09 March 2021

News Flash

३५२. प्रतिमा आणि आकलन

जगात चांगलं आणि वाईट हे दोन्ही आहे आणि त्या दोहोंत परमात्मशक्तीच आहे.

– चैतन्य प्रेम

जगात चांगलं आणि वाईट हे दोन्ही आहे आणि त्या दोहोंत परमात्मशक्तीच आहे. मग हे दोन का आहे? तर जिवाला आपली आंतरिक तपासणी करता यावी, आपण कोणत्या बाजूला आहोत हे उमगावं आणि चांगल्या बाजूकडे अग्रेसर होण्याची त्याची क्षमता जागी व्हावी, यासाठी हे द्वैत आहे! जसजसं हे द्वैत मावळेल आणि मूळ परमात्म शक्तीकडे लक्ष केंद्रित होईल तेव्हाच ‘चांगलं’ आणि ‘वाईट’ या दोन्हीचे ठसे विरतील; एकाच परमतत्त्वाचं भान उरेल. मोनालिसाचं जगविख्यात चित्र आपण पाहिलंच असेल. ते आठवताच काय डोळ्यासमोर येतं? तर तिचं गूढ स्मित! त्यावर फार चर्चाही झडल्या बरं का. ‘तिचा दात दुखत असला पाहिजे म्हणून त्या हास्यातही एक सुप्त वेदना आहे,’ इथवरही ‘विश्लेषणं’ झाली. पण मुद्दा काय? की मोनालिसाचं चित्र म्हणताच आपल्या डोळ्यासमोर येतं ते गूढमंद स्मित. ते मूळ चित्र पाहायला मिळालं समजा, तरी ते पाहात असतानाही आपल्याला ते स्मितच दिसेल. आपल्याला तो कॅनव्हास दिसणार नाही. त्या चित्रातल्या रेषा वा रंगही दिसणार नाहीत! अगदी तीच गत भयानुभव जागविणाऱ्या चित्रांची. व्हॅन गॉग या चित्रकाराचं एक प्रसिद्ध चित्र आहे ते जळती सिगरेट तोंडात असलेल्या कवटीचं! आता गेल्या अनेक वर्षांत बीभत्सपणाकडे झुकणारे इतके भयपट आले, की १८८५ च्या सुमारास हे चित्र पाहणाऱ्यांच्या मनात त्या वेळी निर्माण होत असलेल्या भीतीची कल्पना आज येणार नाही. पण हे भयकारी चित्र पाहतानाही कवटीच दिसते. कॅनव्हास, रेषा आणि रंग दिसत असूनही ‘दिसत’ नाहीत! आपल्याला जगही असंच दिसतं. जसं मनाला भिडतं आणि मनात प्रतिक्रिया जागवतं तसं. जगाचं मूळ असलेली परमात्म शक्ती दिसत नाही. योग्याची मात्र ती गत नसते. तो परमात्म सत्तेपासून क्षणभरही वेगळा, विलग होत नसल्यानं त्याला सर्वत्र स्वत:चंच दर्शन घडत असतं. अवधूत म्हणतो, ‘‘तैशी योगियाची स्थिती। पाहतां नानाकार व्यक्ती। आपणियांतें देखे समवृत्ती। भेदभ्रांति त्या नाहीं।। ५०९।। तेथ जें जें कांहीं पाहे। तें तें आपणचि आहे। या उपपत्ती उभवूनि बाहे। सांगताहे अवधूतू।।५१०।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). म्हणजे, योगी अनेक आकार, अनेक व्यक्ती पाहात असतानाही त्यांना आत्मरूपानंच पाहतो. त्यामुळे भेदभावाची भ्रांती त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. इतकंच नव्हे, तर योगी जे जे काही पाहतो ते ते तोच असतो, असंही अवधूतानं हात उंचावून सांगितलं. खरं पाहता, आपल्यालाही जग आपल्या धारणेनुसारच दिसतं. जी प्रत्येक गोष्ट आपण पाहतो, तिचं आकलन आपल्या मनोवृत्तीनुसारच होतं. आपण संशयी असू, तर जगातल्या चांगुलपणाचाही संशयच येतो. निराश असू तर जगातली कोणतीही गोष्ट आनंदयुक्त वाटतच नाही. मग जो योगी सदैव एकाच परम सत्तेशी एकरूप आहे, त्याला सर्व विश्वात एकच परमात्म सत्ता का दिसणार नाही? मग अवधूत सांगतो की, चंद्र हा माझा पुढचा गुरू झाला. तो का? तर, देह विनाशी आहे, पण आत्मा अविनाशी आहे, हा पाठ चंद्रानं शिकवला! (या देहासी जन्म नाशू। आत्मा नित्य अविनाशू। हा दृढ केला विश्वासू। गुरू हिमांशू करूनी।।५११।।) आपणही चंद्र पाहतो, तो पाहून झुरत असलेल्या प्रेमिकांची प्रेमगीतंही पाहतो, पण हा पाठ कधी जाणवला का हो? पण तो अवधूताला उमगला. मग हा चंद्र गुरू का आणि कसा? अवधूत त्याबद्दल काय सांगतो, ते आता पाहू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:06 am

Web Title: loksatta ekatmayog article 352 abn 97
Next Stories
1 ३५१. ‘राम’ आणि ‘रावण’
2 ३५०. सर्वस्वार्पण
3 ३४९. गोवणं आणि ओवणं
Just Now!
X