01 October 2020

News Flash

३५३. आत्मस्थितीचा पूर्णचंद्र

जन्म, वाढ, स्थिती, ऱ्हास, नाश आदी विकार देहालाच होतात. आत्मा अविनाशी, अनंत, अपार, निराकारच असतो.

 

– चैतन्य प्रेम

चंद्र गुरू का? तर, देह जन्मतो आणि नाशही पावतो, असं वरकरणी दिसत असलं तरी या देहाचा आधार असलेलं आत्मतत्त्व हे नित्य आहे, अविनाशी आहे, आत्म्याला जन्म नाही की मृत्यू नाही, हा दृढ विश्वास चंद्रानं माझ्या मनात बिंबवला, असं अवधूत सांगतो. तो म्हणतो, ‘‘या देहासी जन्म नाशू। आत्मा नित्य अविनाशू। हा दृढ केला विश्वासू। गुरू हिमांशू करूनी।।५११।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). मग हे कसं शिकवलं? अवधूत यदुराजाला सांगतो की, ‘‘शुक्लकृष्णपक्षपाडी। चंद्रकळांची वाढी मोडी। ते निजचंद्रीं नाहीं वोढी। तैशी रोकडी योगियां।।५१२।। जन्मनाशादि षड्विकार। हे देहासीच साचार। आत्मा अविनाशी निर्विकार। अनंत अपार स्वरूपत्वें।।५१३।।’’ म्हणजे, शुक्ल पक्षात चंद्राच्या कला वाढत जातात, तर कृष्ण पंधरवडय़ात चंद्राच्या कला कमी होत जातात; पण त्यामुळे चंद्रात काही वाढ वा घट होत नसते. योग्याची स्थितीही अशीच असते. जन्म, वाढ, स्थिती, ऱ्हास, नाश आदी विकार देहालाच होतात. आत्मा अविनाशी, अनंत, अपार, निराकारच असतो. पुढे अवधूत सांगतो, ‘‘घटु स्वभावें नाशवंतु असे। त्यामाजीं चंद्रमा बिंबलासे। नश्वरीं अनश्वर दिसे। विकारदोषें लिंपेना।।५१४।।’’ म्हणजे, घटामधील, मातीच्या हंडय़ामधील पाण्यात आकाशातील पूर्णचंद्राचं प्रतिबिंब पडतं. अगदी त्याचप्रमाणे, या नाशवंत देहामध्ये अविनाशी तत्त्व विलसत असतं. घडा मातीचा असला तरी त्या मातीचे गुणधर्म पूर्णचंद्राला चिकटत नाहीत. त्याप्रमाणेच या विनाशी देहातील आत्मतत्त्वाला अशाश्वताचे विकार चिकटत नाहीत. मग पुढे अवधूत म्हणतो, ‘‘घटासवें चंद्रासी उत्पत्ती। नाहीं नाशासवें नाशप्राप्ती। चंद्रमा आपुले सहजस्थिती। नाशउत्पत्तिरहितु।।५१५।। तैसा योगिया निजरूपपणें। देहासवें नाहीं होणें। देह निमाल्या नाहीं निमणें। अखंडपणे परिपूर्ण।।५१६।।’’ म्हणजे, घटाबरोबर चंद्र उत्पन्न होत नाही की घट फुटल्यानं चंद्र नष्ट होत नाही. तो घटाप्रमाणे नाशवान नसून सहज स्वाभाविकपणे नाशरहितच असतो. तसाच योगी देहाबरोबर जन्मत नाही की देहपातानं मरत नाही, तो स्वरूपी परिपूर्णच असतो! म्हणजेच मातीचा घट तयार होण्याआधीही चंद्र होता आणि तो घट फुटल्यावरही तो राहतोच. तसं देहाआधीही आत्मतत्त्व विद्यमान आहेच आणि देह नष्ट झाल्यावरही ते अखंड उरणारच आहे. योगी त्या आत्मभावातच एकरूप आणि स्थित असल्यानं जन्म-मृत्यू, उत्पत्ती-नाश, लाभ-हानी या समस्त द्वंद्वात्मक स्थितीपासून तो मुक्त आहे. कारण? अवधूत सांगतो, ‘‘काळाची अलक्ष्य गती। दाखवी नाश आणि उत्पत्ती। ते काळसत्ता देहाप्रती। आत्मस्थिती नातळे।।५१७।।’’ काळाची गती गहन आहे, ती सदोदित उत्पत्ती आणि नाश दाखवत असली तरी त्याची सत्ता देहापुरतीच आहे. आत्मस्वरूपाला ती स्पर्शही करू शकत नाही.

chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 12:05 am

Web Title: loksatta ekatmayog article 353 abn 97
Next Stories
1 ३५२. प्रतिमा आणि आकलन
2 ३५१. ‘राम’ आणि ‘रावण’
3 ३५०. सर्वस्वार्पण
Just Now!
X