– चैतन्य प्रेम

जो खरा सत्पुरुष आहे त्याच्यापाशी बरावाईट कसाही माणूस येऊ दे, त्याच्यात पालटाची प्रक्रिया सुरू झाल्याशिवाय राहात नाही. सिद्धारूढ स्वामींच्या लीलाचरित्रातली एक घटना चित्तावर अगदी कोरली गेली आहे. स्वामी हुबळीत आले तेव्हा गावाजवळच्या जंगलात राहू लागले. त्यांच्या ज्ञानाचा आणि सामर्थ्यांचा लोकांना जसा अवचित परिचय झाला तसे दिवसाउजेडी लोक त्या जंगलात येऊ लागले. गावातील काही मत्सरी लोकांना मात्र स्वामींची ही जनमान्यता सहन होईनाशी झाली. त्या जंगलात दिवसा लोकांची वर्दळ असे, पण रात्री कुणी फिरकत नसे. त्यामुळे या जंगलात रात्री एकटेच राहात असलेल्या या स्वामींना चांगली मारहाण करावी म्हणजे घाबरून ते या जंगलातून पळून जातील, असा अघोरी अविचार काहींच्या मनात आला. या कामासाठी दारूचं व्यसन असलेल्या हन्द्रैया या तरुणाची निवड झाली. मध्यरात्र उलटली तसा तो दारू पिऊनच जंगलात आला आणि स्वामींना काठीनं फटके मारू लागला. स्वामी मात्र प्रत्येक फटक्याचा ‘शिवार्पणम्’ म्हणत स्वीकार करत होते. ही मारहाण किती तरी वेळ सुरूच होती. अखेर उजाडू लागलं आणि काही लोक जंगलात येताना दिसले तशी हन्द्रैयाची नशा उतरली. स्वामींना मारल्याबद्दल हे लोक आपल्याला मारहाण करतील, असे वाटून तो घाबरून जंगलातून पळू लागला. गडबडीत पायात चपला घालायचंही तो विसरला, तेव्हा त्याच्या चपला घेऊन त्याच्यामागे धावत सिद्धारूढ ओरडू लागले, ‘‘अरे, जंगलात काटे आहेत, या चपला घाल, मग जा!’’ आपल्यासारख्या तुच्छ माणसाच्या चपला हाती घेत स्वत: अनवाणी धावत येत असलेल्या जखमी सिद्धांना पाहून हन्द्रैया हेलावून गेला आणि त्यांच्या पायावर कोसळला. तेव्हा जो खरा सत्पुरुष आहे त्याचं हृदय असं प्रेममय आणि विशाल असतं की, ते वाईटालाही सामावून घेत चांगलं बनण्याची संधी देतं. म्हणूनच अवधूत यदुराजाला सांगतो की, ‘‘..योगी जें अंगीकारी। तें आत्मदृष्टीं निर्धारी। दोष दवडूनियां दुरीं। मग स्वीकारी निजबोधें।।४९३।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). यानंतर एक फार गूढमधुर रूपक योजत एक गोष्ट अवधूत सांगतो. तो म्हणतो, ‘‘होमकुंडात अग्नी आत प्रज्वलित असतो, पण वर राखेचं आच्छादन असतं. त्याला प्रज्वलित करून याजक यज्ञ करतात (भीतरीं तेजस्वी वरी झांकिला। होमकुंडीं अग्नि पुरिला। का यज्ञशाळे प्रज्वळला। याज्ञिकी केला महायागू।।४९८।।). योग्याची लीलाही अशीच असते. होमकुंडात अग्नी असूनही सामान्य लोकांना राखच दिसते. जो खरा याज्ञिकी असतो, तो मात्र त्या राखेखालील अग्नी सहज फुंकरीनं पुन्हा प्रज्वलित करतो आणि स्वाहाकारानं यज्ञाची खरी फलप्राप्ती करून घेतो. त्याप्रमाणे कित्येकांना वरवर पाहता खरा योगी, योग्याचं खरं ज्ञानरूप समजतच नाही. ते त्याला मनुष्यभावानंच पाहतात. मात्र जे खरे भाविक आहेत तेच त्याला पाहू आणि जाणू शकतात, त्याचा खरा लाभ घेतात आणि त्याला सर्वस्व अर्पण करून जीवनमुक्त होतात! (तैशीच योगियाची लीळा। भाविकां प्रकट दिसे डोळां। एका गुप्तचि होऊनि ठेला। न दिसे पाहिला सर्वथा।।५००।। ऐशियाच्याही ठायीं। भावबळें भाविक पाहीं। अर्पिती जें जें कांहीं। तेणें मोक्ष पाहीं मुभुक्षां।।५०१।।).’’