– चैतन्य प्रेम

यदु-अवधूत संवादात ‘एकनाथी भागवता’तील एका ओवीचं विवरण करताना, भाविक खरं तर आपले प्रारब्धाचे दु:खभोगच सत्पुरुषाला अर्पित असतो, असा उल्लेख गेल्या भागात झाला. ‘‘तें पडतांचि योगियांच्या मुखीं। संचित क्रियमाणें असकीं। जाळोनियां एकाएकी। करी सुखी निजपदीं।।५०२।।’’ ही ती ओवी होय. या ठिकाणी क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध कर्माबाबत थोडा विचार करू. हीराभाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ (कुसुम प्रकाशन, अहमदाबाद) या माझ्या अतिशय आवडत्या ग्रंथाचा आधार त्यासाठी आपण घेणार आहोत. तर, कर्माचे तीन भाग आहेत. क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियमाण कर्म म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जी जी कर्मे करतो ती सर्व कर्मे! ही सर्व कर्मे केल्यावर, ती कर्त्यांला फळ देऊनच शांत होतात. उदाहरणार्थ, आपण तहान लागल्यावर पाणी पिण्याचे कर्म केले, तहान संपली म्हणजेच पाणी पिण्याचे कर्म त्याचे फळ त्वरित देऊन शांत झाले. भूक लागली, खाण्याचे कर्म केले, भूक शमवून ते कर्म शांत झाले. अशा प्रकारे फळ भोगूनच आपल्याला क्रियमाण कर्मापासून मुक्ती मिळते. परंतु कित्येक कर्मे अशी असतात, की ती तात्काळ फळ देत नाहीत. त्यांचं फळ मिळायला काही अवधी जातोच. अशा फळ न दिलेल्या कर्मानाच ‘संचित कर्म’ म्हणतात. उदाहरणार्थ, आपण आज परीक्षा देण्याचे कर्म केले; पण त्याचं फळ म्हणजे निकाल यायला वेळ लागतो. आज बीज रोवलं, त्या कर्माचं फळ म्हणजे वृक्षात रूपांतर व्हायला काही वर्ष लागतील. काही संचित कर्माची फळे या नव्हे तर पुढच्या किंवा अनेक जन्मांनीही पक्व होतात. ती संचित र्कम परिपक्व होऊन ज्या जन्मी फळ द्यायला तयार होतात, त्यांनाच आपण प्रारब्ध म्हणतो! आता जीवाकडून जी समस्त र्कम होतात, ती बहुतांश मोह, भ्रम आणि आसक्तीतूनच होतात. त्यामुळे त्यांची फळं ही बहुतांश दु:खरूपच असतात. ती फळं प्रारब्धवशात भोगत असतानाच तो त्याच मोहासक्तीतून नवनवी र्कम करीत नवं प्रारब्धही घडवत असतो. प्रारब्धाचं हे ओझं नष्ट करणं त्याच्या आवाक्यात नसतं. अध्यात्माच्या मार्गावरील वाटचाल गतिमान व्हावी, यासाठी ते प्रारब्ध शांतचित्तानं भोगण्याची आणि सकारात्मकता टिकवण्याची गरज असते. ती प्रेरणा आणि ते बळ सत्पुरुषच देऊ शकतो. त्यासाठी या भाविकाला धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व स्वाहा करावं लागतं! हे सर्वस्व म्हणजे पैसा नव्हे, वस्तू नव्हेत, जमीनजुमला नव्हे! खरं सर्वस्व जर काही असेल, तर ते म्हणजे माणसाचा अहंभाव आणि त्यापायी त्याच्या वाटय़ाला आलेला दु:खभोग! सत्पुरुष त्याचा स्वीकार करतो आणि त्याला अध्यात्माच्या, म्हणजेच आत्मशोधाच्या आणि आत्मतृप्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आणि बळही देतो!

chaitanyprem@gmail.com