल्या माणसाचीही पाठराखण भगवंत कशी काय करतो, हे चूकच आहे, हा न्याय नव्हे, असं आपल्याला अगदी स्वाभाविकपणे आणि प्रामाणिकपणे वाटत असतं. देवावर कृतिशील विश्वास असो वा नसो; आत्यंतिक संकटात बहुतांश लोक भगवंताची किंवा अशी जर काही विश्वव्यापी अगम्य शक्ती असलीच, तर तिची आर्त आळवणी करतात, यातही शंका नाही. बरं, ते संकटही आपल्याच कर्मानं आपण ओढवलेलं असतं. त्यात जर खरा ‘न्याय’ करायचा, तर आपण स्वत:हून जी असेल ती शिक्षा वा परिणाम भोगण्यासाठी तळमळायला हवं! पण आपण, ‘‘यातून वाचव, पुन्हा अशी चूक करणार नाही,’’ असं सुप्तपणे आळवतोच ना? एक प्रसंग माझ्या हृदयात अगदी चित्रवत कोरला गेला आहे. खरं तर त्यात भव्यदिव्य असं वरकरणी पाहता काही नाही. तर प्रसंग असा.. मुंबईत अनेकदा अनेक जण नियम तोडून रेल्वेमार्गावरही चालताना दिसतात. त्यात पोटासाठी म्हणून फिरणारे काही कचरावेचकही असतात. कित्येकदा काही जण असे स्वत:च्या तंद्रीत असतात की, गाडीचा इशाराभोंगाही त्यांना ऐकू येत नाही. अशीच आमची गाडी वेगानं स्थानकाच्या दिशेनं काही अंतरावर असताना एक कचरावेचक लोहमार्गावर अवचितपणे आला. गाडीचा इशाराभोंगा दणाणला, तो त्याला कळलाच नाही. पण लोकांनी आरडाओरडा करताच तो बाजूला झाला आणि वाचला. लोक शिव्या घालू लागले आणि ‘‘बच गये,’’ असं ओरडले. माझं त्या निरक्षर, गरीब कचरावेचकाकडे लक्ष होतं. त्यानं काय करावं? पाठीची कागदकपटे भरलेली गोणी खाली ठेवली आणि आकाशाकडे बघत दोन्ही कान धरून वारंवार नमस्कार करू लागला. आपण वाचलो ते केवळ देवाच्या कृपेनं, हे क्षणार्धात कळणं व त्याला उगाच त्रास दिला म्हणून कान पकडून त्याची क्षमा मागणं आणि वाचविल्याबद्दल कृतज्ञतेचा नमस्कार करणं; या साध्याशा कृतीत किती असामान्य जाण होती हो! वर्षांनुवर्ष ‘भक्ती’ करणाऱ्यातही ही जाणिवेची आणि कृतीची तत्परता कित्येकदा दिसत नाही! मग अशाला त्या विराट व्यापक शक्तीनं का वाचवू नये हो? आपण वाचलो ते केवळ त्या भगवंतामुळे, हे त्याला संकट टळताच उमगलं, तर आता आलेल्या संकटातून आपण तरू तर ते केवळ देवाच्याच कृपेनं, हा टोकाचा विश्वास ज्याच्या मनात उत्पन्न होतो, तो दयेला पात्र नाही का? हा प्रश्नात्मक रोख स्वामींच्या उत्तराचा गाभा आहे. ‘‘ते पाप पुन्हा करणार नाही,’’ हे दृढ निश्चयात्मक वचन ही मात्र त्या कृपाप्राप्तीची पूर्वअट असते बरं. पण यात एक मोठं रहस्यही लपलं आहे, ते जाणून घेतल्याशिवाय या ‘कृपे’चा खरा अन्वयार्थ आणि ‘खरा कृपावंत’ही उघड होणार नाही. हे रहस्य काय, ते आता जाणून घेऊ.

chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:05 am

Web Title: loksatta ekatmayog article 343 abn 97
Next Stories
1 ३४२. दयापात्र
2 ३४१. स्वाहाकार
3 ३४०. तदाकार
Just Now!
X